Login

नाव मोठं नि लक्षण खोटं भाग-१

नाव मोठं नि लक्षण खोटं!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: नाव मोठं नि लक्षण खोटं भाग -१

" मी जे सर्व आहे, ते माझ्या बायकोमुळेच आहे." त्याने सोशल मीडियावर आपला स्टेटस अपडेट केला होता.

सगळ्यांनी त्यावर तू किती भाग्यवान आहे, असे कमेंट करून सांगितले होते.

तिला सोशल मीडियावर टॅग केल्यामुळे तिला सुद्धा त्याचे नोटिफिकेशन आले होते. तिने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले.

प्रियांश हा मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. तो आपली वैयक्तिक असो की कामकाजाच्या संबंधित गोष्ट, नेहमी तो सोशल मीडियावर शेअर करायचा.

त्याच्या सहकर्मचाऱ्यांना त्याचा हेवा वाटायचा. कारण ज्यावेळेस सुट्टी असेल त्यावेळेस तो नेहमी त्याच्या बायकोसोबत बाहेर फिरायला जायचा. तिला चांगल्या आणि सुंदर भेटवस्तू द्यायचा. तसेच त्याच्या लग्नाला तीन वर्ष होऊन सुद्धा त्यांचा संसार हा नवीन जोडप्यासारखा आहे, हेच त्यावरून दिसायचे.

त्याचे कर्मचारी तर त्याच्या टवटवीत राहणाऱ्या संसाराबद्दल टिप्स घेण्यासाठी विचारायचे, तो मात्र हसून मी असे काही मोठे करत नाही, असे म्हणायचा.

लंच ब्रेक झालेला होता आणि सगळेजण एकत्र बसून जेवत होते प्रियांशची बायको प्रिया हिला त्याने फोन केला होता.

" अगं, भाजी खूपच छान झाली होती. मला घरी आल्यावर सुद्धा हीच भाजी हवी आहे." तो म्हणाला.

फोन ठेवून झाल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले त्याला दिसले.

" अरे, तुम्ही असे का माझ्याकडे बघत आहात?"  त्याने विचारले.

" अरे ती भाजी किती खारट झाली आहे आणि तू सरळ फोन करून सांगतोस की भाजी खूप छान झाली आहे ! ह्या परिस्थितीतही कसे काय तुला जमते ह्याचे मला आश्चर्य वाटते." त्यातलाच एक सहकारी त्यावर उत्तर देत म्हणाला.

" ती सगळं माझ्यासाठी करत असते आणि एवढे मेहनतीने तिने जेवण बनवले आहे, त्याला मी नाव कसं ठेवू ?  आणि खाल्ल्यावर तिला समजणारच आहे ना, ती पुढच्या वेळेस अजून काळजी घेईल. त्यामुळे तू काळजी करू नको. तसं पण प्रत्येकवेळी चुका सांगणे हे बरोबर वाटत नाही ना." तो शांतपणे सांगत होता.

" कुठे तुमचे चरण आहेत ? चरणस्पर्श करायचे आहेत, प्रियांश बाबा. " सगळेजण चक्क त्याचा पाया पडण्यासाठी पुढे आले होते.

"हे तुम्ही असं बोलता तर मी काय त्यावर बोलायचं हेच मला समजत नाही." तो  मागे सरकत म्हणाला.

"खरंच तुझी बायको खूपच भाग्यवान आहे की, तिला तुझ्यासारखा नवरा मिळाला." सगळेजण नेहमीप्रमाणे तेच वाक्य त्याला बोलून दाखवत होते.

त्याला सुद्धा हे ऐकून मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

हात धुवून झाल्यावर तो आपल्या केबिनमध्ये जाणार तेवढ्यात कोणाच्या फोनवरचे बोलणे त्याच्या कानावर पडले.

" काय रे तुला जरा सुद्धा त्याची किंमत नाही ?  आमचे ते प्रियांश सर किती आपल्या बायकोला जपतात, त्यात तर त्यांची बायको गृहिणीच आहे; तरीसुद्धा किती त्यांचा मान राखतात. " एक महिला कर्मचारी फोनवर आपल्या बायकोला आपल्या नवऱ्याला रागावून म्हणत होती.

पुन्हा मूठभर मांस प्रियांशच्या अंगावर चढल्यासारखे त्याला वाटत होते.

खुशीत तो आपल्या केबिनमध्ये जाऊन पुढचे काम करायला लागला होता.

ऑफिस संपल्यावर प्रत्येकजण आपल्या घराकडे जाण्यासाठी लगबग करत होते.

प्रियांशला त्याचा मित्र त्याच्या बिल्डिंगजवळ सोडणार होता, त्याने त्याला सोडले आणि तो आपल्या घराकडे निघून गेला.

दरवाजाची घंटी वाजवली आणि त्यानंतर जसा दरवाजा उघडला गेला, तसे समोरच्या व्यक्तीला बघून त्याने त्याचा चेहरा निर्विकार केला.मगापासून ठीक असणारा त्याचा मूड क्षणातच बदलला होता.

" या आतमध्ये."  तो खूप वेळ बाहेरच उभा आहे असे बघून त्याला आतमध्ये येण्यास समोरच्या व्यक्तीने सांगितले.

तो सुद्धा आतमध्ये येऊन आपल्या हातातली बॅग बाजूला ठेवून एक दीर्घ श्वास घेत पुन्हा आपल्या खोलीमध्ये निघून गेला.

क्रमशः

दरवाजासमोर कोण होते ?

© विद्या कुंभार.

कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
0

🎭 Series Post

View all