Login

नारी रूपेण संस्थिता (भाग ३ अंतिम)

कथा स्त्रीची
नारी रूपेण संस्थिता (भाग ३ अंतिम )

रवी गेल्यावर मात्र जणू सगळं आभाळ कोसळलं होतं. संध्या मात्र कणखर उभी होती. मनस्वीसाठी तिनं स्वतःला सावरलं. घर सावरण्याचा ती प्रयत्न करत होती. घरातल्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी संध्या पार पाडत होती. काही दिवसांत तिनं ऑफिसला जायला सुरुवात केली. कांताबाईंना मात्र तिचं ऑफिसला जाणं, रवी असताना ती जशी राहायची तसं राहणं आवडत नव्हतं.

कांताबाई संध्याला जमेल तेव्हा आणि जमेल तेवढे बोल लावत होत्या. संध्या मात्र होईल तेवढं दुर्लक्ष करत होती.
रवी जाऊन जवळपास सहा महिने होत आले होते.

अशातच संध्याच्या ऑफिसमध्ये देवी बसवली होती आणि रोज संध्याकाळी तासभर तिथं दांडियाचा कार्यक्रम होणार होता. खरंतर ह्या सगळ्यात भाग वगैरे घ्यायची तिची मुळीच इच्छा नव्हती. पण संध्याची मैत्रीण तिला म्हणाली,


“संध्या किती दिवस दुःख कवटाळून बसणार आहेस. अगं जरा लेकीकडं बघ, बाप नाही म्हणून किती भांबावून गेलीये ती… इकडे येत जाशील तर तेवढाच थोडा विरंगुळा होईल तुला आणि मनूलासुद्धा. तूच सांगतेस ना, की रवीनं जाण्याआधी तुला म्हटलं होतं की तू आहेस तशीच राहा… मग काय वाईट आहे यात… तू रोज संध्याकाळी ये, सोबत मनूला पण घेऊन ये. तुझे सासू सासरे आले तर त्यांनाही आण…” संध्याला मैत्रिणीचं बोलणं पटलं होतं. आणि म्हणूनच ती तयार होऊन निघाली होती. तेवढ्यात कांताबाईंनी तिला अडवलं होतं.


“किती सहज म्हणालात ना की रवी फक्त तुमचा मुलगा होता… माझा कुणी नव्हता का रवी? जीवनसाथी गमावण्याचं दुःख कदाचित तुम्हाला कळणार नाही. मुळात तुमचं असो की माझं कोणतंच दुःख लहान मोठं नसतं. पण म्हणून दुःखालाच कवटाळून बसायचं का? हो, जातेय मी बाहेर… पण मजा मारायला नाही… माझ्या मनाला, मनुच्या मनाला रवी नसण्याच्या दुःखापासून दूर नेण्याकरता… मला वाटलं एक स्त्री म्हणून तरी तुम्ही मला समजून घ्याल पण तुम्ही नाही समजून घेतलं. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते हे म्हणतात ते काही खोटं नाही. रवी गेल्यानंतर माझं कणखर उभं राहणेच तुम्हाला पटलं नाही. एका विधवेनं कसं जगायला हवं हेच तुम्ही मला सांगत आलात. विचार करा, मी नोकरी नाही केली तर माझ्या मनुचं शिक्षण, तुमच्या औषधी गोळ्यांचा खर्च कसा निघणार?


दुःख खूप मोठं असतं हो म्हणून काय त्याला सतत कुरवाळत बसणार का? आपल्या दुःखातून आपणच बाहेर पडावं लागतं आई… पण आज मात्र तुम्ही हरलात… एक स्त्री म्हणून तुम्ही सपशेल हरलात… खरंतर आता माझ्यामागे तुम्ही कणखर उभ्या असायला हव्यात… पण तुम्हाला तुमची बुरसटलेल्या विचारांची चौकट मोडायचीच नाहीये. आज तुम्ही सकाळी देवीची ओटी भरलीत पण मला कुंकू लावलं नाहीत. का? माझा नवरा गेला म्हणूनच ना? मुलगा गेला ना तुमचा मग तर दुःखात तुम्ही देवीची ओटी भरायलाच नको होती. तुम्ही तर सगळं करताय. आज दुपारी तुम्हीपण पिवळी साडी घालून देवीच्या गोंधळात गेलाच होतात ना?

खरंतर तुम्ही जायलाच नको होतं; पण तुम्ही तसं केलं नाहीत. नवरा असताना त्याच्या जीवावर सगळीकडे मिरवणं सोपं असतं हो; पण नवरा नसल्यावर सगळं मिळवणं खूप कठीण… आणि आपल्या समाजात मात्र नवऱ्याच्या जीवावर बांडगुळासारख्या जगणाऱ्या स्त्रीचा सवाष्ण म्हणून मानपान होतो. नवरा नसलेली, कणखर उभी राहून घरदार चालवणारी, मुलांना मोठ्या कष्टानं उभं करणारी स्त्री मात्र दोन बोट कुंकवासाठी उपेक्षित ठेवली जाते.

आई, आज तुम्हीही त्याच सगळ्या समाजाच्या रांगेत जाऊन बसलात. खरंतर रवी गेलाय आता. हे घरदार सोडण्यापासून मला कुणीही अडवू शकत नाही; पण रवीचे आई बाबा ते माझे आई बाबा आणि रवीला दिलेल्या वचनासाठी, त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी मी इथं थांबून आहे.

असो, कुणी मला काय बोलेल, काही म्हणेल ह्याकडं मी लक्ष देणं कधीचच सोडलं आहे. नवरात्रीचे नऊ दिवस दांडिया खेळल्यानंतर आम्ही माय लेकी कराटेच्या क्लासला जाणार आहेत… तुम्हाला कदाचित त्याचं महत्व पटणार नाही… पण ती गरज आहे आजची… येते मी.” संध्या दरवाजा उघडून बाहेर गेली.


खाली जाऊन तिने पार्किंग मधली तिची स्कुटी काढली. मनूला मागच्या सीटवर बसवलं आणि एक मोठा स्कार्फ मनुच्या मागून घेऊन स्वतःच्या कम्बरेला बांधला. डोक्यावर हेल्मेट लावलं आणि गाडी काढून ती निघाली.


सुरेशराव तिला खिडकीतून बघत होते.


“बरोबर बोलली संध्या. घरातल्या एका स्त्रीच्या मनाचा कवडीचाही विचार न करता केलेली देवीची पूजा खरंच पूर्णत्वास जाईल काय…? ज्या स्त्रीणं स्वतःतली नारी शक्ती ओळखली त्याच बरोबर आपल्या बरोबरीच्या स्त्रीतल्या नारी शक्तीचा सन्मान केला तीच खरी देवी… नाही का?

या देवी सर्वभूतेषु नारी रूपेण संस्थिता|
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||