Login

नाळ-1

मराठी कथा

"आई, काळजी करू नका. माझी आई निघाली आहे घरून, येईलच तीन-चार तासात"

"काळजी घे गं बाई, एक तर बाहेर इतका मुसळधार पाऊस सुरू आहे, तुला कधीही कळ येऊ शकते.त्यात राघवही घरी नाही. त्यालाही आत्ताच जायचं होतं ट्रेनिंगला"

"अहो आई काळजी करू नका, त्यांना ट्रेनिंगला जाणं खूप महत्त्वाचं होतं. माझी आई, वहिनी आणि भाऊ येतच आहेत"

"देवाने मला चांगलं ठेवलं असतं तर मीच आले असते बघ तुझं बाळंतपण करायला, पण या गुढघ्याच्या दुखण्याने एकाच जागेवर खिळून राहिलीये मी"

"तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, सर्व नीट होईल"

असं म्हणत दोघी सासू सुनांनी फोन ठेवला. राधा स्वतःला नशीबवान समजत होती, अशी जीवाला जीव देणारी माणसं तिच्या अवतीभवती होती. राधाला नववा महिना सुरू होता. डॉक्टरने डिसेंबरची बारा तारीख दिली होती आणि आज एक तारीख होती. तिचा नवरा राघव एका मोठ्या जबाबदारीच्या हुद्द्यावर. त्याला कामातून सुट्टी घेणं अशक्य होतं. बाळाच्या जन्मासाठी दोन दिवस तरी सुट्टी मिळावी म्हणून तो आत्तापासूनच सगळी कामं उरकण्याच्या मागे लागला होता. राधाचे दादा आणि वहिनीही एका हाकेवर धावून येत.

सासूबाईंचा फोन झाला तेव्हा राधा एकटीच घरी होती. राघव सकाळीच निघून गेला होता आणि काही वेळाने तिचे आई, दादा आणि वहिनी तिच्याकडे यायला निघाले होते. सगळं कसं अगदी सुरळीत सुरू होतं, जीवाला जीव देणारी माणसं होती पण ती एक सल, ती एक वेदना अजूनही तेवढीच त्रासदायक होती. वरच्याच मजल्यावर राहणारे तिचे मोठे दिर आणि थोरल्या जाउबाई. घरात मोठा वाद आणि तेव्हापासून त्यांनी तोंड फिरवलेली. दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे पहायलाही तयार नव्हते इतकी कटुता.

तीन वर्षांपूर्वीचा काळ, राधा नवीनच लग्न करून सासरी आली होती. घरातली सगळी माणसं प्रेमळ, म्हणून तिला रुळायला फारसा वेळ लागला नव्हता. तिच्या मोठ्या जाउबाई नंदिनीताई. जाउबाई कसल्या, मोठी बहिणीच जणू. अगदी लहान बहिणीसारखा जीव लावला त्यांनी.

"ती नवीन आहे, येईल हळूहळू, तिला कशाला काम सांगताय? आणा मी करते, राधाला जे आवडतं ते आज बनवणार मी, तो कप माझ्याकडून फुटला, तिची काही चूक नाही.."

अश्या कितीतरी वेळा जाउबाईंनी राधाला आपल्या पदराखाली सुरक्षित केलं होतं. राधाला आई आणि बहीण एकाच व्यक्तीत मिळाले होते.

सगळं कसं सुरळीत सुरू होतं, एकेदिवशी सासूबाई आजारी पडल्या. त्यांना स्वतःची खात्री नव्हती म्हणून पटकन त्यांनी आपलं सोनं बाहेर काढलं आणि दोन्ही सुनांना बोलावून घेतलं.

"नंदिनी, हा राणीहार तुला ठेव आणि राधा..ही अंगठी, हा हार, या बांगड्या आणि हे कानातले तुला देते"

दोघींचा या सर्वांची कधीच लालसा नव्हती. सोनं वाटलं गेलं आणि तिथेच फूट पडली दोन्ही सुनांमध्ये. आपण मोठी सून, आपला मान मोठा, घरासाठी इतकं काही केलं असतांना सासूबाईंनी मला फक्त एक हार द्यावा? आणि काल आलेल्या मुलीला इतकं सगळं सोनं?

"प्रश्न किती सोनं दिलं याचा नाही, तर भेदभावाचा आहे. मी थोरली म्हणून सर्वांची मनं जपली, राधेला सांभाळून घेतलं पण सासूबाईंनी काय केलं? मला माझा मान दिला नाही ना सोनं. मला मान देत त्यांनी समान वाटणी केली असती तर स्वखुशीने मी माझ्याही वाटेचं सोनं राधेला देऊन टाकलं असतं पण इथे प्रश्न मानाचा आहे"

बस, इथपासून प्रत्येकाच्या मनात विष पेरलं गेलं आणि त्याचा शेवट दुराव्यात झाला.

राधेला जेव्हा जाउबाईंची नाराजी समजली तेव्हा त्यांनी सगळं सोनं त्यांना देण्यासाठी पुढे केलं,

"मला याची आस कधीच नव्हती राधे, हे नकोय मला. प्रेम ही अशी गोष्ट आहे ना ज्यात भेदभाव झाला की नात्यांना तडा जाणारच"

जाउबाईंना माहीत होतं की या सगळ्यात राधेची चूक नाही. त्या तिच्याशी वैर ठेवत नव्हत्या पण एकदा असा प्रसंग घडला की त्यांच्यात फूट पडली ती कायमचीच.

राधेच्या माहेराहून काही पाहुणे आले होते. राधेची माहेरची परिस्थिती चांगली असल्याने तिची बोळावण चांगलीच व्हायची. याउलट नंदिनीच्या माहेरी फारसं काही देण्यासारखं नव्हतं. राधेच्या माहेरचे आले तेव्हा त्यांची उत्तम सरबराई सर्वांनी केली. त्याच्या दोन महिन्यांनी जेव्हा नंदिनीचे आई वडील आले तेव्हा नेमकी परिस्थिती अशी झाली की राधेला तिच्या एका सरकारी कामासाठी बाहेर जावं लागलं आणि सासूबाईंची दवाखान्यातली अपॉइंटमेंट अचानक ठरली. या दोघींना ते टाळणं अशक्य होतं पण इकडे नंदिनीच्या मनात नाराजी निर्माण झाली,

"नेमकं याच वेळी दोघींना कसं काम सुचलं?"

नंदिनीने एकटीने आई वडिलांचा पाहुणचार केला. नात्यांमधली कटुता माणूस आपापसात दूर करू शकतो पण त्यात तिसऱ्या व्यक्तीने विष कालवलं तर सगळं उध्वस्त होतं. तसंच काहीसं झालं. नंदिनीची आई नंदिनीला म्हणाली,

"तुझ्या सासूबाईंना आणि जावेला बरं आत्ताच जायचं सुचलं.."

"अगं आई खरंच कामं होती त्यांना.."

क्रमशः

🎭 Series Post

View all