Login

नाण्यांचा इतिहास

नाण्यांचा इतिहास
नाण्यांचा इतिहास

नाण्यांचा इतिहास फार प्राचीन नाही. शिवाय तो बहुतेक इंग्रजी आगमनानंतरचा आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी इथे सामान्य लोकांचा व्यवहार कवड्यात होत असे. त्यामुळे आपल्या बोलण्यात, मी कुणाचे कवडीचेही देणे नाही, त्याने एक कवडीही फेकून मारली नाही, कवडी चुंबक, "कवडी कवडी माया जोडी" असे शब्दप्रयोग ऐकले असतील. इ. स
१९५६ पासून पैशांचे जुने कोष्टकचं बदलले. कारण दशमान पद्धतीत वजन आणि मापे ज्याप्रमाणे बदलली, त्याप्रमाणे पैशांची कोष्टके पण बदलली. आपल्या प्रमाणेच इंग्लंड अमेरिकेत पण ही दशांश पद्धती आली पूर्वी नाण्यांचे एक कोष्टकचं होते.

या कोष्टकाचा प्रारंभचं मुळी तालासुरावर व्हायचा. सुरुवात कवडी पासून करत होते.
चार कवड्या एक गंडा
दोन गंडे एक टोळी
दोन टोळ्या एक नासरी
दोन नासऱ्या एक अधला
दोन अधले एक पैसा
चार पैसे एक आणा
दोन आणे एकच चवली
दोन चवल्या एक पावली
दोन पावल्या एक अधेली
दोन अधेल्या एक रुपया.

यावरून एका पैशाच्या ६४ कवड्या होत असत. पूर्वीच्या काळात फार स्वस्ताई होती. त्यामुळे नासरी, अधला यांच्या एक दोन वस्तू घ्यायच्या असतील तर पैशाचा विभाग कवड्याने करीत होते. कुंकू, बुक्का कापूर यांच्या लहान लहान पुड्या एका पैशात मिळत होत्या. कवडी लहान, मोठी, पूर्ण वा फुटकी असली तरी तिची किंमत एकच असे. दुकानदारा जवळ कवड्यांचा एक खोकाच असे. टोळी व नासरी यांची नाणी नव्हती. ती केवळ हिशोबा करता वापरली जायची. अधल्याचे मात्र तांब्याचे नाणे होते. हे नाणे पाचव्या पंचम जाॅर्जच्या कारकिर्दीत आले. पै हे लहान आकाराचे नाणे होते. तीन पै एक पैसा असा हिशोब होता. त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात फार कमी उपयोग होत असे. सरकारी हिशोब मात्र रुपये आणि पै असा होता. ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल साधारण सन १८१८ नंतर सुरू झाला. त्यांनी तीनच नाणी प्रथम काढली. एक पैसा, दोन पैशाचे रुपयाच्या आकाराचे एक नवीन नाणे काढले. त्याला ढब्बू म्हणत. ही दोन्ही नाणी तांब्याची होती. रुपया मात्र चांदीचा होता. त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुखवटा होता. त्यावर व्हिक्टोरिया एम्प्रेस असे कोरले जाऊ लागते.

पहिल्या महायुद्धात चांदीचा तुटवटा पडला होता. त्यामुळे दोन आण्याचे निकेलचे मोठ्या चौकोनी आकाराचे नाणे काढल्या गेले होते. याचवेळी बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर इत्यादी राजांनी स्वतःच्या शिक्क्याची तांब्याची नाणी काढली होती. पण इंग्रजी मुलखात ही नाणी चालत नव्हती. संस्थानी राजांनी आपली पोस्टाची तिकिटे पण काढली होती. दिल्ली सारख्या राजधानीत व काशी हरिद्वार सारख्या क्षेत्रात इंग्रजी संस्थांनी चोपडे, धडके सारखे पैसे चालत होते. गोल तांब्याचा तुकडा असला तरी पुरेसा होत असे.

निजामाची मात्र पैसा ते रुपया अशी सारी नाणी होती. त्याकडे इंग्रजी रुपयास कलदार व निजामीस हाळी म्हणत असत. तांब्याच्या पैशास खडकू असे म्हणत होते. हाळी व कलदार रुपयाचे प्रमाण याप्रमाणे होते, हाळी एक पूर्ण रुपया आणि काही आणे दिल्यास त्याचा एक कलदार रुपया होत असे.
चांदीचा रुपया आवाजाने खणखणीत लागत होता. त्यामुळे तो दगडावर वाजवून घेत होते. पुष्कळ वेळा टिचकीने वर फेकून आवाज ऐकत होते. अपेक्षित आवाज नसल्यास त्याला बद्द रुपया म्हणून तो बाजारात चालत नसे. पहिल्या महायुद्धाच्या काळात अडीच रुपयाची नोट पण निघाली होती.

एक रुपयाची चांदीची नाणी कोठे नेणे, आणणे नेहमी जोखमीचे आणि वजनामुळे त्रासदायक काम होते. रुपये ठेवण्याच्या मोठ्या पिशवीस बदरा म्हणत होते. प्रवासात जाताना रुपयाचा कसा किंवा कसनी असे. कसणी म्हणजे एक रुपयाच्या घेराची गळपट्ट्याप्रमाणे विणलेली लांब पुंगळीची पिशवी. त्यात एक एक रुपया बंदोबस्ताने भरावा लागत असे. ती पूर्ण पिशवी आणि तिचे तोंड कशाने बंद करून ती कमरेत गुंडाळ्याची पद्धत असे. मोठे सावकार व बँक ते तराजूत घालून मोजत होते कारण रुपयाचे वजन नक्की असे. यात किंचित जरी फरक दिसला तरी त्या रुपयात खोटी नाणी असावी असे अनुमान होत असे. तज्ञ मंडळी तळहातावर मावेल इतका रुपयांचा ढीग घेऊन धार सोडल्याप्रमाणे तो खाली सोडत होते. आवाजावरून खोटे नाणे हे पटकन ओळखीत होते.

एक रुपया दक्षिणा मिळाली तर 'छत्रपती' किंवा 'वाघाचा डोळा' दक्षिणा मिळाली असा शब्दप्रयोग व्हायचा. ही परिभाषा विदर्भापेक्षा महाराष्ट्रात विशेष रूढ होती. विदर्भात रुपयास नयाद नारायण म्हणत होते. तांब्याच्या पैशास शिवराई म्हणत होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काही नाण्यात जे विशेष परिवर्तन झाले. ते म्हणजे एक आण्याचे कंगोरेदार व दोन आण्याचे चौकोनी पांढऱ्या रंगाचे निकेलचे नाणे चालू झाले. या काळात हे नाणे पिवळ्या रंगाचे व वजनाने हलके झाले. पण धातूत कोणता बदल झाला हे कळले नाही. मात्र व्यापारी लोक ही नाणी वितळून त्या धातूचा उपयोग करू लागले. कारण शंभर नाणी वितळून, शंभर नाण्याची जी किंमत येईल, त्यापेक्षा वितळून केलेल्या धातूची किंमत जास्त येत असे.

पैसा तांब्याचा होता पण त्याचा आकार लहान व वजनाने हलके झाले. पुढे त्याला मधून भोक पाडण्यात आले हा 'भोकाचा पैसा' म्हणून प्रसिद्ध होता. तांब्याच्या धातूत काटकसर करण्यासाठी त्याचा उपयोग झाला होता. राजचिन्ह म्हणून लहानशा मुकुटाची आकृती शिरोभागी राहू लागली. दुकानदार आत दोरा ओवून या पैशाची माळ करून लटकवून ठेवत होते. या भोकाच्या पैशाचे दोन घरगुती उपयोग होते. निरंजनातील फुलवात कलंडून जाऊ नये, म्हणून तो पैसा वरून फुलपातीचे टोक त्यात घालून वातीच्या बुडाशी ठेवीत. त्यामुळे वात शेवटपर्यंत सरळ राहत होती. दुसरा उपयोग म्हणजे मुली आपल्या कपाळावर गोल कुंकू लागावे म्हणून पैशाचा बुट्टा करीत होत्या. परंतु या घरगुती उपयोगाने पैशात तूट पडत असे. पण तुटवटा पडण्यास दुसरे कारण घडले. त्यामुळे हे नाणे संपुष्टात आले. गोल जाडे पेचखिळे बसवताना त्याखाली त्याचा दट्ट्या(डेबरी वाशर) म्हणून सर्रास वापर होऊ लागला. विशेष करून घरावर टीनाचे पत्रे पक्के करताना या नाण्याचा बराच उपयोग होत असे. शेवटी सरकारने हार स्वीकारून हे नाणे बंद केले. त्याऐवजी शासनाने भरीव व लहान आकाराच्या तांब्याचा पैसा काढला. पहिला पैसा निघाल्यावर तो दशमान नाणी सुरू होईपर्यंत पर्यंतच्या काळात बाजारात खुर्द्याची म्हणजे चिल्लर पैशाची दुकाने होती. रस्त्यावर कडेशी एका बैठकीवर दुकानदार बसत असे. त्याच्यापुढे ६३ पैशाच्या चवडी(ढीग) असत. एक रुपया नगदी घेऊन ती चवड तो गिऱ्हाईकास देत असे
त्याचे कमिशन एक पैसा होते.

आणे गेले तरी, पाच आणे, सहा आणे ही परिभाषा सवयीने काही वर्ष कायमच होती. आता ती संपली आहे. या पिढीला तर ती अजिबात माहीत नाही. रूपया आणि पैसे याचा हिशोब मांडताना रुपयासाठी पूर्ण आकडा व अआणे दर्शवण्यासाठी उभ्या रेषा आडव्या रेषांचा उपयोग करीत होते. एका पैशापासून तो पावणे १६ आणे पर्यंत अशी पद्धत प्रचलित होती.

संकलन
सौ. रेखा देशमुख
0