ज्योतीने बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये कार पार्क केली आणि कारमधून उतरून तिने पुढचा दरवाजा उघडला. तिने तिचा हात हळूच पुढे सरकवला तसा तिच्या हाताचा आधार घेत दीपक कारमधून खाली उतरला. लिफ्टने दोघेही चौथ्या मजल्यावर आले तसे ज्योतीने तिच्या पर्समधून चावी काढली आणि घर उघडले.
दीपकला आरामात सोफ्यावर बसवून तिने हॉस्पिटलमधून आणलेले सगळे सामान एका बाजूला ठेवले. त्यांना डिस्चार्ज घेऊन येईपर्यंत रात्र होत आली होती. दीपक सोफ्यावर बसून ज्योतीच्या हालचालींकडे लक्ष देत होता. ज्योतीने पटकन किचनमध्ये जाऊन खिचडीचा कुकर लावता लावता थोडी आवराआवर केली. मग हॉलमध्ये येऊन तिने दीपकला हळूच हाताचा आधार देऊन उठवले. त्याला बेडरूममध्ये नेऊन तिने सर्वप्रथम त्याचे कपडे बदलले, नंतर तोंडावरून स्पंज फिरवून त्याला फ्रेश केले आणि ती बाहेर गेली. दीपकला मात्र गेल्या दहा दिवसांपासून ज्योतीने त्याची हॉस्पिटलमध्ये घेतलेली काळजी आठवून गहिवरून आलं होत. त्याच लक्ष समोरच असलेल्या आरशाकडे गेलं आणि स्वतःचा चेहरा पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू वहायला लागले.
इतक्यात ज्योती किचनमधून एका प्लेटमध्ये खिचडी घेऊन आली. तिने दीपकच्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसले आणि स्वतःच्या हाताने खिचडी भरवली. खिचडी भरवता भरवता ती त्याला कितीतरी इतर गोष्टी सांगत होती. एक दोनवेळा तर तिने इतके बालीश विनोद सांगितले की दीपक अगदी खळखळून हसला सुद्धा. जेवण भरवून झाल्यावर ती बेडरूममधून निघून गेली आणि इकडे दीपक तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत राहिला.
एक वर्षांपूर्वी दीपकचे ज्योती सोबत लग्न झाले होते. रंगाने थोडीशी सावळी अशी ज्योती दीपकला मुळीच पसंत नव्हती परंतु वडिलांच्या शेवटच्या इच्छेखातर दीपक लग्नाला तयार झाला. ज्योती म्हणजे दीपकच्या वडिलांच्या अगदी जवळच्या मित्राची मुलगी. दिसायला अप्सरा वगैरे नसली तरी सर्वात उठून दिसेल असेच सौंदर्य होते तिचे आणि स्वभाव तर एकदम लाघवी पण लग्न झाल्यापासून एक दिवस ही असा नव्हता ज्या दिवशी दीपकने तिचा दुस्वास केला नसेल. गौर वर्ण, उंच बांधा असलेला दीपक तिच्यापेक्षा दिसायला तसा उजवाच. तो सारखे तिला तिच्या दिसण्यावरून बोलायचा. ज्योती मात्र कधीही उलट शब्दाने बोलली नाही. आज ना उद्या दीपक बदलेल या आशेवर ती सहन करत राहिली. इकडे दीपक मात्र त्याच्या ऑफिसमध्ये नव्याने आलेल्या नेहाच्या रुपाला भुलला. दोघांचेही हळूहळू संबंध सूरू झाले. एके दिवशी दीपक नेहासोबत बाहेर फिरायला गेला होता तेव्हा रस्ता क्रॉस करताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्याला उडवले. त्यानंतर जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता आणि त्याच्या समोर ज्योती होती. त्याने नेहाला दोन - तीन वेळा फोन केले फोन केले परंतु तिने फोन उचलला नाही उलट तिचा एकही मेसेज आलेला न पाहून दीपक कायं ते समजून गेला होता उलट हॉस्पिटलमध्ये ज्योतीने त्याची केलेली निस्वार्थ सेवा त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. ती कधी वैतागली नाही, कधी चिडली नाही. दिवसरात्र त्याच्या सेवेत होती. त्याला वेदना झाल्या की तिच्या डोळ्यात पाणी यायचं. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता, पण तिच्या चेहऱ्यावर कधी त्रागा नव्हता. तिला पाहताना त्याला त्याच्या वडिलांची आठवण झाली, ज्यांनी ज्योतीबद्दल सांगताना "तिच्यासारखी रुपाने आणि मनाने सुंदर अशी सून मिळायला भाग्य लागतं," असं म्हटलं होतं. त्यावेळी त्याला हे निव्वळ शब्द वाटले होते, पण आज त्याला त्यांचा खरा अर्थ कळत होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा