नात टिकतचं भाग १

विवाह प्रेम असो की अँरेंज, शेवटी माणुस महत्वाचा
आज सकाळपासून तिचा चेहरा आनंदाने खूपच खुललेला होता. आज त्याची तिच्या सासरी पहिली दिवाळी साजरी होत होती. तसं तर तिला तिच्या सासरी येऊन दोन वर्ष झालेली होती. पण ह्या वर्षीच तिच्या या सासरच्या घरातल्यांनी तिला मनापासून सून म्हणून स्वीकारलेले होते. आजची दिवाळीतली लक्ष्मीपुजाची पूजा ही तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या हातून घातली जाणार होती. म्हणूनच की काय सकाळपासूनच तिची खूपच लगबग चालू होती. पूजेच्या अधीकारापेक्षा तिला खरा आनंद तिच्या सासरी तिला स्वीकारण्याचा झालेला होता.

दोन वर्षापुर्वी ती म्हणजे आराध्या सुमितच्या घरी प्रेमविवाह करून आली होती. घरच्यांचा खूपच विरोध होता. त्यातल्या त्यात सुमितचे आजोबा तर सुमितवर रागावून बसलेले होते. तब्बल महिनाभर ते सुमितसोबत बोलले नव्हते. पण सुमितही त्यांचंच तर रक्त होत. तो देखील तितकाच हट्टी होता. त्याच्या गोड गोड बोलण्याने त्याने घरातल्यांना त्याच्या लग्नासाठी तयार केल होत. इतकचं नाही तर आराध्याच्या घरी देखील सुमितनेच सर्वांना मनवलेल होत. आता तिचा स्वतःचा हक्काचा नवरा सोबत होता. त्यामुळे तिने बाकीची काही काळजी केली नव्हती.

सुरवातीचे नवीन मोहक दिवस संपले. हनिमुनसाठी शिमला मनालीलाही जाऊन आले. घरी आल्यावर आराध्याला आता जरा टेन्शनच आलेल होत. लग्नासाठी जरी परवानगी मिळवली होती. तरी ते जरा मनाविरुध्दच होती. सुमित तर दिवसभर त्याच्या कामासाठी घराबाहेर राहील. घरातली धुरा आता तिलाच सांभाळावी लागणार होती. घरात एकत्र कुटुंब पध्दती होती. आजी आजोबा, सुमितचे लहान काका काकु त्यांची एक मुलगी आणि एक मुलगा. तर सुमित एकुलता एक. त्यामुळे घरात सर्वात लहान आणि एकुलती एक बहिण म्हणुन सानिका जास्तच लाडकी होती.

आराध्याच्या घरी मात्र उलटं होत. ती तिचे वडील आणि आई बस. त्यामुळे ती आपल्या या एकत्र कुटुंबात कशी रमेल हीच चिंता घरातल्या सर्वांच्या डोक्यात पिंगा घालत होती. तसच आराध्याच्या आई वडीलांना ही हिच चिंता होती की एवढ्या मोठ्या कुटुंबात ती कशीकाय स्थिरावेल? तिला जमेल का? आई वडीलांना शेवटी काळजी लागुन राहतेच की.

आराध्यावर आता जबाबदारी आलेली होती. येणारी परिस्थिती बघून पळ काढणारी ती नक्कीच नव्हती. आपल्या घरातले इतकेही दुष्ट वागणार नाहीत. याची जाणीव सुमितला होती. म्हणुनच तर त्याने हे धाडस केलेलं होत.

आराध्यासाठी एक गोष्ट जमेची होती की तिला ब-यापैकी स्वयंपाक करता येत होता. आराध्याचे सुरवातीचे काही महीने सर्वांच्या आवडीनिवडी समजण्यातच गेले होते. घरातलेही तिला तितकचं समजून घेत होते. हा आजी आजोबा तेवढे चुका काढत होते. पण ते इतकही बोलत नव्हते की आराध्याच्या मनाला लागेल. त्यामुळेच आराध्याच्या मनातुन खडूस सासर ही कल्पना निघून गेली होती. आता तिला फक्त त्यांच्या नवरा बायकोच्या निर्णयावर खरं उतरायचं होत. यात तिला सुमितची सोबत होतीच.

घरातल्या निम्म्या कामाचा भार आराध्याने स्वतःच्या खांद्यावर घेतलेला होता. घरात नाही तिला कोणी भांडत होते आणि नाही कोणी टोमणे मारत होते. फक्त कामापुरती बोलण व्हायचं इतकचं. त्यामुळेच तिला त्या घरात आपलेपणा अजून जाणवत नव्हता.

घरात व्यवस्थित रुळल्यानंतर तिला दुपारी निवांत वेळ मिळत होता. त्यामुळे तिने तिचा जॉब पुन्हा चालू करायचा विचार केला. पण तिच्या त्या जॉबला घरातले मान्यता देतील का? हा प्रश्न तिला पडायला लागला. एके रात्री सुमितच्या कुशीत असताना तिने तिचा विचार सुमितसमोर मांडला.

“अंग! आपला एवढा मोठा बिझनेस आहे की.” सुमित तिला समजावत बोलला. “मग पैशांची गरज काय आपल्याला?”

“गरज म्हणून नाही रे.” आराध्या “दुपारी निवांत वेळ असतो. तोच वेळ माझ्या छंदासाठी द्यावा म्हणते.”

“ह्म्म.” सुमित विचार करत बोलला. “बघतो बोलून घरात. नाहीतर असही तुझा चेहरा काही दिसत नाही त्यात. मग दुपारच्या वेळेत तु करू शकतेस ना.”

सुमितच्या एवढ्याच वाक्याने आराध्याच मन आनंदाने बहरून गेलं होतं. दिवसांवर दिवस चालले होते.

‘सुमितची निवड इतकी पण वाईट नाहीये.’ एके दिवशी सकाळच्या नाश्त्याला बसलेले असताना सुमितचे आजोबा मनात विचार करत होते. पण बाकी जणांच मत जाणल्याशिवाय ते काहीच बोलणार नव्हते. आजी तर अजूनही काहीना काही चुका काढतच होत्या. त्याही हसत खेळत बोलुन दाखवत होत्या.

“शिक्षण किती तुझ?” आजोबांनी एक दिवस आराध्याला विचारलं. तस आज्जीने त्यांच्याकडे प्रश्नार्थक पाहील.

“कॉम्प्युटरमध्ये पदवीधर आहे.” आराध्या हळुच बोलली.

“मग नवऱ्याला त्याच्या कामात जरा मदत कर.” आजोबा पेपर वाचत बोलले. “असही दुपारी घरात वेळ असतोच की.”

“पण घरातली काम?” आराध्या “त.. ते एकदाच लोड येईल ना माझ्यावर.”

“किती नाजुक ना.” आजी पाणी पित बोलल्या.

ते ऐकुन आराध्याचा चेहराच पडला.

“काय सरकार, चेष्टा काय करता सुनबाईची.” आजोबा आज्जीला हसत बोलले. “मग विचारायलाच का लावलत?”

आजोबांच्या वाक्याने आराध्याने आश्चर्याने आज्जीकडे पाहील. तेव्हा कुठे आज्जी हलकेच हसल्या होत्या.

“कामाच बोलशील तर आपण एक कामवाली नक्कीच ठेवू शकतो.” आजोबा वाचून झालेला पेपर खाली ठेवत बोलले. “बघा विचार करा.” आराध्याकडे बघून ते आजीसोबत घराबाहेर पडले.

आराध्या मात्र आता काय घडलं? याचा विचार करत बसली.

एके दिवशी सानिका हळुच आराध्याच्या रुममध्ये डोकावली. दुपारची वेळ होती. घरातली पुरुष मंडळी सगळीच बाहेर होती. सुमितची आई, मोठी काकी, आजी आजोबा त्यांच्या रुममध्ये दुपारची वामकुक्षी घेत होते.

सानिकाच्या चेहऱ्यावर जरा टेन्शनच होत. आराध्याची नजर तिच्यावर पडली. तशी ती अजूनच घाबरली.

“सानिका.” आराध्याने तिला प्रेमाने आवाज दिला. “ये ना आत.”

सानिका जरा घाबरतच घाबरतच तिच्यासमोर गेली. तोपर्यंत आराध्या तिच्या कॉम्प्युटर समोरून उठली आणि सानिकाच्या समोर आली. तिला घाबरलेच बघुन काहीतरी बिनसल्याचं आराध्याला जाणवलं. सानिका नुकतीच कॉलेजला जाऊ लागली होती. तिच मन ही कोवळ होत. आराध्याच एक चुकीच वाक्य तिला सानिकापासुन लांब नेणारं होत.

“बोल ना.” आराध्याने तिला बेडवर बसवलं. “काय झाल? काही टेन्शन आहे का? मी करते ना मदत. कोणाला म्हणजे कोणालाच सांगणार नाही. अगदी पिंकी प्रॉमीस.”

आता सानिकाला जरा धीर आला. तिने तिच्या पाठीमागचा हात हळुच पुढे केला. आराध्याने तिच्या हातात पाहीलं तर ते आराध्याला मिळालेले जरा मोठ अस काचेच शोपिस होता. जे आता पुर्ण तुटलेलं होता.

आजवर आराध्यासोबत तिच इतकही बोलण झाल नव्हतं की ती नक्की रिॲक्ट करेल हे सानिकालाच माहीत नव्हतं. पण घरात मिळालेल्या संस्कारांनी तिला खरं बोलण्यासाठी आराध्याजवळ आणलं होत. पण आराध्याचा चेहरा बघून तिला अजूनच टेन्शन यायला लागलं.

क्रमशः

🎭 Series Post

View all