"कसली कामं?"
"राधेला सरकारी कार्यालयात एक कागदपत्र आणायला जायचं होतं आणि सासूबाईंना दवाखान्यात"
"तू ना नंदिनी खरंच खूप भोळी आहेस, तुला कळत नाही त्यांचे डावपेच"
"कसले डावपेच?"
"धाकल्या सुनेला अगदी कवटाळून असतात तुझ्या सासूबाई, तुझ्यासाठी इतकं केलं होतं का त्यांनी कधी?"
"तसं नाही आई"
"तसंच आहे, तुझी जाऊ पण चांगलीच हेकेखोर दिसते मला. तिला हवं तेच करते. आता तू घरातलं सगळं करते म्हणून खुशाल बसून असते ती. कधी मदत करायला येते का पुढे?"
"अगं आई मीच तिला काही करू देत नाही"
"तू करू देत नाही आणि ती करत नाही. वा ! किती गं भोळी तू. असंच वागत राहिलीस तर दोघीजणी कच्चं खाऊन टाकतील तुला"
नंदिनीच्या मनाला आजवर कधीच हे विचार शिवले नव्हते. तरी आईला अजून त्या दागिन्यांचं सांगितलं नव्हतं, नाहीतर आई किती बोलेल याची कल्पनाच न केलेली बरी. नंदिनीने सासूबाई आणि जावेची बाजू सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण अखेर तिच्या आईने तिची प्रत्येक बाजू खोडून काढत नंदिनी कशी गरीब गाय आणि त्या दोघी कश्या मतलबी हेच तिच्यावर बिंबवलं.
याचा परिणाम खूप खोलवर झाला. नंदिनीचं वागणं बदललं. राधेला जीव लावणारी ती आता तिचा धिक्कार करू लागली. सासूबाईंचा शब्द टाळायला लागली. हळूहळू प्रत्येक नातं विस्कटत गेलं.
हे झालं घरातल्या स्त्रियांचं, पण दोन्ही भावांमध्येही आई वडिलांच्या असमान प्रेमाच्या पारड्यामुळे तडा गेला. नंदिनीचा नवरा हुशार असल्याने नोकरी चांगली होती त्याला, पण लहान मुलगा फारसा अभ्यासात रस घेत नसल्याने त्याची जास्त काळजी आई वडिलांना होती. साहजिकच धाकल्या भावाकडे जास्त ओढा आणि थोरल्याकडे दुर्लक्ष असं आई वडिलांचं झालं. पुढे धाकल्यासाठी प्रचंड पैसे भरून त्यांनी एक कोर्स करवून घेतला आणि त्याला मोठ्या पगारावर नोकरी मिळाली. थोरल्यासाठी इतका पैसा खर्च करण्याचा त्यांनी विचारही केला नव्हता पण धाकल्यासाठी मात्र सगळी जमापुंजी खर्ची घातली. ही सल घेऊन थोरलाही घरात वावरत असायचा.
एकाच घरात, एकाच छताखाली अनेक प्रसंग घडायचे, त्या प्रसंगांना सामोरं जातांना नंदिनीच्या आणि तिच्या नवऱ्याच्या मनातील अन्यायाची भावना उफाळून यायची आणि त्या भावनेने दोघे घरच्यांना नको ते बोलून बसायची. राधा आणि तिच्या नवऱ्याचाही अहंकार दुखावला जायचा, धाकले आहोत म्हणून काहीही ऐकून घ्यायचं का म्हणून तेही आता तीव्रतेने वागू लागले. त्यांना कळायचं हे की वागणं चुकीचं आहे, बोलणं चुकीचं आहे, पण नाती की स्वाभिमान यांच्या द्वंद्वामध्ये स्वाभिमान नेहमीच अव्वल राहत गेला.
हे सगळं वाढत गेलं आणि अखेर एकमेकांपासून दूर नेण्यापर्यंत दोन्ही भाऊ वेगळे झाले.
वर्ष उलटत होती. दोन्ही भावांचे आपापले संसार सुरळीत सुरू होते. नंदिनीला दोन मुलं झाली होती. राधा जेव्हा त्या दोन गोंडस जीवांना बघायची तेव्हा आईची माया उमाळून यायची, पण इतिहास डोळ्यासमोर आला की त्या मायेलाही तो झाकोळून टाकायचा.
राधाला दिवस गेल्याचं कळताच नंदिनीच्या मनात आलं की तिला भेटून घ्यावं, जुनं विसरून परत जवळ यावं. मोठ्या जड अंतःकरणाने ती दाराशी गेली. नेमकं ती जायची वेळ आणि हवेने दरवाजा जोरदार आपटण्याची वेळ एकच. गैरमजाची लाट पुन्हा पसरली आणि नंदिनी रागानेच घरी परतली.
राधा आणि नंदिनीच्या सासूबाईंना राधाच्या बाळंतपणाची विशेष काळजी होती आणि ते नंदिनीच्या नजरेतून सुटायचं नाही. नंदिनीच्या वेळी सासूबाईंनी तेवढी काळजी का दाखवली नाही हे नंदिनीला खुपत होतं, पण त्यामागेही एक कारण होतं.
धाकल्या मुलाला जन्मतः एक आजार जडला होता. मोठ्या उपचाराने तो बरा तर झालेला पण त्या काळात सासूबाईंची घालमेल त्यांना आयुष्यभर लक्षात राहिली होती. त्यांना भीती होती की त्याच्या मुलाला आनुवंशिकतेने ते परत यायला नको. त्या काळजीने सासूबाईंचा ओढा राधाच्या होणाऱ्या बाळाकडे जास्त होता. नंदिनीला मात्र हे सगळं कसं कळणार? ती आपली अन्यायाची सल घेऊनच आयुष्य पुढे ढकलत होती.
आई, दादा आणि वहिनीची वाट बघणाऱ्या राधेने सासूबाईंचा फोन ठेवला होता आणि तिच्या मनात हे आधीचं सगळं फेर धरू लागलं होतं. पण तेवढ्यात, अचानक...पोटातून एक कळ गेली..
"नाही..आता नाही.. देवा, थोडा वेळ दे.."
राधा प्रार्थना करू लागली, पण कळा वाढू लागल्या, असह्य झाल्या.
राधेच्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं ,श्वासांची गती वाढू लागली. घरात ती एकटी, शेजारचे गावी गेलेले. कसाबसा तिने फोन हातात घेतला आणि कसलाही विचार न करता नंदिनीचा नंबर फिरवला.
"ताईsssssss"
त्याक्षणी तिला दुसरं कुणीही आठवलं नाही. नंदिनी तिच्या कामात व्यस्त होती. फोनवर अचानक राधेचा नंबर दिसला. नंदिनीची धडधड वाढली, इतक्या वर्षांनी हा फोन? राधाला नववा महिना आहे, सकाळीच दीर बॅग घेऊन जाताना दिसले, घरी कुणी नाही...
सगळे विचार एका क्षणाच्या आत नंदिनीच्या मनात डोकावले, सगळी कल्पना आली आणि हातातलं काम सोडून मोठया वेगाने नंदिनी राधेकडे पळाली.
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा