Login

नारी रूपेण संस्थिता (भाग १)

कथा स्त्रीची
नारी रूपेण संस्थिता (भाग १)


“संध्या!” कांताबाई ओरडल्या तशी दारातून बाहेर पडणारी संध्या दारात थबकली.


“काय झालं आई?” संध्या त्यांना म्हणाली.


“शोभतं का तुला हे?” कांताबाई गरजल्या. त्यांचा बोलायचा ओघ संध्याला लगेचच कळाला.


“मनु, तू पार्किंग मध्ये खेळ हां. मी आजीसोबत बोलून लगेच येते. गेटच्या बाहेर जाऊ नको हां.. मी आलेच बघ.” संध्या आपल्या पाच वर्षांच्या मुलीला मनस्वीला म्हणाली. तशी मनस्वी लगेचच जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली गेली. संध्या दारातून आत आली आणि तिनं दाराला कडी लावली.


“बोला आता आई, काय म्हणत होत्या?” संध्या कांताबाईंना म्हणाली. एव्हाना सुरेशरावही तिथं येऊन उभे राहिले होते.


“अगं जनाची नाही तर मनाची तरी ठेव जरा.” कांताबाई परत गरजल्या.


“जनाची आणि मनाची ठेवलीच आहे म्हणून दार लावून घेतलंय. तुमचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून.” संध्या


“वा! ह्याला म्हणतात चोर ते चोर वरून शिरजोर. काय समजतेस गं तू स्वतःला?” कांताबाईंचा आवाज वरच होता.


“तुम्ही मला जे समजता त्यापेक्षा स्वतःला चांगलंच समजते.” संध्या


“अगं नवरा जाऊन सहा महिनेही नाही झालेत आणि निघाली लगे दांडिया खेळायला. एवढ्या उड्या मारायला तुला जराही लाज नाही वाटली. बरोबर आहे म्हणा, कशी वाटेल. तुझा स्वतःचा मुलगा गेला असता तर तुला काही वाटलं असतं. तसंही माझ्या मुलाला कधी दोन घास सुखाचे खाऊ दिले नाहीस… सारखी त्याच्या मागे मागे राहायची… कधी त्याला पेलाभरून पाणी दिलं नाहीस… तुला त्याच्या जाण्याचं दुःख काय वाटणार?” कांताबाई बडबडत होत्या. संध्याच्या डोळ्याला मात्र अश्रूंची धार लागली होती.


भूतकाळाची पानं अगदी पटापट पलटून जणू मागे गेली होती. आयुष्याचं चित्र अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं होतं.


रवी… संध्याचा नवरा… कांताबाई आणि सुरेशरावांचा एकुलता एक मुलगा…


संध्या आणि रवी शिकायला एकाच कॉलेजमध्ये होते. संध्या दिसायला अगदी सुंदर… चाफेकळी नाक, बोलके घारे डोळे, गुलाबांसारखे ओठ, रेशमी लांबसडक केस तिच्या गोऱ्या रंगात अजूनच भर घालत होते.

कॉलेजमध्ये अगदी पहिल्यांदा पाहिल्यापासून रवीला संध्या आवडली होती. त्यानं तिच्यासोबत मैत्री केली. आणि हळूहळू मैत्री प्रेमात कधी रूपांतरित झाली दोघांनाही कळलं नाही.

बघता बघता कॉलेजचे दिवस भुर्रकन उडून गेले. कॉलेज संपल्यानंतर काही दिवसांनी रवीला एका खाजगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून नोकरी लागली होती. संध्याच्या घरीही तिच्यासाठी लग्नासाठी स्थळं बघणं सुरू झालं होतं.


एक दिवस संध्याने मोठी हिम्मत करून रवीच्या आणि तिच्या नात्याबद्दल घरात सांगितलं. संध्याच्या आईने ह्या नात्याला विरोध केला. पण संध्याचे वडील मात्र तिच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी रवीला घरी भेटायला बोलावलं. तोपर्यंत त्याची जमेल तेवढी माहिती काढली. रवी एका सुसंकृत घराण्यातला आणि एकुलता एक मुलगा होता. संध्याच्या वडिलांनी तिच्या आईची समजूत काढली.

रवी घरी भेटायला आल्यावर त्याच्या मोकळ्या, बोलक्या स्वभावाने त्याने घरातल्या सगळ्यांची मनं जिंकली.

नंतर संध्याच्या वडिलांनी रवीच्या घरच्या लोकांना रीतसर मुलगी बघायचं आमंत्रण दिलं. आणि संध्या आणि रवीचं लव्ह कम अरेंज मॅरेज झालं.

संध्या आणि रवीचा सोन्याचा संसार सुरू झाला. एकुलता एक असल्याने रवीला घरातली कोणतीच कामं करायची सवय नव्हती. कांताबाई अगदी पाण्याच्या ग्लासपासून सगळं त्याच्या हातात देत होत्या.


नवीन लग्न झाल्यावर संध्याला थोडं वेगळं वाटलं कारण संध्याच्या घरी अगदी तिच्या वडिलांपासून सगळेजण घरातल्या प्रत्येक कामात मदत करत होते. रवीकडे मात्र सुरेशराव आणि रवी घरातल्या कोणत्याच कामात मदत करत नसत. संध्या जॉब करत नव्हती तोपर्यंत तिला हे सगळं सांभाळणं सोपं जात होतं. तिचा जॉब सुरू झाल्यावर मात्र घरकाम आणि नोकरी ह्यात तिची तारेवरची कसरत होऊ लागली होती. आणि त्याचाच परिणाम तिची चिडचिड वरचेवर वाढत जात होती.


एक दिवस सकाळी घरातलं आवरता आवरता ती कांताबाईंना म्हणालीच,

“आई, तुम्ही रवीला अगदीच लाडावून ठेवलंय. साधं पाणीही घेत नाही तो आपल्या हाताने. सगळ्या गोष्टी त्याला हातात द्याव्या लागतात. लहानलेकरासारखं अगदी सॉक्स, रुमाल वगैरेही त्याच्या हातात द्यावं लागतं.”


“काय बिघडतं दिलं की… अगं पुरुष एवढी मेहनत करून घरासाठी पैसे कमवून आणतो मग त्याच्या हातात सगळं दिलं तर काय बिघडलं?” कांताबाई तिला म्हणाल्या.


“मग तसं तर मीही ह्या घरासाठी पैसे कमावून आणते, तुम्ही घरातली सगळी कामं करून घरासाठी चार पैसे वाचवता… मग त्या न्यायाने आपल्याही हातात सगळं मिळायला हवं नाही का?” संध्या कांताबाईंना म्हणाली आणि त्यांचं उत्तर काय येतं हे न ऐकता स्वतःचा डब्बा घेऊन ऑफिससाठी निघून गेली. कांताबाई मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत राहिल्या.