नात टिकतचं अंतिम भाग

विवाह लव्ह असो वा अरेंज शेवटी माणुस महत्वाचा
मागील भागात.

सुमितची आई आराध्याचा असा रागातला अवतार पहिल्यांदाच बघत होती.

“ए म्हतारे तझ्या मुलीला घेऊन जा इथुन.” भाजीवाला बोलून थांबला ही नसेल तोवर त्याच्या कानाखाली जाळच निघाला होता. आता बाकीची माणसं ही त्या भाजीवाल्याला चांगलेच भांडु लागले होते.

“पुन्हा एक शब्द जरी बोललास ना तर सगळेच दात पाडुन तुझे.” आराध्या “माझ्या आईला म्हातारी बोलतोस.”

सुमितची आई आता तिच्या या सुनेकडे कौतुकाने बघे लागली. ‘तिने तर आपल्याला मानापसुन स्विकारलं पण आपण?’ हा विचार येताच त्यांचे डोळे भरले गेले होते. त्यांनी मग त्याच आईची शपथ घालून तिला तिथुन घरी आणले होते. घरी आले होते तरी तिची चिडचिड चालूच होती.

आता पुढे.

“तो सरळ सरळ काटा मारून एक किलोच्या भाजीऐवजी पाऊण किलो देतोय.” आराध्या “तरी तुम्ही काहीच का बोलल्या नाहीत? घाम गाळुनच पैसे कमवतोय ना आपण.”

आराध्याची ही चिडचीड बघून सुमितची काकु, आजी, आजोबा जरा टेन्शनमध्येच आले. पण सुमितच्या आईने नजरेनेच त्यांना नंतर सांगते अस खुणावत आणि आराध्याला थंड अस लिंबु सरबत दिल. सरबत पिल्यावर आपण काय केल? आणि काय बोलून गेलो? याची जाणीव आराध्याल झाली. सुमितच्या आईने जे काही झाल ते सगळेच सांगीतल्यावर बाकी तर टेन्शनमुक्त झाले पण आता आराध्या टेन्शनमध्ये आली. तिने सरबताचा ग्लास हळुच किचन ओट्यावर ठेवला आणि तिच्या रुमकडे पळत सुटली. सोबत जीभ चावलेली होतीच. तिला अस जाताना बघून बाकी तिघी मात्र हसायला लागल्या होत्या.

“सुमितचे निर्णय आजवर खरीच चुकले नाहीत.” आजी अभिमानाने बोलल्या.

दिवसांवर दिवस चालले होते. आराध्याला घरात आपलेपणा जाणवु लागला होता. तिच्या चेहर्‍यावरचा आनंद बघून सुमित ही हळुहळु त्याला असलेल्या टेन्शनमधून बाहेर पडत होता.

काही दिवसांनी घरातली पुरूष मंडळी सकाळीच जरा टेन्शनमध्ये बसलेली तिला दिसली. तिने हळुच सानिकाला विचारलं. तर तिला समजलं की एका ग्राहकाने वेळेवर पैसे न दिल्यामुळे बँकेचा कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी तब्बल साठ हजार रुपये कमी पडत होते. हफ्ता भरण्याची तारीख ही उलटून गेली होती. त्यामुळे बँकेची माणस त्यांना सतत फोन करत होती.

‘तु टेन्शन नको घेऊस आम्ही सोबत आहोत.' अस बोलणारी माणसांनाही आता वेळेवर पैसे देण्यासाठी हात वर केले होते. आजवर हसत खेळत बोलणारा बँकेचा माणुस ही आता तोऱ्यात बोलायला लागला होता.

थोड्याचवेळात तो बँकेचा माणुस ही तिथे येऊन पोहोचला होता. त्याला काही मदत मिळण्याची विनंती केली असता. त्याने ही हात वर करत सुमितच्या घरच्यांना पैशांसाठीच विचारू लागला. त्याच्याशी सुमितचे वडिल आणि काका शांतपणे बोलत असताना तो मात्र शब्दाला शब्द वाढवतं चालला होता.

आता तिथे आराध्याला ही आलेल बघून सुमितची आई, काकु आणि आज्जी टेन्शनमध्ये आलेल्या होत्या. उलट सुलट बोलल्यावर ती कोणाचचं ऐकत नव्हती ते फक्त त्या तिघींनाच माहीती होत. सुमितच्या आईने नजरेनेच सानिकाला इशारा करत आराध्याला आत घेऊन जायला सांगीतल. पण सानिकाला ही तर तितकाच राग आलेला होता. मग तिची वहिनी कशी एकेकाची बँड वाजवते ते तिला ही बघायचं होत.

तोपर्यंत आराध्या त्यांच्यात जाऊन बसली पण होती. सुमितचे वडील काही बोलणार तोच आराध्याने बोलायला सुरवात केली.

“एवढे दिवस कायदेशीर कारवाई करणार म्हणुन तुम्ही बोलत आहात मग करत का नाही?” आराध्या “आता नोटीस आणली आहे का? लोकांच्या घरी जाण्याची ही वेळ आरबीआय या संस्थेने सांगितलेली आहे का? तुम्ही आमची सगळीच कागदपत्र सोबत ठेवली आहे ना? मग अजून काय हवं. तुम्ही करा कायदेशीर कारवाई.”

“तु मध्ये नको बोलुस.” सुमितचे वडील तिला शांत करून बघत होते. पण आता ती शांत रहाणार नाही हे बाकीच्यांना माहीतच होत. “ते प्राईवेट फायनान्स कडून कर्ज घेतलं होत.”

“अस होय.” आराध्य अजूनच निवांत झाली. “मग कायदेशीर कारवाई केल्यावर लोन कोणत्या कागदपत्रांना धरून दिल हे पण तुम्हाला कोर्टात एक्सप्लेन कराव लागेलचं ना.”

तसा तो बँकेचा माणुस जरा शांत झाला आणि बोलला. “ठिक आहे आम्ही आमची जी काही करवाई करायची ती करतो. आता कोर्टातच भेटू. तुमच्या घराच्या जप्ती ऑर्डरसाठी.”

“पण तेव्हा फोनवर तर तुम्ही बोलले होते की ऑर्डर काढली आहे म्हणुन? मग ती कोणती?” आराध्या कोणालाच बोलु देत नव्हती. “म्हणजे खोट बोलुन आमच्यासारख्या सामान्य माणसाला फसवत होतात.” आता आराध्याचा आवाज चढू लागला.

“बघाच आता.” बँकेचा माणुस तावातावात बोलला. “म्हणजे वकिलाची फि भरायला पैसे आहेत आणि आमचे भरायला नाहीत ना.”

“तुम्हाला कोणी सांगीतल की आम्हाला वकिलाची फी द्यावी लागेल.” आराध्य हाताची घडी घालत बोलली. “ॲडव्होकेट आराध्या सबनीस. क्रिमीनल ॲडव्हॉकेट.” आराध्या स्वतःकडे बोट दाखवत बोलली.

आता मात्र बँकेच्या माणसाने तिथून निघून जाणचं त्याच्या हिताच समजलं. “बघतो तुम्हाला.” उसन अवसान आणत तो बोलला.

“बघा निवांत बघा.” आराध्या “पण एक लक्षात ठेवा. जर आमच्यापैकी एकाही मोबाईलवर तुमचे हरासमेन्टचे कॉल आले. तर मी तुमच्यावरच हरासमेन्टची केस ठोकेल. वकील असल्याने मला सोप आहे ते.”

एवढं ऐकुन तो बँकेचा माणुस तावातावात निघून गेला. नंतर आराध्याने तिचा मोर्चा सुमितकडे वळवला. “तो बाबांना इतकं बोलत होता आणि तुम्ही खुशाल ऐकुन घेत होते?”

“ते चुकी आपली होती ना.” तिच्या त्या पवित्र्यापूढे सुमितचा ही भित्रा ससा झाला होता. शेवटी नवरा आपल्या बायकोला पुर्ण ओळखत असतोच की.

“हो, म्हणुन काहीही ऐकुन घ्यायचं.” आराध्या चिडून बोलली. तेवढ्यातच सुमितची आई थंडगार लिंबु सरबत घेऊन आली आणि आराध्याला दिला. आराध्येने तो गटागट पिला आणि शांत झाली. मग आपण आता काय केल? हे तिला जाणवल. मग काय? ती परत जीभ चावत तिच्या रुमकडे पळुन गेली.

आता सगळेच सुमितकडे बघु लागले. सुमित जरा ओशाळला.

“अरे! हे काय घेऊन आला आहेस घरात?” आजोबा आश्चर्याने बोलले. एवढे दिवस प्रेमाने बोलुन न ऐकणारी ती माणसं आराध्यासमोर बरोबर गप्प झाली होती.

“असा एकतरी माणुस हवाच घरात.” सुमितची आई हसतच बोलली. मग त्यांनी भाजीमर्केटमधला किस्सा ही या तिघांना सांगुन दाखवला होता.

“पण मग ती अशी पळुन का जाते?” सुमितचे लहान काका

“आपला सुपुत्र बोलले होते ना की सुन खूपच शांत आहे.” सुमितची आई सुमितची मस्करी करत बोलल्या. “मग तिचा असा शांतपणा दिसला की ती अशीच पळते.”

तो दिवस तर तिला कोणी काही बोललं नाही. दोन दिवसांनी ते सगळेच नाश्ता करायला बसलेले असताना आराध्या हळुच आजोबांजवळ गेली. आजोबांनी तिच्याकडे प्रश्नार्थक पाहील. आराध्याने एक पाकीट त्यांच्या समोर धरलं.

“काय आहे हे आरू बेटा?” आजोबांच्या या प्रेमळ शब्दांनी आराध्याचं मन भरून आलं होत.

“बघा ना उघडून.” आराध्या जरा चाचरत बोलली.

आजोबांनी ते उघडलं आणी सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यात तब्बल ऐंशी हजार रूपये होते.

“एवढे पैसे कुठून आणलेस?” आजोबा जरा कडक आवाजात बोलले.

“त.. त.. ते..” आराध्या बोलायला घाबरत होती. तिला पुढे बोललचं जात नव्हतं.

“माझ्यासारख्या अनेक मुलांच्या टिचर्स आहेत त्या.” सानिका अभिमानाने बोलली. “ज्याची फी लाखोत घेतली जाते. ते ती फ्रिमध्ये शिकवते.”

“शिकवते?” सुमितची आई गोंधळून बोलल्या. त्याच काय? सगळेच गोंधळून गेले होते.

“आई, तुमची सून खुप मोठी युट्यूबवरची टिचर आहे.” शेवटी सुमितने गुप्त फोडलचं. “तिच्या शिक्षणाचा उपयोग ती सर्वसामान्य मुलांसाठी करते. ती त्यावर तिचा चेहरा नाही दाखवत. म्हणुन तिला लगेच कोणी ओळखत नाही.”

“मग सानिका?” आजी

“ते तिने दुपारच्या वेळेस पाहीलं होत.” सुमित

आता आराध्या खूपच टेन्शनमध्ये आली होती. कोणी युट्यूबवर व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतो हे करीयर अजून तरी आपल्या इथे मान्य झालेल नाहीये. ते फक्त फालतु काम आहे. एवढचं काय तो समज. त्यामुळेच सासरचे यावर कसे रिॲक्ट होतात हे तिला माहीत नव्हतं. पण आता प्रश्न कर्ज चुकविण्याचा होता. म्हणुन तिने ते समोर ठेवलेले होते.

कोणाला काय बोलाव? तेच सुचत नव्हतं. तिने लपवलं म्हणुन भांडाव की ऐन वेळेस तिला आलेले पैसे कुठलाही विचार न करता लगेच काढून दिले याबाबत तिचे आभार मानावे.

“प्रेमविवाहाविषयी खूप वाईट अनुभव आलेले होते.” आजोबांनी बोलायला सुरवात केली. “पण अरेंजमॅरेजही कधी कधी वादामुळे तुटतं. शेवटी माणुस महत्वाचा. हे तु सिध्द केलस मुली.” आजोबांनी आराध्याकडे पाहीलं. “आम्ही एवढे पण जुन्या विचाराचे नाहीत हं सुनबाई. तस असत तर लग्नच करून दिल नसतं. हा फक्त थोडा राग होता. त्यामुळे कधी तुझ्याशी प्रेमाने वागली नाही.”

“अस का बोलत आहात?” आराध्या त्यांच्या घुडघ्याजवळ बसली. “इतके दिवस न दाखवता ही काळजी घेतलीच की. नाहीतर सुन आवडतं नाही म्हणून तिला छळणारे खूप बघीतले. पण इथे असे नव्हते म्हणुन तर मी आनंदाने राहु शकले.”

आराध्याचेही डोळे भरून आले.

“तूला आवडेल ते काम करत जा.” आजी “ आमच्यासाठी जशी सानिका तशीच तु. आता जर काही लपवलं तर तु आहे आणि तुझ्या या तिन तिन सासवा आहेत समजलं.” आजी लटक्या रागात बोलल्या.

तस आराध्या त्यांना प्रेमाने बिलगली होती.

हे सगळेच आठवता आठवता आराध्या लक्ष्मीपुजनाला बसलेली होती. सुन ही घराची लक्ष्मीच असते हे तिने सिध्द केलेलं होत. या सगळ्यांत सुमितची साथ तिला होतीच की. तिला घरात पुर्ण स्विकारे पर्यंत कितीतरी रात्री आराध्याला कुशीत घेऊन तो जागला होता. वेळोवेळी तिच्या चुका झाकुन घेतलेल्या होत्या.

विवाह कुठलाही असुद्यात नवरा बायकोची एकमेकांना साथ असली. तर ते नात टिकतंच.

समाप्त.

🎭 Series Post

View all