शीर्षक : नाव मोठं लक्षण खोटं भाग-३(अंतिम)
जवळजवळ दहा ते पंधरा दिवस झाले होते. प्रियांश प्रियाशी व्यवस्थित बोलत नव्हता.
एके दिवशी सर्व मित्रांनी त्याला त्याच्या घरी जेवायला येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने मग तसे प्रियाला सांगितले होते.
प्रियांशचे चार मित्र आणि सोबतच त्यांचे कुटुंब सुद्धा जेवणासाठी येणार होते.
" हे बघ व्यवस्थित जेवण कर. उगाच माझे नाक कापले जाईल असे काही करू नकोस; तसेच त्यांना वाढायच्या आधी व्यवस्थित एकदा चाखून बघ, नाहीतर मागच्या वेळेस कशी तू खारट भाजी केली होतीस तसे मला काही नको." प्रियांश आवाजात जरब आणून प्रियाला म्हणाला.
प्रियाने सर्व जेवण व्यवस्थित बनवले होते. एवढ्या जणांचे जेवण बनवून ती थकली होती. त्यात ती लोक येण्याच्या आधी ती व्यवस्थित तयार होऊन त्यांची वाट बघत होती.
एक एक करत प्रत्येकजण संध्याकाळी त्यांच्या घरी जेवणासाठी जमले होते. आधी चहा आणि थोडासा नाश्ता सुद्धा तिने बनवलेला होता. तो दिला आणि त्यानंतर थोड्या वेळाने गप्पा झाल्यावर ते जेवणार होते त्यानुसार तिने जेवण गरम करायला घेतले होते.
सगळेजण डायनिंग टेबलवर बसू शकत नव्हते म्हणून खाली फरशीवर बसण्यासाठी चटई अंथरल्या.पंगतीत बसतात तसे बसले होते.
"आम्ही आमच्या हाताने घेऊ जेवण. वहिनी, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत जेवायला बसा." त्यातल्या एका सहकाऱ्याने प्रियाकडे बघून सांगितले.
"अरे जेवण देण्यासाठी तिला असू दे. तसे पण ती घरीच असते, तिलाही असली कामं करायला खूप आवडतात." प्रियांश हसतच म्हणाला.
नवऱ्याचे असे बोलणे प्रियाच्या अंगवळणी पडले होते, परंतु बाकीच्यांना हा असा काही बोलेल; असे त्यांना वाटले नव्हते.
जेवण वाढत असताना चुकून एका मित्राच्या बायकोच्या अंगावर त्यांच्या लहान मुलीच्या धक्क्याने भाजी सांडली होती.
"प्रिया, तुला जरा सुद्धा अक्कल नाही. नीट जेवण सुद्धा तुला साधे वाढता येत नाही." मोठ्या आवाजात प्रियांश म्हणाला.
" भाऊजी, एवढे काही नाही. आमच्याच मुलीमुळे त्यांच्या हाताला धक्का लागून साडीवर भाजी सांडली. माझ्या मुलीची चूक आहे. तुम्ही उगाचच प्रिया ताईंना बोलत आहात." त्या मित्राच्या बायकोला मात्र त्याचे असे जोरात ओरडून प्रियाला बोलणे खटकले होते, म्हणून ती म्हणाली.
त्यावर प्रियांश काहीच बोलला नव्हता.
सगळे मनसोक्त जेवण जेवले होते. काही मित्रांच्या बायका तिला आतमध्ये जेवणाची भांडी ठेवण्यासाठी मदत करत होते.
त्यातील एकीने प्रियाला ताट वाढण्यासाठी जेवणाची भांडी होती ती उडून बघितले तर थोडासा भात आणि आमटीच राहिली होती.
" अहो तुम्ही जेवण ऑर्डर करता का?" ती लगेच बाहेर येऊन आपल्या नवऱ्याला म्हणाली.
" का ? काय झालं वहिनी? तुम्हाला जेवण आवडले नाही का ?" प्रियांशने विचारले.
" तसे नाही दादा, प्रिया ताईंना जेवणच राहिले नाहीये. एकदम थोडासा भात आणि आमटीच शिल्लक आहे. सर्वजण खूप जेवले त्यामुळे जेवण संपले आहे. आता त्या एकट्याच राहिल्या आहेत." ती म्हणाली.
" वहिनी, ह्यात प्रियाची चूक आहे ना ! तिने जास्त जेवण बनवायला हवे होते, आताही त्याची शिक्षा म्हणा काही बाहेरून जेवण मागवू नका." तो हसतच म्हणाला.
आता मात्र सर्वांना कळून चुकले होते की, प्रियांश नेमका खरा कसा आहे. कारण त्याचं नाव खूप मोठं होतं, परंतु तसं लक्षण मात्र खोटं होतं. त्याचा बायकोवर असणार प्रेम हे फक्त डिजिटल युगामध्ये त्याने दिखाऊपणा केला होता, हे सर्वांना समजले होते.
शेवटी तिच्यासाठी जेवण ऑर्डर केले आणि सगळ्या मित्रांच्या बायका तिचे जेवण होईपर्यंत तिच्याशी बोलत होत्या. तिचं जेवण पूर्ण खाऊन होईपर्यंत ती अशी बोलत होत्या त्यातील काही जणांनी तिला मदत म्हणून भांडी सुद्धा घासून ठेवल्या होत्या.
" प्रियांश, तुझी बायको खूप चांगली आहे; म्हणून आजपर्यंत तुमचा संसार टिकला आहे. इथून पुढे नीट राहा, नाहीतर तुला पुढे जाऊन त्याचा पश्चाताप होईल." त्याचा जवळचा मित्र त्याला जाताना म्हणाला.
© विद्या कुंभार.
समाप्त.
कथा कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा