गूढ (भाग-६)
© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाचा याच्याशी काहीही संबंध नाही. कथेतील सर्व नावे, प्रसंग, ठिकाण पूर्णतः काल्पनिक आहे. कथा कोणत्याही अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
नियतीला येताना निंबाळकर आजी बघतात..... तिला एवढं विचारात गढलेलं त्यांनी पहिल्यांदा पाहिलं होतं! त्यांनी नियतीला हाक मारून बोलावून घेतलं!
आजी:- काय गं नियती काय झालं? आज एवढा कसला विचार करत चालली आहेस?
नियती:- काही नाही आजी सहजच!
आजी:- तुला खोटं नाही बोलता येत घरी ये जरा... आणि नीट सांग काय झालं?
नियती आजींच्या घरी जाते....
आजी:- आधी नीट शांतपणे बस मी तुला पाणी आणते...
असं म्हणून आजी नियतीला पाणी आणायला जाते! तिला पाणी देऊन त्या विचारतात.... आता सांग कसली एवढी काळजी करतेस? काय झालं?
नियती:- मला काही नाही झालं! सध्या जरा जास्त काम आहे ना त्याचाच विचार करत होते... चला मी येते... उद्या लॅब मध्ये जरा लवकर जायचं आहे...
असं म्हणून नियती कशीबशी सारवा सारव करून तिथून निघते आणि घरी येते.... सुशांतच्या वागण्याचा अजूनही तिला अंदाज येत नसतो.... पण, त्याच्यावर तिचा पूर्ण विश्वास सुद्धा असतो.... दुसऱ्या दिवशी घरातून बाहेर आल्यावर ती सुशांतने दिलेला फोन ऑन करते तेव्हा त्याच्यावर सुशांत ने मेसेज केलेला असतो; "गुड मॉर्निंग नियती! मी आज लॅब मध्ये येतोय... माझं डॉ. विजय कडे काम आहे... मी जे तिथे बोलेन त्याला तू फक्त हो हो कर..." नियती त्याला ओके चा रिप्लाय देते.... आज लॅब मध्ये डॉ. विजय नियती च्या आधीच आलेले असतात... ते काहीतरी करत असतात पण नियती ला बघून दुसरंच काहीतरी करायला लागतात.... हे नियतीच्या नजरेतून सुटत नाही! तिच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरु होतं; सुशांत च असं सरांच्या बाबतीत अचानक बदलेलं मत, मला सरांपासून काही गोष्टी लपवून ठेवायला सांगणं आणि आज सरांचं हे असं विचित्र वागणं... याचा परस्परांशी काही संबंध तर नसेल ना? या सगळ्यात सरांचा हात आहे का? नियती हे सगळे विचार करता करता शून्यात गढून गेलेली असते! इतक्यात डॉ. विजय तिला हाक मारतात....
डॉ. विजय:- नियती काय झालं? काल सुद्धा काही झालंय का? बिनधास्त बोल!
नियती :- नाही सर! काही नाही! ते जरा मला आज बरं वाटत नाहीये असं वाटतंय... डोकं भणभणतंय....
डॉ. विजय:- एवढ्या दिवसाच्या मानसिक त्रासामुळे होत असेल.... घरी जाऊन आराम करतेस का? आज सुट्टी घे... चालेल....
नियती:- नको सर! वाटेल थोड्यावेळात बरं!
इतक्यात सुशांत लॅब मध्ये येतो....
डॉ. विजय:- अरे सुशांत ये ये! काही हाती लागलं का?
सुशांत:- अजून नीट खात्रीशीर सांगता येणार नाही पण, मेन डोअर च्या रेकॉर्डिंग मध्ये कोणीतरी घरात शिरलेलं ओझरतं दिसतंय माझी खात्री झाली की सांगतो तुम्हाला नंतर... हेच सांगायला मी इथे आलो होतो... चार दिवस जरा मला शहरा बाहेर जावं लागेल म्हणून लगेच आलो खरंतर! आजच निघतोय मी! भेटू पुन्हा आता मी आल्यावर!
चल नियती मी येतो आता.... असं म्हणून हात मिळवला... सुशांत गेल्यावर नियती डॉ. विजय ना म्हणाली; "सर मला अजून बरं वाटत नाहीये... तुम्ही म्हणता तसं आज मी सुट्टी घेते..."
डॉ. विजय:- हो चालेल! जा तू घरी....
नियती लॅब मधून निघते.... सरांना खोटं कारण सांगून ती निघालेली असते कारण, सुशांतने जाताना तिच्या हातात गपचूप एक चिठ्ठी दिलेली असते ज्यात मला माझ्या घरी येऊन भेट सरांना न सांगता असं लिहिलेलं असतं! नियती सुशांत च्या घरी येते....
सुशांत:- ये नियती! मी तुझीच वाट बघत होतो..
नियती:- अरे पण असं गपचूप का बोलावून घेतलंस? आणि सरांना खोटं का सांगितलंस मेन डोअर च्या रेकॉर्डिंग मध्ये काहीतरी रेकॉर्ड झालंय असं?
सुशांत:- हो हो सांगतो! तू आधी शांतपणे बस....
नियतीच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून अजून काहीही ताणून न धरता तो बोलू लागतो; "सगळ्यात आधी मी कुठेही बाहेर जात नाहीये! इथेच आहे!"
नियती:- पण मग....
सुशांत:- हे बघ आधी माझं ऐकून घे... आपल्याला तस्करी करणाऱ्या टोळीला गाफील ठेवायचं आहे म्हणून मी खोटं बोललो!
नियती:- तुला नक्की काय म्हणायचं आहे सुशांत? सरांचा पण यात हात आहे? हे कसं शक्य आहे.... काल पासून बघतेय तू विचित्र वागतोयस....
सुशांत:- मला कळतेय तुझी अवस्था! आधी माझा पण विश्वास बसत नव्हता पण हे सत्य आहे! आता ते कोणत्या दबावाखाली येऊन हे करतायत कि स्व इच्छेने हे शोधायचं आहे आपल्याला म्हणून मी खोटं बोललो....
नियती:- पण कशावरून यात सरांचा हात आहे?
सुशांत:- मागच्या महिन्यात जेव्हा आपल्याला समजलं हे अवयव तस्करी साठी सुरु आहे तेव्हा मी माझ्या खबरील कामाला लावून एका हॉस्पिटल मध्ये हे रॅकेट चालत हे शोधून काढलं आणि वेष बदलून तिथे गेलो.... माझ्या बहिणीला किडनीची गरज आहे असं खोटंच सांगितलं आणि तू बनवलेले खोटे रिपोर्ट्स दाखवले....
नियतीला आता आठवतं सुशांतने तिला सांगितलं होतं; मला किडनी फेल असलेल्या एका मुलीचे खोटे रिपोर्ट्स बनवून हवे आहेत पण, ब्लड ग्रुप आणि वय तुझं जे आहे ते लिही...
नियती:- अच्छा म्हणून तू ते रिपोर्ट्स बनवून घेतले होतेस....
सुशांत:- हो! त्या डॉक्टर ने सगळे रिपोर्ट्स बघितल्यावर मला सांगितलं ही किडनी सध्या अवेलेबल नाहीये... रेअर आहे वैगरे वैगरे... पण जेव्हा मी जास्त पैश्याचं आमिष दाखवलं तेव्हा त्याने त्याचा फोन नंबर दिला आणि दोन दिवसांनी भेटा म्हणून सांगितलं! त्या नंबर चे मी कॉल डिटेल्स काढले तेव्हा माझ्या लक्षात आलं सगळ्यात जास्त फोन डॉ. विजय ना केलेले होते.... आधी मला योगायोग वाटला... पण खात्री करायला म्हणून जेव्हा मी डॉ. विजय चे लोकेशन कधी कधी कुठे होते हे बघितलं तेव्हा तुझ्या घराच्या आसपासच त्यांचं लोकेशन होतं! आणि ते हि जेव्हा तुझ्या सोबत त्या विचित्र घटना घडत होत्या तेव्हा.... म्हणून मी आज लॅब मध्ये येऊन खोटं बोललो..... उद्या मला त्या हॉस्पिटल च्या डॉक्टर ने बोलावलं आहे.... जे काही बोलणं होईल ते मी तुला मेसेज करून सांगतो! पण आता चार दिवस तरी आपल्याला भेटता येणार नाही!
नियती:- बरं! पण तू जे करशील ते सांभाळून कर!
सुशांत:- उलट आता तूच सावध रहा! बहुतेक ते लोक आता आमावस्येची वाट नाही बघणार.... तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो! मी आहेच पण, तू सुद्धा जमेल तेवढी स्वतःची काळजी घे...
नियती:- हो.... तू आहेस म्हणून तर मी बिनधास्त आहे!
सुशांत:- लॅब मध्ये पण काही वेगळं घडलं तर मला लगेच मेसेज कर....
नियती:- हो नक्की! चल मी येते आत.... बाय...
नियती सुशांत च्या घरून निघते आणि स्वतःच्या घरी येते.... थोड्या वेळात डॉ. विजय तिच्या घरी येतात....
नियती:- सर तुम्ही इथे?
डॉ. विजय:- हो! का आवडलं नाही का मी इथे आलेलो?
नियती:- तसं नाही सर! पण असं अचानक न सांगता आलात म्हणून...
डॉ. विजय:- तुझी तब्येत कशी आहे आता हे विचारायला आलो... आता घरात घेशील कि दारातूनच जाऊ?
नियती:- सॉरी सर! या ना आत या....
डॉ. विजय आत येतात.... त्यांच्या सराईत पणे चालण्या वरून असं वाटत असतं कि ते या आधीही तिथे येऊन गेलेत.... नियतीच्या हे लक्षात येतं पण आपल्याला काही जाणवलं नाही या अविर्भावात ती त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते....
डॉ. विजय का आले असतील अचानक? नियतीच्या जीवाला धोका तर नाही ना? खरंच यात त्यांचा काही हात असेल? पाहूया पुढच्या भागात....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा