नातं गुरु शिष्याचं

Beautiful bond of guru and shishya

नातं गुरु शिष्याचं....

© प्रतिक्षा माजगावकर 

(मी आत्मनिर्भर चा पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल.... आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे खास सगळ्या गुरूंना वंदना म्हणून हा लेख लिहिण्याचा छोटासा प्रयत्न!)

        आज गुरुपौर्णिमा! सगळ्यांसाठी सगळ्यात पहिला गुरु म्हणजे आपली 'आई'. आईच असते जी अगदी आपण तिच्या पोटात असल्यापासून आपल्यावर संस्कार करत असते! बोट धरून चालायला, बोलायला आधी तीच शिकवते...... शाळेत जायच्या आधी सुद्धा आईने धडे गिरवून घेतलेले असतात..... मग आपण पहिल्यांदा शाळेत जातो; आई ला सोडून जायचं नसतं म्हणून खूप रडारड होते पण, हळूहळू आता आपल्याला शाळेची गोडी लागते आता हसत हसत आपण शाळेत जाऊ लागतो...... हळूहळू शाळेतून घरचा अभ्यास (गृहपाठ) द्यायला सुरुवात होते...... तेव्हाही आपली आईच आपली गुरु असते! आपल्याकडून नीट अभ्यास करून घेते..... पण, आता या नात्यात जरा ट्विस्ट आलेला असतो! शाळेत जर एखादी वेगळी पद्धत शिकवली असेल आणि आई वेगळ्या पद्धतीने शिकवत असेल मग भलेही ते बरोबरच असतं फक्त पद्धत वेगळी असते तेव्हा आपण सहज बोलून जातो; शाळेत बाईंनी (आम्ही तरी ४ थी पर्यंत मॅडम ना बाई म्हणायचो!) असं नाही शिकवलं हे चूक आहे. याचं एक उदाहरण पण आहे काही दिवसापूर्वी व्हाट्सअप वर एक जोक वाचला; "ऑनलाईन शाळा सुरु होती बाई अंक शिकवत होत्या १२ पर्यंत झाले आणि काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम झाला नंतर ४३ ला नेटवर्क आलं! त्या लहान मुलीला आई सांगतेय १२ नंतर १३ येतात पण, तिचं म्हणणं तेच; नाही आई तू चुकीचं सांगतेय बाईंनी १२ नंतर ४३ सांगितले!" या वरून आपल्याला समजू शकतं आपण शाळेत जाऊ लागलो कि शाळेतल्या टीचरचंच खरं मानतो! 
          कालांतराने वर्गात आपले मित्र मैत्रिणी होऊ लागतात मग न कळत ते सुद्धा आपले गुरु बनतात...... आपण एकमेकांचे गुरु कधी झालो हे आपल्याला कळतही नाही..... शाळेत असताना एवढं जाणवत नसेल पण, कॉलेज ला गेल्यावर हे प्रकर्षाने जाणवतं! कधी कधी शिक्षक जे शिकवतात ते डोक्यावरून जातं. मग आपले हेच मित्र रूपातील गुरु मदतीला धावून येतात..... परीक्षेच्या लास्ट मिनिटाला शिकवणारे आणि त्या जोरावरच आपण पेपरात जी उत्तरं ठोकतो त्याला तोड नसतो! आपल्याला कोणत्या भाषेत समजेल हे त्यांना चांगलंच माहित असतं! त्यानंतर सगळ्यांचाच लाडका गुरु आयुष्यात येतो; आपले गुगल बाबा! काही अडलं कि आपण पटकन बोलतो गुगल करून बघ..... गुगल! एक असा गुरु ज्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत! प्रत्येक गुरु सोबत आपलं एक वेगळंच बॉण्डिंग झालेलं असतं! प्रत्येकाशी एक छान अगदी कुटुंबासारखं नातं तयार होतं! 
          बरं आता गुरु म्हणलं कि फक्त आपल्यापेक्षा वयाने मोठी माणसंच नव्हे बरं का! अगदी लहान लहान मुलं सुद्धा आपले गुरु होतात कधी कधी.... कधीतरी काहीतरी बिनसतं आणि मूड ऑफ होतो पण तेच लहान मुलं दिसली की पुन्हा प्रसन्न वाटतं! त्यांच्याकडून आपल्याला नेहमी चालू क्षण भरभरून आनंदाने जगायचे कसे हे शिकायला मिळतं! अगदी निरागस भाव, कसलीच काळजी न करता फक्त हसत हसत मस्त एन्जॉय करायला शिकवणारे हे आपले लहान गुरु! खूप प्रेम, भीती सुद्धा असते (अर्थात आदरयुक्त), मनमोकळे पणाने बोलायला हक्काचं कोणीतरी असतं! काहीवेळा जे आपण घरी बोलू शकत नाही ते आपल्या शिक्षकांशी बोलून स्वतःला व्यक्त करतो आपण! हो, असंच असतं गुरु शिष्याचं नातं खूप खोलवर मनात रुजलेलं! इथे आपण मातीचा गोळा असतो, गुरु रुपी कुंभार आपल्या आयुष्याला छान आकार देत असतो! आणि प्रत्येकाची एक छान आकृती घडवतो...... 
सगळ्या गुरूंना समर्पित...... आणि शत शत नमन.... गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.....