Login

मिस्टीरिअस मेसेज (भाग-१६)

Finding the codes and secret messages to save life.

मिस्टीरिअस मेसेज (भाग-१६)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागील भागात आपण पाहिलं, सुयश सरांनी जो प्लॅन केला त्यानुसार सगळं करून बिच्छु गँग ला सापळ्यात अडकावणार आहेत... आता पुढे...)
**************************
        इथे कार्यालयात आता वधू वरांना आशीर्वाद आणि भेट देण्यासाठी सगळ्यांनी गर्दी केली होती.... नियती आणि सुशांत जसे स्टेज वर आले तसे सगळेजण त्यांना भेटण्यासाठी रांग लावून उभे राहिले.... ईशा आणि विक्रम सुद्धा त्यांच्याच आसपास उभे होते.... निनाद सगळ्यांचे फोटो काढत होताच! नियती आणि सुशांत ला सुद्धा सुयश सरांचा प्लॅन माहित असल्यामुळे ते सुद्धा खूप सतर्क होते.... एक - एक जण येऊन दोघांचे अभिनंदन करत होता आणि काही ना काही भेट वस्तू देत होता.... सुशांत कडून फक्त त्याचे तीन चार मित्रच असल्यामुळे ही बाकी सगळीच मंडळी त्याच्यासाठी अनोळखीच होती..... नियती सुद्धा ठराविक लोकांनाच ओळखत होती.... सोबत अनुजा सुद्धा असल्यामुळे ती प्रत्येकाची ओळख करून देत होती.... त्यामुळे एक जण बराच वेळ तिथेच असल्यामुळे निनाद, विक्रम आणि ईशा ला त्या सगळ्यांचं नीट निरीक्षण करता येत होतं..... भेट दिल्यावर फोटो काढेपर्यंत विक्रम मागच्या मागे हळूच ते एका छोट्या मेटल डिटेक्टर ने ते तपासत होता.... उगाच कोणी हानिकारक काहीही तिथे ठेवून जाऊ नये हाच त्या मागचा हेतू होता..... 
          असेच सगळे एक एक करून येत होते.... सुयश सर बाहेर असणाऱ्या प्रत्येकावर नजर ठेवून होतेच.... एवढ्यात त्यांना बाहेरून दोन माणसं सूट बूट घालून डोळ्यावर काळा गॉगल लावून येताना दिसली.... लांबून तरी ते दोघं सदाबहार मॉल चा मॅनेजर आणि सिक्युरिटी गार्डच वाटत होते.... त्या दोघांनी पूर्णपणे काळजी घेतली असली तरी त्या सिक्युरिटी गार्ड च्या खिशातून आय.डी. कार्ड ची दोरी बाहेर आली होती आणि त्यावर सदाबहार मॉल च नाव होतं! ते बघूनच सुयश सरांचा संशय खात्रीत बदलला होता.... त्यांनी लगेच सगळ्यांना कॉन्फरन्स कॉल वर जोडलं... सगळेजण आधी पासूनच तयार असल्यामुळे कानात ब्लूटूथ घातलेलंच होतं! 

"सगळेजण नीट ऐका.... बाहेरून आत्ता दोन्ही उंदीर आत येतायत.... सापळा तयार ठेवा... कोणतीही चूक नकोय...." सुयश सर म्हणाले. 

"ओके सर! आम्ही तयार आहोत!" विक्रम म्हणाला. 

ते दोघं आत आले.... विक्रम आणि ईशा ने बघितलं! ईशा त्या दोघांवर नजर ठेवून होतीच! ते दोघं स्टेज च्या जवळ आले.... तो मॉल मॅनेजर मनोज स्टेज च्या मागे गेलेला विक्रम ने बघितलं! आणि त्याचा तो साथीदार तिथेच पाहुण्यांमध्ये उभा होता.... विक्रम ने सोनाली ला पटकन सावध केलं.... 

"हॅलो! सोनाली... तो मनोज स्टेज च्या मागे गेला आहे.... जरा लक्ष ठेव..." विक्रम ने सांगितलं. 

विक्रम चा मेसेज मिळाल्या बरोबर सोनाली स्टेज च्या मागून केर काढण्याच्या बहाण्याने थोडं अंतर ठेवून मनोज वर लक्ष ठेवत होती... 
*****************************
तिथे गणेश आणि अभिषेक कपाटाची चावी शोधत होते.... सोफ्याच्या गादी खाली, सगळ्या ड्रॉवर मध्ये, टेबलाखाली सगळीकडे शोधून झालं पण चावी काही कुठे मिळेना.... 

"सर! काय असेल हो या कपाटात? एवढी कुठे दडवून ठेवली आहे चावी... सगळं घर पालथं घातलं पण कुठे मिळालीच नाही!" गणेश म्हणाला. 

"शोधावी तर लागेल... आता फक्त या सगळ्या फ्रेम बघायच्या राहिल्यात... त्याच्या मागे सुद्धा बघून घेऊया... घे शोधायला...." अभिषेक म्हणाला. 

दोघांनी मिळून सगळ्या फोटो फ्रेम काढून नीट तपासल्या.... 

"सर! हि बघा मिळाली चावी... आजी आजोबांच्या या फोटो मागे हे पाकीट चिकटवलं होतं त्यात होती..." गणेश ते पाकीट आणि फ्रेम दाखवत म्हणाला... 

"ओके गुड! चल कपाट उघडुया..." अभिषेक गणेश च्या हातातली चावी घेत म्हणाला. 

अभिषेक ने कपाट उघडलं.... त्यात फक्त काही कपडेच होते.... 

"सर! फक्त कपडे आहेत यात... यासाठी चावी एवढी लपवून ठेवण्याचं काय कारण?" गणेश म्हणाला. 

"नाही गणेश नाही! नीट बघावं लागेल... हे बघ इथे हे लॉकर आहे त्यात काहीतरी असू शकतं!" अभिषेक म्हणाला. 

"सर! पण हे लॉकर उघडायला तर पासवर्ड लागेल.... चावी ने नाही उघडणार हे..." गणेश लॉकर बघून बोलला.

"ज्या पाकिटात चावी होती ते पाकीट नीट बघ त्यावर काही क्लु आहे का...." अभिषेक म्हणाला. 

गणेश ने ते पाकीट व्यवस्थित पणे पूर्ण उघडलं.... त्यावर लिहिलं होतं; "LKEOKJ" 

"सर! हे काय उलट सुलट लिहिलं आहे काही कळत नाहीये.... याचा काही धड उच्चार नाही काही अर्थ नाही... काय असेल हे?" गणेश ने विचारलं. 

"मला तरी वाटतंय या शब्दात आपला पासवर्ड लपला आहे.... हा शब्द आपल्याला क्रॅक करता आला ना कि आपण ते लॉकर उघडू शकू..." अभिषेक म्हणाला. 

दोघं हा काय पासवर्ड असेल याचा विचार करत होते.... 
****************************
कार्यालयात सोनाली ने बघितलं, तो मनोज एका कोपऱ्यात पिशवीतून काहीतरी काढून ठेवण्याचा प्रयत्न करतोय...  

"हॅलो सर! तो मनोज इथे काहीतरी काढून ठेवण्याचा प्रयत्न करतोय... हातात नक्की काय आहे समजत नाहीये..." सोनाली दबक्या आवाजात विक्रम शी फोनवर बोलली. 

"ओके... मी बघतो!" विक्रम म्हणाला. 

ईशा आणि निनाद ला खुणेनेच मी जाऊन येतो म्हणून खुणावलं.... आणि मनोज च्या मागून जाऊन त्याच्या मागे उभा राहिला आणि त्याचं तोंड दाबून त्याला पकडून मागच्या दाराने बाहेर पडला.... मनोज अजून आला नाही हे लक्षात येऊन तो सिक्युरिटी गार्ड सुद्धा पळायच्याच तयारीत होता! निनाद ने हेरलं होतं! तो जसा बाहेर जाऊ लागला तसा त्याने सुयश सरांना या बद्दल सांगितलं..... ते तिथे तयारीत उभेच होते... तो जसा बाहेर आला तसं त्यांनी त्याला धरलं आणि कार्यालायच्या मागच्या बाजूला गेले.... 
          विक्रम ने फोन करून ईशा, सोनाली आणि निनाद ला सुद्धा तिथे बोलावून घेतलं.... ते तिघं पण तिथे पोहोचले..... 

"बोल! काय करायला आला होतास इथे?" विक्रम ने मनोज ची कॉलर धरून विचारलं. 

"ते जर सांगायचं असतं तर आधीच सांगून केलं नसतं का..... हा हा हा..." मनोज उडवा उडवीची उत्तर देत हसत म्हणाला. 

विक्रम ने त्याच्या एक सणसणीत कानाखाली मारली.... जवळ जवळ त्याची पाची बोटं मनोज च्या गालावर उठली होती.... आणि तो खाली पडला.... सुयश सरांनी त्याच्या कॉलर ला धरून त्याला पुन्हा उभं केलं! 

"बघ, बऱ्या बोलाने सगळं सांगितलंस तर ठीक आहे.... नाहीतर...." सुयश सर एकदम शांत पणे त्याच्या खांद्यावरची धूळ झटकत म्हणाले. 

"नाहीतर.... नाहीतर काय..." मनोज अजूनच गुर्मीत म्हणाला. 

"विक्रम! शूट हिम...." सुयश सरांनी ऑर्डर दिली. 

विक्रम ने त्याची गन काढली... त्यातल्या पाच गोळ्या काढून खिशात ठेवल्या आणि फिरवली.... नंतर मनोज च्या डोक्याला ती गन लावून ट्रिगर दाबला.... मनोज ने घट्ट डोळे मिटून घेतले होते..... पण, काहीही झालं नाही पाहून त्याने डोळे उघडले.... 

"एकदा वाचलास! ही देवाने दिलेली संधी आहे असं समज आणि बोल.... कदाचित पुढच्या वेळी गोळी तुझ्या डोक्याच्या आरपार असेल...." विक्रम डोळे मोठे करत त्याच्या डोक्यावर गन पॉईंट अजून जोरात दाबत म्हणाला. 

आता मनोज पुरता घाबरला होता.... अक्षरशः त्याला घामाचे लोट लागले होते.... मनोज ची हि अवस्था बघून तो सिक्युरिटी गार्डच म्हणाला, "साहेब! आम्हाला काही माहित नाही..... खरा बॉस कोणीतरी वेगळंच आहे.... आम्ही फक्त त्याची प्यादी आहोत!" 

"हो! हो! साहेब... आम्हाला जे आणि जसं सांगितलं ते ते आम्ही केलं.... शेवटी आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे साहेब..." मनोज रडत रडत म्हणाला. 

"म्हणजे?" ईशा ने विचारलं. 

"आमच्या पूर्ण कुटुंबाला त्या लोकांनी किडनॅप केलं आहे.... आणि आम्ही जर त्यांनी जे सांगितलं आहे ते केलं नाही तर ते लोक त्यांना मारून टाकतील.... म्हणून आम्ही हे केलं...." सिक्युरिटी गार्ड म्हणाला. 

"आठवड्यातून एकदा ते लोक आम्हाला गाडीत बसवून आमच्या कुटुंबियांना भेटायला नेतात.... व त्यांच्याशी काही बोलू सुद्धा देत नाहीत ओ... आणि हे काम झाल्यावर ते आमच्या कुटुंबाला या सगळ्यातून सोडणार होते..." मनोज रडत रडत म्हणाला. 

"काय? म्हणजे त्या लोकांचा ठाव ठिकाणा तुम्हाला माहितेय?" सोनाली ने विचारलं. 

"नाही मॅडम.... ते लोक कोण आहेत, कुठे असतात काही माहित नाही... आमच्या दोघांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते! आणि तसंच पट्टी बांधून परत मॉल पाशी आणून सोडतात त्यामुळे काही माहित नाही..." मनोज म्हणाला. 

"अरे पण जेव्हा ते लोक तुम्हाला काम सांगतात तेव्हा कसे तुमच्याशी संपर्क करतात? तेव्हा त्यांचा आवाज ऐकला असेलच ना..." निनाद ने विचारलं. 

"नाही! ते लोक चिठ्ठी पाठवून काम सांगतात आणि ती चिठ्ठी वाचून झाली की लगेच टॉयलेट मध्ये फ्लश करावी लागते...." सिक्युरिटी गार्ड म्हणाला. 

"हो साहेब! एकदा मी तसं केलं नव्हतं तर त्या लोकांनी माझ्या मुलाच्या हातावर चटका दिला होता...." मनोज म्हणाला. 

"निंबाळकर आजी आजोबांना तुम्हीच कुठे लपवलं आहे का? न घाबरता सांगा... आम्ही तुमच्या कुटुंबाला काहीही होऊ देणार नाही..." सुयश सरांनी विचारलं. 

"नाही साहेब... खरंच नाही... आम्हाला फक्त आज या लग्नात स्मोक बॉम्ब ठेवायला सांगितला होता... या बॉम्ब मध्ये विषारी वायू आहे त्यामुळे बऱ्यापैकी जीवित हानी झाली असती...." मनोज ने सगळं कबुल केलं.

"निनाद, या दोघांना घेऊन जा..." सुयश सर म्हणाले. 

निनाद त्या दोघांना घेऊन गेला.... सुयश सर विचारात होते.... 

"सर! काय झालं? हे दोघं खोटं बोलतायत असं वाटतंय का?" ईशा ने विचारलं. 

"नाही... मला नाही वाटत हे दोघं खोटं बोलतायत... मी विचार करतोय, जर या दोघांनी आजी आजोबांना काही केलं नाहीये तर ते दोघं गेले कुठे... विक्रम एक काम कर, अभिषेक ला फोन करून सगळे डिटेल्स घे... आणि त्याला सांग आपण तिथे येतोय... ईशा, तू इथेच थांब! काही गरज लागली तर लगेच कळव." सुयश सर म्हणाले. 

"ओके सर!" ईशा म्हणाली. 
क्रमशः....
**************************
या सगळ्या मागे आजी आजोबांचा हात असेल का? त्या लॉकर चा पासवर्ड काय असेल? कमेंट करून नक्की सांगा... 

🎭 Series Post

View all