Login

"न लिहलेली पत्रे" --१ कार्यकर्ता

पत्र आजकालच्या इंटरनेटच्या फास्ट फॉरवर्ड जगात बरच माग पडलेलं संपर्कमाध्यम. पण आजपासून काही दशकांपूर्वी पत्र हि एक अशी गोष्ट होती जी आपल्याला आपल्या प्रियजनांपर्यंत घेऊन जात होती. मनातल्या भावना शब्दरूपाने कागदावर उतरवून समोरच्याला सांगण्याचं एक उत्कृष्ठ माध्यम म्हणजे पत्र. त्याकाळात किंवा अगदी आताच्या काळात पण ज्या भावना आपल्या मनात आहेत पण कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण त्या भावना समोरच्या जवळ व्यक्त मात्र करू शकत नाही. त्या भावनांना योग्य व्यक्ती पर्यंत पोहचवण्याचं साधन म्हणजे पत्र. आता असं असून देखील काही पत्र आपण लिहू शकत नाही त्याची प्रत्येकाची कारण वेगवेगळी असू शकतील. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ही अशी असंख्य पत्रे आपण साठवून ठेवलेली असतात. अशाच मनाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या असंख्य पात्रातील काही पत्रे आपण आपल्या या "न लिहलेली पत्रे" या मालिकेत सगळ्यांसमोर घेऊन येणार आहोत. आशा आहे कि तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडेल. आणि यातील काही पत्रे तुम्हीसुद्धा तुमच्या हृदयातील एका कप्प्यात बंद केली असतील ती पुन्हा नव्याने समोर येतील. धन्यवाद..
पत्र आजकालच्या इंटरनेटच्या फास्ट फॉरवर्ड जगात बरच माग पडलेलं संपर्कमाध्यम. पण आजपासून काही दशकांपूर्वी पत्र हि एक अशी गोष्ट होती जी आपल्याला आपल्या प्रियजनांपर्यंत घेऊन जात होती. मनातल्या भावना शब्दरूपाने कागदावर उतरवून समोरच्याला सांगण्याचं एक उत्कृष्ठ माध्यम म्हणजे पत्र. त्याकाळात किंवा अगदी आताच्या काळात पण ज्या भावना आपल्या मनात आहेत पण कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण त्या भावना समोरच्या जवळ व्यक्त मात्र करू शकत नाही. त्या भावनांना योग्य व्यक्ती पर्यंत पोहचवण्याचं साधन म्हणजे पत्र. आता असं असून देखील काही पत्र आपण लिहू शकत नाही त्याची प्रत्येकाची कारण वेगवेगळी असू शकतील. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ही अशी असंख्य पत्रे आपण साठवून ठेवलेली असतात. अशाच मनाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या असंख्य पात्रातील काही पत्रे आपण आपल्या या "न लिहलेली पत्रे" या मालिकेत सगळ्यांसमोर घेऊन येणार आहोत. आशा आहे कि तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडेल. आणि यातील काही पत्रे तुम्हीसुद्धा तुमच्या हृदयातील एका कप्प्यात बंद केली असतील ती पुन्हा नव्याने समोर येतील. धन्यवाद..
तर "न लिहलेली पत्रे" या मालिकेतील पहिलं पत्र आहे ते एका सर्वसामान्य मतदारच त्याच्या मतदारसंघातल्या लाडक्या ताई;दादा;भाऊ;आबा;किंवा साहेब यांच्यासाठी.

आदरणीय भाऊ यांस;
स.न.वि.वि.
खरतर काल आपण नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या प्रचारासाठी आमच्या गावात आला होता. तेव्हा एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही गावात पहिल्यांदा आला होतात मत मागण्यासाठी तेव्हाच आमचं गाव आणि कालच आमचं गाव यात काहीच फरक नाही हो झाला. हा पण तुमच्यात मात्र चांगलाच फरक झालाय.
पंधरा वर्षांपूर्वी एका जुनाट अश्या जीपमधून आलेले तुम्ही काल जेव्हा आलिशान ऑडी मधून खाली उतरला तेव्हा जाणवलं राजकारणातील प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात ज्या भाऊंचा आम्ही पंधरा वर्षांपूर्वी घरच्या भाकऱ्या खाऊन प्रचार करत होतो ते भाऊ आता त्याच राजकारणात प्रस्थापित झालेत. इतकंच नाही तर आमचे लाडके भाऊ त्याच प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून बसू लागलेत. तेव्हा मनात विचार आला की मागच्या पंधरा वर्षांपासून गावातल्याच माणसांकडे फक्त तो दुसऱ्या पार्टीचा आहे म्हणून ढुंकूनही न पाहणारे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते कुठं आणि मागच्या निवडणुकीपर्यंत एकमेकांचे वाभाडे काढणारे आणि आज अचानक एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे नेते कुठं. तेव्हा उमगलं आमचे भाऊ परिस्थितीशी जुळवून घेत राहिले आणि आयुष्यात पुढे निघून गेले. आणि आम्ही सामान्य कार्यकर्ते मात्र विचारांवर ठाम राहिलो आणि जिथे आहे तिथंच अडकून राहिलो.
असो गेल्या पंधरा वर्षात जरी तुमच्यात भरपूर बदल झाला असला तरी एक गोष्ट मात्र अजूनही तशीच आहे आणि ती गोष्ट म्हणजे अंगात आणि मनात हजार हत्तीचं बळ देणार तुमचं भाषण. मला अगदी लख्ख आठवतंय तुमचं पंधरा वर्षांपूर्वीच ते तडफदार भाषण. काय तडफेने तुम्ही सांगत होतात आपला महाराष्ट्र हा कधीच कुणासमोर झुकणार नाही कुणाचीही लाचारी सहन नाही करणार.... खरं सांगतो भाऊ काय शहारे आले होते तेव्हा. तुमचं तेच भाषण ऐकून तर कॉलेजला दांड्या मारून तुमचा प्रचार केला होता. भावकीतल्या सगळ्या मोठ्या जाणत्या माणसांसमोर तुमच्या त्या शब्दांसाठी उभा राहिलो होतो. आणि मग जेव्हा सगळ्या कठीण परिस्थितीत तुम्ही आपल्या मतदारसंघात प्रस्थापित असलेल्या नेत्याचा पराभव केला होता तेव्हा तुमच्या विजयी मिरवणुकीत काय बेभान होऊन नाचलो होतो मी आणि आपले कार्यकर्ते.
त्या रात्री खरच सुखाची झोप लागली होती वाटत होत आता माझे आणि माझ्यासारख्या अनेक तरुणांचे सगळे प्रश्न सुटणार. आपल्या गावात शिवारात खळखळून पाणी वाहणार. तालुक्याच्या ठिकाणी उद्योग वाढणार आणि आम्हाला नोकरी धंद्यासाठी लांबच्या पुणे मुंबई सारख्या शहरात जावं नाही लागणार. दिवसातले चोवीस तास आम्हाला वीज मिळणार. आमच्या शेतमालाला चांगला भाव मिळणार थोडक्यात काय पण सगळे प्रश्न सुटणार आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार. पण यातलं काहीच झालं नाही हो भाऊ. खरच काहीच झालं नाही. निवडणुकीनंतर जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आम्ही आमचे प्रश्न घेऊन यायचो तेव्हा तुमचं एकच उत्तर ठरलं होत आरे पोरांनो काय करू माझ्या मनात तुमच्या साठी खूप काही करायचं आहे पण आता आपलं सरकार नाही त्यामुळे प्रश्न सोडवायला खूप अडचणी आहेत. आम्हीदेखील तुमचं हे बोलणं आंधळेपणाने मान्य केलं आणि तुम्ही सरकार आणि सत्ताधारी पक्षाविरोधात केलेल्या सगळ्या आंदोलनात घरदार नोकरी धंदा काही न बघता सहभागी झालो. अंगावर अनेक केसेस घेतल्या आहो खरंच भाऊ त्या केसच्या तारखेला मी आणि माझ्या गावातली दहा पोर अजून देखील जातोय न चुकता. त्या केसमुळे आमचं पोलीस रेकॉर्ड झालं आणि चांगल्या मार्काने पास होऊन पण कुठं नोकरी लागणं अवघड होऊन गेलं. पण आम्ही कधीच त्याची पर्वा केली नाही आपल्या नेत्यासाठी पक्षासाठी आणि विचारासाठी घरदार सोडून तुमच्या मागं धावत राहिलो.
मग काय पहिली पाच वर्ष अशीच गेली आणि दुसरी निवडणूक आली. आणि निवडणूक जाहीर व्हायच्या पंधरा दिवस आधीच तुम्ही एक सभा घेतली आणि त्यात सांगितलं जर आपल्या तालुक्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला पक्ष बदलावा लागेल. आम्ही देखील डोळे झाकून घोषणा देऊ लागलो "भाऊ बांधतील ते तोरण आणि भाऊ मांडतील तेच आमचे धोरण".. झालं आता आम्ही एका नव्या पक्षात होतो त्याच पक्षाच्या विरोधात पाच वर्ष लढलो होतो पण आता मनाला समजावत होतो भाऊंनी निर्णय घेतलाय तर विचार करून घेतला असेल. यावेळी भाऊ सत्तेत गेले कि आपले सगळे प्रश्न मार्गी लागतील. याच आशेवर तुमचा जीव लावून प्रचार केला आणि तुम्ही निवडून देखील आलात. आणि जस वाटलं होत तस आपला नवीन पक्ष सत्तेतपण आला. सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून आलेले आमचे भाऊ आता राज्यमंत्री झाले होते. आमच्या डोळ्यासमोर आता सगळ्या मतदारसंघात झालेले चांगले रस्ते; मोठमोठे कारखाने आपल्या गावच्या नदीवर धरण आणि त्या धरणाच्या पाण्यावर डोलणारी आमची शेत असं सुंदर चित्र दिसू लागलं. आणि काही महिन्यातच नदीवर डोंगरात होणाऱ्या धरणाचं भूमिपूजन तुम्ही आणि पंतप्रधानांनी केलं. गावोगावी रस्ते पाणीपुरवठा योजना यांची काम धडाक्यात सुरु झाली. आणि त्याच बरोबर सुरुवात झाली होती तुमच्या आलिशान अशा बंगल्याच्या बांधकामाला सुद्धा.त्याचसोबत तुम्ही एक मोठा खाजगी साखर कारखाना सुद्धा सुरु करत होता. आम्ही विचार केला भाऊंना आपली काळजी आहे आपल्या पोरांना रोजगार मिळावा म्हणू कारखाना सुरु होतोय. धरणाच पाणी आलं कि ऊस लावायचा आणि भाउंच्याच कारखान्यात तो ऊस जाईल. आणि आपल्या हातात चार पैसे यायला सुरुवात होईल. त्यानंतरच्या पाच वर्षात जेव्हा पण आम्ही तालुक्याच्या गावाला आलो कि आमच्या डोळ्यासमोर होता तुमचा आलिशान बंगला त्या बंगल्यासमोरच्या महागड्या गाड्या आणि तुमची राजेशाही जीवनशैली. तेव्हा हळू हळू जाणवू लागलं होत ज्या भाऊला आपण निवडून दिल होत ते भाऊ आता आपल्यासारखे सामान्य नाही राहिले. कार्यकर्त्यांच्या गराड्यात फिरणारे भाऊ आता कंत्राटदार ठेकेदार यांच्या घोळक्यात दिसू लागले होते. आणि अशातच पाच वर्ष कधी संपून गेले ते कळलं देखील नाही. त्या पाच वर्षात धरणाचं आणि कारखान्याचे नुसतं भूमिपूजन झालं बाकी काही नाही. त्याच धरणाचं आणि कारखान्याचं भांडवल करून तुम्ही मग तिसरी निवडणूक लढवायला घेतली. पहिल्या निवडणुकीत जुनाट जीपमधून आलेला आपला भाऊ आता महागड्या सफारी गाडीमध्ये आलेले भाऊसाहेब झाले होते. पण हा बदल आम्ही डोळ्याआड केला आणि मनाला समजावलं की भाऊंनी आपल्यासाठी धरण आणि कारखाना सुरु करण्यासाठी खूप संघर्ष केला तेव्हा आता आपलं मत फक्त भाऊंनाच .
मग काय तिसऱ्यावेळीपण भाऊच आले बहुमताने निवडून आणि यावेळी भाऊ सरळ कॅबिनेट मंत्री झाले. आमच्या सारख्या कार्यकर्त्याला आम्ही केलेल्या संघर्षाला फळ मिळालं असच वाटत होत. मुंबईला तुमच्या बंगल्यावर जेव्हा तुम्ही आम्हाला बोलावून घेतलं तेव्हा काय सांगू किती भारी वाटलं होत आम्हाला. तेव्हा तिथल्या मिटिंग मध्ये तुम्ही सांगितलं आता मंत्रिपदामुळं तुम्हाला मतदारसंघात जास्त लक्ष देता येणार नाही आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलाला म्हणजेच भैय्यासाहेबांना पंचायत समितीचा सभापती करणार आहे. आणि आम्ही सगळ्यांनी जल्लोषात त्याच स्वागत केलं होत. भाऊसाहेबांच्या गैरहजेरीत आपल्याला तालुक्याचा नेता मिळाला याच आनंदात आम्ही गावी परतलो होतो. आणि मग भैय्यासाहेब सभापती झाले आणि त्याचबरोबर तुम्ही चालू केलेल्या कारखान्याचे चेअरमनपण झाले. पंचवीस वर्षाचा कोवळा तरुण आता मन मानेल तसा तालुक्याचा आणि कारखान्याचा कारभार हाकू लागला. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे भैय्यासाहेबांच्या अनेक घोटाळ्यांचे आणि भ्रष्टाचाराचे किस्से सगळ्या तालुक्यात कानावर येऊ लागले. त्याचबरोबर तुमच्या बदललेल्या आलिशान राहणीमानाकडे आता सगळ्यांचं लक्ष पडू लागलं. त्यातच केंद्रात विरोधी पक्षाचं सरकार प्रचंड बहुमताने आलं आणि सुरु झाला एक वेगळाच खेळ. तुमच्या मुंबई पुण्याच्या आणि तालुक्याच्या बंगल्यावर आणि ऑफिसवर आयकर विभागाच्या धाडी पडू लागल्या. थकलेल्या कर्जामुळे तुमचा कारखाना बंद झाला. या सहा महिन्यात इतक्या सगळ्या उलथापालथी झाल्या. आणि अचानक तुम्ही तालुक्याच्या गावात एक सभा बोलावली आणि तालुक्याच्या विकासासाठी दिल्ली मध्ये सत्तेत असलेल्या पक्षात तुम्ही प्रवेश केलात. आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला न विचारता घेतलेला हा निर्णय मनाला काही पटला नाही.
आणि तेव्हाच ठरवलं आता बास पंधरा वर्ष तुमच्यासाठी लाठ्या खाऊन आयुष्याची आणि घरादाराची राखरांगोळी करून काय मिळवलं? ना शेतात पाणी आलं; ना त्या पाण्यावर पिकं डोलू लागली; ना तालुक्यात उद्योग आले ना चांगल्या शाळा दवाखाने आले. पंधरा वर्षांपूर्वी माझा तालुका माझा गाव इतकंच काय माझं घर सगळं जस होत तसेच आहे. बदलले फक्त तुम्ही भाऊ पासून सुरु झालेला प्रवास आदरणीय मंत्री भाऊसाहेब इथपर्यंत आला. जुनाट जीप मधून चालू झालेला प्रवास महागड्या आलिशान ऑडीपर्यंत आला.
मग आता काय राजकारणात पुढे गेलेले तुम्ही तर आता काही थांबणार नाही. तेव्हा मीच मनाशी ठरवलंय आता आपण थांबायचं. घरच्या भाकरी खाऊन कार्यकर्ता नाही बनायचं. आता म्हाताऱ्या आई बापाची काळजी घेणारा श्रावण बाळ बनायचं तर घरातल्या पोरांच्या चांगल्या भविष्यासाठी राबणारा एक बाप बनायचं. आता हेच स्वप्न डोळ्यात ठेऊन हा गाव हा तालुका सोडणार आहे भाऊ. आता तुम्हाला मिळणाऱ्या मतातली माझी आणि माझ्या घरची चार मत कमी होतील फक्त. आणि मला माहित आहे त्या चार मतांनी कदाचित तुम्हाला काही फरक पडणार नाही कारण पैश्याच्या बळावर निवडणूक जिंकायच्या आणि निवडून आले कि पैसे लुटायचे या खेळातले तुम्ही आता मोठे खेळाडू बनला आहात.
असो अजून खूप काही बोलता येण्यासारखं आहे. पण आता इथंच थांबतो कारण तुमच्या लेखी आमची किंमत फक्त एका मताची आहे कि ज्याची गरज तुम्हाला फक्त पाच वर्षानेच पडते.

धन्यवाद.

तुमचाच ;
जुना कट्टर कार्यकर्ता.

🎭 Series Post

View all