Login

नारी रूपेण संस्थिता (भाग २)

कथा स्त्रीची
नारी रूपेण संस्थिता (भाग २)

“मी तुला सकाळीच म्हटलं होतं ना की हा टावेल असा बेडवर नको टाकत जाऊस.” ऑफिसमधून आल्या आल्या संध्या रवीवर बरसली.

“सॉरी, सुकत टाकणार होतो पण विसरलो.” रवी तिला म्हणाला.


“रोजचंच आहे रवी तुझं… जराही घरकामात हातभार लावत नाहीस… अरे तुझ्याएवढं रादर तुझ्यापेक्षाही जास्त काम करते रे मी… घरातलं, ऑफिसमधलं… आणि आता तशी परिस्थिती नाहीये की सगळं मी एकटीने रेटून नेईल… माझ्यासाठी नाही तर माझ्या उदरातल्या आपल्या अंशासाठी तरी मला मदत करत जा.” संध्या रवीला म्हणाली.


“काय! काय म्हणालीस!” रवी


“हो रवी, तू बाबा होणार आहेस… हे बघ हे रिपोर्ट… मला शंका आलीच होती… पिरियड्सही चुकले होतेच आणि सोबत थोडा थकवाही जाणवत होता म्हणून ऑफिस सुटल्यावर येताना डॉक्टरला दाखवून आले.” संध्या लाजत म्हणाली.


“संध्या… किती गोड बातमी दिलीये तू… तू बस इथं. रवीनं बेडवरचा टावेल उचलला आणि वाळत टाकला.


“आता तू ना फक्त ऑर्डर सोडायची… बघ मी सगळं करतो की नाही…” रवी तिला म्हणाला. संध्यानं हसून मान डोलावली. दोघांनी मिळून घरात ही बातमी सांगीतली. संध्याच्या आईबाबांनाही गोड बातमी कळवली. दोन्ही कुटुंबात आनंदाला अगदी उधाण आलं होतं.


त्यादिवशीपासून रवीच्या वागण्यात बराच बदल झाला होता. रवी आता घर कामातही मदत करायला लागला होता. घरातली, बाहेरची सगळी कामं जबाबदारीने करायला लागला होता. कांताबाईंना मात्र आपला मुलगा आपल्या हातातून निसटून सुनेच्या ताटाखालचं मांजर होतंय असं सतत वाटत होतं.

बघता बघता संध्याचे नऊ महिने पूर्ण भरले आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

मनस्वीच्या येण्याने रवी मात्र अजूनच जबाबदार झाला. अगदी बाळाचं डायपर बदलण्यापासून सगळ्या कामात ऑफिस सांभाळून तो संध्याला मदत करत होता. कांताबाई आणि सुरेशरावांनाही मनस्वीचा लळा लागला होता. तिच्या बाललीलांनी सगळ्या घराचं गोकुळ झालं होतं.

बघता बघता मनस्वी पाच वर्षांची झाली होती. रवीनं तिचा पाचवा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला होता. सगळं काही सुखकर आणि सुस्थितीत सुरू होतं. पण केवळ सुखकारक असतं ते आयुष्यचं नसतं.

काही दिवसांपासून रवीला तिव्र डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. रवी त्याकडे दुर्लक्ष करत होता पण संध्या त्याला जबरदस्ती दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरांनी त्याला पाच दिवसांचं औषध दिलं पण रवीच्या डोकेदुखीत काही फरक पडला नाही. डॉक्टरांनी त्याला डोक्याचा एम् आर आय करायला लावला आणि डॉक्टरांची शंका खरी ठरली.


रवीच्या मेंदूत गाठ झाली होती. ती गाठही अश्या ठिकाणी होती की ऑपरेशन करताना रवीच्या जीवाला धोका होता. रवीचं ऑपरेशन करायचं की नाही ह्याबद्दल घरात दुमत झालं होतं.


“हे बघा, काहीही झालं तरी आपण ऑपरेशन करणार नाहीये. तुम्ही ऐकलं नाही का, डॉक्टर म्हणाले की फक्त वीस टक्के चांसेस आहेत.” कांताबाई रडतच सुरेशरावांना म्हणाल्या. संध्या तिथंच उभी होती.


“पण कांता, ऑपरेशन नीट झालं तर रवीच्या आयुष्यातला मोठा धोका टळणार आहे. तू ऐकलं नाहीस का डॉक्टर हेही म्हणाले की ऑपरेशन केलं नाही तर ती गाठ कधीही फुटू शकते आणि नंतर मात्र सगळं अवघड होणार आहे… समजा गाठ फुटली तर त्यानंतरही आपण काहीच करू शकणार नाही.” सुरेशराव कांताबाईंना समजावत होते.


“गाठ फुटण्याची शक्यता आहे… गाठ फुटेलच असं नाही ना…” कांताबाई


“कांता, डॉक्टरांना जे वाटेल ते आपण करायला पाहिजे. संध्या तुला काय वाटतं?” सुरेशराव संध्याला म्हणाले. संध्या मात्र रडतच तिथून निघून गेली.

आपल्या डोक्यात गाठ आहे आणि त्याचं ऑपरेशन रिस्की आहे हे एव्हाना रवीला कळलं होतं. तो मात्र ऑपरेशनची रिस्क घ्यायला तयार होता.

दुसऱ्यादिवशी सकाळी त्याचं ऑपरेशन ठेवलं होतं. हॉस्पिटलमध्ये संध्या त्याच्याजवळ थांबली होती.

“संध्या, मला ना आपल्या मनुसाठी खूप जगायचंय… तिचं शिक्षण, लग्न… तिचे मुलबाळ सगळं काही बघायचं आहे आणि म्हणूनच मला ही रिस्क घ्यायची आहे. होईल ना गं मी बरा? आणि समजा ऑपरेशन थिएटरमध्ये गेलेला मी परत आलोच नाहीत तर माझी सगळी स्वप्नं तू पूर्ण करशील ना? तू आहेस तशीच राहशील ना? माझ्या आईवडिलांचा सांभाळ, मनुचा सांभाळ करशील ना गं? मी नाही म्हणून तू मात्र मन मारून जगायचं नाहीस… तुला वाटेल ते, आवडेल ते तू सगळं करशील ना? अगदी दुसरं लग्नही…” संध्याचा हात हातात घेऊन रवी बोलत होता. संध्याच्या डोळ्यातून मात्र अश्रू अविरतपणे झरत होते.


दुसऱ्या दिवशी पहाटेच रवीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. ऑपरेशन थिएटरमध्ये हसत गेलेला रवी गेला तो अगदी कायमचाच…