Login

नाळ-3 अंतिम

मराठी कथा
दरवाजा बंद होता,

"राधा..राधा अगं दार उघड.."

राधाने पोट पकडतच दार उघडलं आणि उघडताच तिने नंदिनीच्या खांद्यावर डोकं टेकवलं.

"ताई..ताई, मला वाचवा"

राधाचं अंग घामाने भिजलं होतं. तिची अवस्था बघून नंदिनी कापऱ्या आवाजात ओरडू लागली,

"माने काका...माने काका..सोन्या जा त्या काकांना बोलाव, त्यांना म्हणा गाडी काढा"

माने काकांनी त्यांची गाडी काढली, सोसायटीच्या बायकांनी दोघींना गाडीत बसवलं. नंदिनीने तिच्या नवऱ्याला पटकन फोन लावून हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं. त्याने पटकन पैसे काढून आणले आणि दवाखान्यात तो पोचला.

"डॉक्टर, पाणी गेलंय.. "

"पटकन आत घ्या.."

डॉक्टर चेक करून आले आणि नंदिनीकडे पाहिलं,

"तुम्ही एकट्याच आहात का?"

"बाकीचे येताय, डॉक्टर लगेच डिलिव्हरी होणार का? काय परिस्थिती आहे?"

"हे बघा, पिशवी फुटली आहे. नॉर्मलचे चान्सेस कमी आहेत. सीझर करावं लागेल, तुमचा निर्णय"

"सीझर करा..."

नंदिनीने पटकन निर्णय दिला. कारण वाट बघण्यात धोका होता. त्याक्षणी आई आणि बाळाचा जीव वाचवणं हे नंदिनीपुढे महत्वाचं होतं.

डॉक्टरांनी राधाला इंजेक्शन दिलं आणि काही वेळाने डिलिव्हरी साठी ओटी मध्ये नेणार असं सांगितलं. राधा कळा सोसत होती. नंदिनीने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली,

"थोडा वेळ फक्त, थोडी कळ काढ"

नंदिनी राधाला धीर देत होती पण राधाचा त्रास जणू ती स्वतः अनुभवत होती. राधा धाप टाकत बोलू लागली,

"ताई..ताई..तो राणीहार..सासूबाईंनी तुम्हाला दिला.."

"राधा ही वेळ नाहीये हे सगळं बोलण्याची, विसर ते सगळं.."

"नाही ताई, बोलू द्या मला.."

"राधा..??"

"हो ताई, तुम्हाला माहित नसेल, पण गावी जेव्हा गेले तेव्हा मला समजलं होतं की तो हार साधासुधा हार नव्हता. आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार घरातील जबाबदार, कर्तव्यदक्ष आणि लायक व्यक्तिकडेच तो हार सुपूर्द करण्यात येतो. आपल्या सासूबाईंना तो हार त्यांच्या सासूने पाच सुनांमधून फक्त आईंनाच दिला होता. त्या थोरल्या नव्हत्या पण जबाबदार होत्या म्हणून..ताई, आम्हा धाकले खूप स्वतंत्र असतो, आपल्या मनाचंच करतो असं वाटतं ना? पण हे सगळं थोरल्यांच्या जीवावरच ना? त्यांच्या छायेखाली आम्हाला सुरक्षित वाटतं म्हणूनच ना? सर्वच जर लहान झाले तर मोठं कोण होणार? तो मान तुमचा होता ताई.."

नंदिनी ते ऐकून सुन्न झाली. तिचा श्वास काहीकाळ थांबला. त्याक्षणी तिला 'थोरली' या शब्दाचं वजन कळलं. एकजण जबाबदार असतो म्हणून इतरांना मनमुराद जगता येतं, एकजण घाव झेलतो तेव्हा इतरांना त्याची झळ बसत नाही. हे 'थोरलेपण' प्रत्येकाच्या वाटेला येत नाही, देवाला वाटतं की हा माझ्याप्रमाणेच सर्वांना सांभाळून घेईल त्या विशेष लोकांना फक्त 'थोरलेपण' तो देत असतो. त्या 'थोरलेपणात' घाव सोसावे लागतात, वाटेत असंख्य काटे बोचतात पण अखेरीस त्या 'थोरलेपणाचा' मान, आदर आणि देवपणाचा मुकुट त्याच्याच माथी विराजमान होतो. ही सगळी जाणीव त्या क्षणात नंदिनीला झाली.

त्या क्षणात राधाने आपल्या मनातलं सगळं बोलून टाकलं होतं, काहीही झालं तरी कुटुंब होतं त्यांचं, एक नाळ त्या सर्वांना जोडून होती.
तेवढ्यात डॉक्टर आले आणि सर्वांनी मिळून राधाला ओटीमध्ये नेलं. जातांना राधा नंदिनीचा हात सोडत नव्हती,
नर्सने अलगदपणे तो हात बाजूला केला, नंदिनी तसाच हात घेऊन उभी राहिली आणि राधा आत गेली. राधाची हातावरची ती घट्ट पकड..तो स्पर्श नंदिनीला थोरल्या बहिणीसारखा जाणीव देऊन गेला.

राधाला नंदिनीवर असलेला विश्वास, काहीही झालं तर जाउबाई आपल्या सोबत असतील हा आधार आणि तुम्ही सोबतच रहा हा आर्जव, हे सगळं त्या स्पर्शात सामील होतं. नंदिनीला तिथेच रडू फुटलं.

एव्हाना राधाचे आई, दादा, वहिनी, दिर आणि इतर नातेवाईक जमले होते. मध्ये ऑपरेशन सुरू होतं आणि बाहेर सगळे वाट बघत होते. राधाची आई आणि वहिनी दरवाजापाशी बाळाची वाट बघत उभ्या होत्या, कधी बाळाला एकदा हातात घेते असं त्यांना झालेलं. नंदिनी एका कोपऱ्यात उभी राहून एकेक क्षण मोजत होती, देवाच्या प्रार्थना करत होती.

"अभिनंदन, मुलगी झाली आहे.."

सर्वजण खुश झाले. नंदिनीच्या जीवात जीव आला.नर्सने बाळाला गुंडाळून बाहेर आणलं आणि स्ट्रेचरवरून राधाला बाजूनेच बाहेर आणत होते. नर्सने विचारलं,

"चला, बाळाला कोण घेणार आधी??"

राधाची आई पुढे झाली, तेवढ्यात अर्धवट शुद्धीत असलेल्या राधाने आपल्या क्षीण स्वरात म्हटलं..

"बाळ त्याच्या मोठ्या आईच्या कुशीत आधी जाईल.."

राधाच्या या वाक्याने सर्वजण अवाक झाले, नंदिनीने ते शब्द ऐकले आणि तिचा ऊर मायेने ओसंडून वाहू लागला. 'मोठी आई' ही अजून एक जबाबदारी तिच्यावर येऊन पडली आणि ही गोंडस जबाबदारी नंदिनीने अलगदपणे नर्सच्या हातातून आपल्या हातात घेतली. त्या इवल्याशा जीवकडे नंदिनी बघतच राहिली..धाकल्या दिरासारखं नाक, मोठ्या काकांसारखे डोळे, सासूबाईंसारखा गोल चेहरा... सगळं कुटुंब तिला त्या एका चेहऱ्यात दिसू लागलं. त्या बाळावर तिने अश्रूंचा वर्षाव केला आणि विशेष म्हणजे काकुकडे बघताच ते बाळ खुदकन हसलं.

समाप्त

अष्टपैलू लेखक स्पर्धा 2025

🎭 Series Post

View all