मिस्टीरिअस मेसेज (भाग-११)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
(मागील भागात आपण पाहिलं, नियती कुठेतरी गायब झाली आहे, सुयश सर आणि त्यांची टीम आता कार्यालयात आली आहे.... डॉ. विजय कसलं तरी इंजेक्शन घेऊन आले आहेत.... आता पुढे...)
***************************
"या या सर.... बरं झालं लवकर आलात... आत्ताशी १० वाजले आहेत, लग्नाला अजून अवकाश आहे तोवर तुम्ही चहा पाणी घ्या आणि बसा..." अनुजा म्हणाली.
सुयश सरांनी फक्त होकारार्थी मान डोलावली... अनुजा आणि आजी तिथून रुखवताची मांडणी बघायला गेल्या...
"मगाशी माझं सुशांत शी बोलणं झालं आहे, ते लोक आता पोहोचतीलच... सुशांतच लवकर येणं फार गरजेचं आहे..." डॉ. विजय म्हणाले.
"नक्की काय झालं सर?" सोनाली ने विचारलं.
"सांगतो! पण, आपण इथे नको बोलायला.... बाहेर थांबूया...." डॉ. विजय म्हणाले.
सगळे बाहेर गेले.... थोडी आड जागा बघून सगळे उभे होते...
"बोला... काही सिरिअस आहे का?" विक्रम म्हणाला.
"हो! ईशा ने जी हळद मला टेस्ट साठी दिली होती त्यात एक असं केमिकल मिक्स केलं गेलं आहे ज्यामुळे, साधारण पाच ते सहा तासात अंगावर खाज उठून कातडी आतल्या आत जळायला सुरुवात होईल.... आणि ती प्रोसेस एकदा सुरु झाली तर यातून वाचणं अशक्य आहे.... काही वेळेला जास्त त्रास होऊन त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो जो पुन्हा बरा होणार नाही.... तुम्ही याला स्लो पॉइझन म्हणू शकता.... मी हा अँटिडोट घेऊन आलो आहे, तो सुशांत ला देणं गरजेचं आहे...." डॉ. विजय सोबत आणलेलं इंजेक्शन दाखवत म्हणाले.
"सर, पण जर हे केमिकल सुशांत च्या घरी मिक्स केलं असेल तर त्याच्या घरात अजून कोणाला तीच हळद लावली असेल तर त्यांना पण प्रॉब्लेम होऊ शकतो ना?" अभिषेक ने विचारलं.
"हो! मी अँटिडोट आणला आहे तो त्या सगळ्यांना द्यावा लागेल..." डॉ. विजय म्हणाले.
"सर, तिथे फक्त सुशांतलाच हळद लावली होती... आणि सगळ्यांनी हळदीच्या पानानेच लावली आहे... मला नक्की आठवतंय कारण त्याच्याकडून कोणी जास्त पाहुणे नाहीयेत... त्याचे आई - बाबा आणि तीन मित्र होते तिथे.... बाकी कोणी नव्हतं... फक्त मीच हाताने लावली होती...." सोनाली म्हणाली.
"चल मग तू आधी अँटिडोट घेऊन ठेव...." डॉ. विजय म्हणाले.
त्यांनी सोनाली ला अँटिडोट च इंजेक्टशन दिलं... आणि हातावर जी हळद लागलेली होती त्या वर थोडं पाणी लावून सॅम्पल घेऊन ठेवलं...
एवढ्यात सुशांत आणि त्याच्या घरचे तिथे आले... त्याच्या मित्रांनी फटाक्यांची माळ फोडली.... तो आवाज ऐकून अनुजा आणि आजी बाहेर आल्या.... अनुजा ने औक्षण करून त्यांना आत घेतलं.... वर पक्षाच्या रूम्स ईशा ने दाखवल्या आणि सुशांत ला लवकर बाहेर येऊन भेट म्हणून सांगितलं. सुशांत पाच मिनिटात बाहेर आला....
"काय झालं? असं अचानक का बोलावलं?" सुशांत ने विचारलं.
डॉ. विजय नी सगळं सांगून त्याला इंजेक्शन दिलं... सुयश सरांनी आणि सोनाली ने नियती सुद्धा हरवली आहे हे सांगितलं....
"तिचा मोबाईल सुद्धा बंद आहे.... नाहीतर या लॉंग डिस्टन्स ब्रेसलेट ने आपल्याला ती कुठे आहे हे समजलं असतं!" ईशा सुशांत च्या हातातलं ब्रेसलेट बघून बोलली.
"हो! आपण अजूनही तिला ट्रेस करू शकतो... मला सांग तिने कोणते कानातले घातले होते?" सुशांत ने विचारलं.
"पिवळ्या गुलाबाच्या फुलांचे..." ईशा म्हणाली.
"हे बघ हेच होते का ते?" सुशांत तिला त्या दोघांचा सेल्फी दाखवत म्हणाला.
"हो! हेच टॉप्स घातले होते.... तिला ज्वेलरी वरचे कानातले मोठे वाटत होते, म्हणून तिने पर्स मधून काढून हे घातले होते..." ईशा म्हणाली.
"खरंच देव पावला... मी लगेच तिला ट्रेस करायला घेतो..." सुशांत म्हणाला.
"मला एक कळत नाहीये.... तू कानातल्या वरून कसं ट्रेस करणार?" डॉ. विजय नी विचारलं.
"सर! तुम्हाला आठवतं, जेव्हा त्या अवयव तस्करीच्या वेळी मला पहिल्यांदा नियती ने भेटायला बोलावलं होतं.... आणि आम्ही कॉफी शॉप मध्ये भेटलो होतो.... तेव्हा मला संशय होता की नक्कीच काहीतरी सिरिअस असणार... म्हणून तिला मी हे ट्रेकिंग चिप वालं कानातलं गिफ्ट केलं होतं.... आणि याबद्दल नियती ला सुद्धा माहित नाहीये... हे फक्त मलाच माहित होतं..." सुशांत ने सगळं सांगितलं.
बोलता बोलताच त्याने त्याच्या मोबाईल मधून त्या चिप ला ट्रेस करायला ठेवलं.... काही मिनिटातच नियतीचं लोकेशन दिसलं....
"जवळ जवळ ५०० मीटर च्या आतच आहे नियती.... म्हणजे ती इथेच कुठेतरी कार्यालयाच्या परिसरात असणार..." सुशांत म्हणाला.
"ठीक आहे.... सर, मी पुन्हा एकदा सोनाली च्या हातावरच्या हळदी चं सॅम्पल चेक करून येतो.... जर यात काही reaction सुरु झाली असेल तर मला अजून एक डोस दोघांना द्यावा लागेल.... तुम्ही तोवर नियती ला शोधा... ती ११.३० च्या आत सापडणं गरजेचं आहे.... कारण, अनुजाला आपण तिच्या खोलीत जाण्यापासून जास्त वेळ नाही थांबवू शकणार..." डॉ. विजय म्हणाले.
"नका काळजी करू तुम्ही.... नियती सापडेल लगेच! निनाद तू यांना गाडीवरून घेऊन जा आणि लवकर या..." सुयश सर म्हणाले.
डॉ. विजय आणि निनाद त्याच्या गाडीवरून लॅब ला जायला निघाले... डॉ. विजय ना पण लवकरात लवकर परत येणं गरजेचं होतं नाहीतर अनुजा ला संशय आला असता... सगळे नियतीला शोधायला जाणार एवढ्यात तिथे अनुजा आली....
"सोनाली, ईशा तुम्ही इथे काय करताय? जा तुम्ही तुमची तयारी करा.... आणि सुशांत तू सुद्धा इथे थांबू नकोस हा.... आता डायरेक्ट लग्नात नियती ला भेटता येईल...." अनुजा सुशांत ला चिडवत म्हणाली.
सुशांत फक्त हसला.... आणि पुन्हा रूम मध्ये जाण्याच्या बहाण्याने आत जाऊन लपला....
"आमचे हे कुठे गेले आता... ऐन वेळी कुठे ना कुठे जात असतात... आज पोरीचं लग्न आहे जरा थांबावं ते नाही... गेले कुठेतरी न सांगता..." अनुजा बडबडत होती...
"काकू काकू... मला सांगून गेलेत ते.... मीच विसरले तुम्हाला सांगायला.... आजोबा आले नाहीयेत ना अजून म्हणून ते त्यांना आणायला गेलेत..." ईशा ने आपलं काहीतरी कारण पुढे केलं.
"हा मग ठीक आहे..." अनुजा म्हणाली. आणि बाकी तयारी साठी निघून गेली....
"मी आता सरांना फोन करून सांगतो, येता येता आजोबांना घेऊन या...." विक्रम हसत हसत म्हणाला.
"चला आता.... आपण सुशांत बरोबर नियती ला शोधुया.... सोनाली तू इथेच थांब.... कोणाला काही कळणार नाही याची काळजी घे...." सुयश सर म्हणाले.
सगळे कार्यालयात गेले.... सुशांत ने हळूच खूण करून त्यांना त्याच्या पाशी बोलावलं.... लोकेशन बघत बघत आणि सगळ्यांच्या नजरा चुकवून हे सगळे जण मागच्या दारापाशी गेले...
"हे बघा सर, कुलूप तुटलं आहे.... कदाचित पिन घालून उघडलं असणार...." ईशा म्हणाली.
"हम्म.. हे बघा इथे हळदी च्या बोटांचा ठसा आहे... म्हणजे इथून च नियती ला घेऊन गेले असणार..." सुयश सर म्हणाले.
मागच्या दारातून बाहेर पडल्यावर सगळे जण अजून काही मिळतंय का बघत होते.... चालता चालता अभिषेक चा पाय कशावर तरी पडला... म्हणून त्याने उचलून बघितलं तर ते कानातलं होतं!
"सर! हे बघा हे कानातलं मिळालं आहे...." अभिषेक ते कानातलं सुयश सरांना दाखवत म्हणाला.
"हे तर तेच चिप वालं कानातलं आहे.... या एकाच कानातल्यात चिप होती... नेमकं हेच इथे पडलं आहे... शी.... म्हणजे इतका वेळ आपण हे ट्रेस केलं... आता कसं कळणार नियती कुठे आहे..." सुशांत खूप काळजीने म्हणाला.
"नको जास्त त्रास करून घेऊस.... बघ, हे कानातलं इथे मिळालं आहे म्हणजे नियती ला इथूनच नेलं आहे.... शिवाय जास्त लांब नसेल नेलं... कारण बाहेर रहदारी बऱ्यापैकी आहे... आपण शोधुया...." विक्रम सुशांत ला शांत करत म्हणाला.
"सर, ते बघा.... तिथे एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग दिसतेय.... आणि कोणी मजूर सुद्धा दिसत नाहीयेत... तिथे नियती ला लपवणं सहज शक्य आहे...." ईशा म्हणाली.
"हो! चला आपण तिथे शोधुया...." सुयश सर म्हणाले.
सगळेजण त्या बिल्डिंग पाशी आले..... दोन मजले बांधून झालेली ती बिल्डिंग बरेच दिवस तशीच उभी आहे असं वाटत होतं! कबुतरांची तीन चार घरटी दिसत होती.... फोडलेली सिमेंट ची पोती घट्ट गोळा झाली होती... मध्ये मध्ये बांधलेल्या भिंतींमुळे रूम सारखे पार्टीशियन झाले होते.... सगळ्यांनी ती बिल्डिंग नीट पाहिली...
"ईशा, अभिषेक तुम्ही दोघं इथे खाली सगळी कडे नीट पहा... सुशांत, विक्रम तुम्ही दोघं पहिल्या मजल्यावर बघा आणि मी दुसऱ्या मजल्यावर बघतो... नीट सावध रहा... इथे पडलेले बांबू स्वरक्षणासाठी घ्या... पण, नियतीच्या जीवाला धोका होईल असं कोणतंही पाऊल उचलू नका..." सुयश सर म्हणाले.
"येस सर!" सगळ्यांनी सॅल्यूट केला... आणि ठरल्याप्रमाणे नियतीची शोध मोहीम सुरू झाली...
*************************
तोपर्यंत इथे लॅब मध्ये डॉ. विजय नी त्या हळदीची टेस्ट केली.... पण, सुदैवाने त्यात काहीही नव्हतं...
"निनाद, यात काहीही भेसळ नाहीये.... मला वाटतंय सुशांत च्या घरातून निघाल्यावर किंवा त्याला हळद लावून झाल्यावर यात ते केमिकल मिक्स केलं गेलं असणार...." डॉ. विजय म्हणाले.
"या बद्दल आता सोनालीच काही सांगू शकेल...." निनाद म्हणाला.
"हो! चल आता आपल्याला आधी निंबाळकर आजोबांना घेऊन यायचं आहे.... त्यांना तिथे कार्यालयात सोडू आणि सोनालीशी बोलू या वर..." डॉ. विजय म्हणाले.
निनाद आणि डॉ. विजय आजोबांना आणायला गेले....
क्रमशः....
***************************
नियती त्या बिल्डिंग मध्ये असेल का? सुशांत ला हळद लावून झाल्यावर त्यात कोणी आणि कसं ते केमिकल मिक्स केलं असेल? नियतीच्या जीवावर कोण उठलं असेल? आता तरी बिच्छु गँग पकडली जाणार का? पाहूया पुढच्या भागात..... तोपर्यंत तुम्हाला काय वाटतंय कोण करत असेल हे सगळं? कमेंट करून नक्की सांगा...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा