Login

नाती नव्याने : भाग २

संसाराची पुन्हा नव्याने सुरू झालेली गोष्ट!
दहा दिवस हॉस्पिटलमध्ये असताना ज्योती त्याच्याशी बोलायची. चेहर्‍यावर जखम झाल्यामुळे त्याचा चेहरा थोडासा खराब झाला होता त्यामुळे ती त्याला धीर द्यायची पण यावेळी त्याला इतकं अपराधी वाटत होतं की त्याने दहा दिवसांत एकदाही नजर वर उचलली नाही पण आज घरी आल्यापासून मात्र त्याला सगळे आठवून खूप अस्वस्थ होत होते. त्याला ज्योतीसोबत बोलायचं होतं, पण शब्द सुचत नव्हते.

थोड्या वेळाने सगळे आवरून ज्योती खोलीत आली. ती दिवसभर त्याच्या शेजारीच असायची, पण आता तो एकटा असल्याने त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं. ज्योती त्याच्या पलंगाजवळ एका खुर्चीत बसली.

“तुम्हाला काही हवंय का?” तिने विचारलं.

दीपकने तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात प्रेम, काळजी आणि थोडीशी भीतीही होती. त्याला आठवलं, तो नेहमी तिच्या रूपाची चेष्टा करायचा, तिला अपमानास्पद बोलायचा. त्याने तिच्या आत्मविश्वासाचे कसे तुकडे केले होते. आणि तरीही, ती इथे त्याच्यासमोर बसून होती.

“ज्योती,” तो हळूच म्हणाला. त्याचे डोळे पाण्याने भरले होते.

तिने पटकन त्याचे हात हातात घेतले. “काय झालं? दुखतंय का?”

“नाही,” तो म्हणाला, “मी…मी खूप वाईट माणूस आहे.”

ज्योती शांतपणे ऐकत राहिली.

“मी तुला खूप त्रास दिला. तुझ्या रूपावरून मी तुला नेहमीच बोललो. मी… मी दुसऱ्या मुलीच्या मागे लागलो. मला माफ कर, ज्योती. मला माफ कर.” त्याचे अश्रू थांबत नव्हते.

ज्योतीने त्याचे डोळे पुसले. “असं बोलू नका. जे झालं ते झालं. आता तुम्ही बरे व्हाल.”

“पण मी तुला कधीच योग्य मानले नाही. तुझ्यावर प्रेम केले नाही. आणि तरीही तू माझ्यासाठी हे सगळं केलंस.”

“तुम्ही माझे पती आहात,” ती म्हणाली. तिच्या आवाजात कोणतीही कटुता नव्हती. “आणि मी तुमची पत्नी आहे. या नात्याची जबाबदारी मी कशी टाळू शकते?”

तिचे शब्द त्याला बोचले. तिच्या या साधेपणाने तो पूर्णपणे निरुत्तर झाला. त्याला समजले की तिचं मन किती मोठं आहे.

पुढील काही दिवस दीपक स्वतःमध्येच हरवला होता. त्याला त्याच्या भूतकाळातील प्रत्येक गोष्ट आठवत होती, त्याने ज्योतीला दिलेला प्रत्येक त्रास. त्याला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. एकीकडे नेहाने त्याला पूर्णपणे टाकून दिलं होतं, तर दुसरीकडे ज्योती त्याला जीव लावत होती. ज्या रूपावरून तो ज्योतीचा अपमान करायचा आज अपघातामुळे त्याचेच बदलते रूप पाहून नेहा त्याला टाळत होती. त्याला हळूहळू प्रारब्धाचा अर्थ समजू लागला. त्याने जे पेरलं होतं, तेच उगवत होतं. त्याला त्याच्या कर्माची फळं मिळत होती.

एक दिवस ज्योती त्याला औषध देण्यासाठी आली, तेव्हा त्याने तिला पकडले आणि म्हणाला, “ज्योती, मला एक संधी दे. मला माझं प्रायश्चित्त करायचं आहे.”

ज्योती गोंधळली. “कसली संधी?”

“मला पुन्हा एकदा सुरु करायचं आहे. तुझ्यासोबत. मला तुला आनंदी ठेवायचं आहे.”

ज्योती स्तब्ध झाली. तिला विश्वास बसत नव्हता की दीपक असे बोलत होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं.

“मी वचन देतो, मी तुला कधीच दुखावणार नाही. मी तुझ्या प्रत्येक शब्दाचा मान ठेवेल.”

ज्योतीने त्याला मिठी मारली. “मला फक्त तुम्ही ठीक व्हावे असे वाटते.”

पुढील काही महिन्यांत दीपकमध्ये खूप बदल झाला. तो आता पूर्वीसारखा नव्हता. तो ज्योतीला मदत करायचा, तिच्याशी बोलायचा, तिला हसवायचा. त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती आणि पूर्ण वेळ ज्योतीसोबत घालवत होता. त्याला आता तिच्या रूपापेक्षा तिच्या मनाचे सौंदर्य दिसू लागले होते. तिचं प्रेम, तिची सहनशीलता, तिचा निस्वार्थ स्वभाव त्याला खूप आकर्षित करत होता.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all