Login

नाव मोठं नि लक्षण खोटं भाग-२

नाव फक्त मोठं नि लक्षण खोटं!
शीर्षक: नाव मोठं नि लक्षण खोटं भाग-२

" तुम्ही कधी आलात?" प्रियांशने विचारले.

" दुपारीच आलो." दोन व्यक्तींनी एकदमच उत्तर दिले.

" बरं."  एवढेच तो म्हणाला.

प्रियाचे आई-वडील आले होते आणि ते कोणत्या उद्देशाने आले आहेत, ते सुद्धा त्याला आता समजले होते.

रात्री जेवण झाल्यावर प्रियाच्या आई-वडिलांनी त्याला बोलण्यासाठी थांबवले होते.

" मला असं वाटतं की, एकदा तुम्ही तुमच्या सुद्धा काही टेस्ट केल्या तर बरे होईल." प्रियाचे वडील म्हणाले.

" कसल्या टेस्ट मला करायचा आहेत ?" त्याने त्यांच्याकडे रोखून बघत विचारले.

" हेच आपलं तीन वर्ष तुमच्या लग्नाला झाले आणि अजूनही तुम्हाला मुलबाळ होत नाही, तर प्रियाचे सगळे रिपोर्ट्स व्यवस्थित आहेत. एकदा तुमचे पण टेस्ट करून बघा आणि जर काही त्यामध्ये कमकरता असेल तर आपण त्या अनुषंगाने उपचार घ्यायला सुरुवात करू." तिची आई बिचकतच म्हणाली.

" हे बघा मामी, माझ्यात काही कमकरता नाहीये आणि मी काही टेस्ट करणार नाही आणि हे तुमच्या मुलीला मी आधीच सांगितलेलं आहे; तरीसुद्धा आता तिने तुम्हाला सांगून इथे बोलावे; हे मला जरा सुद्धा पटलं नाही."  तो थोडा रागातच म्हणाला.

खरे तर प्रियाने तिच्या आई-वडिलांना येऊ नका, म्हणून सांगितले होते; परंतु आपल्या मुलीसाठी आणि तिला सतत समाजातील लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते, म्हणून त्यातून काही तोडगा निघण्यासाठी, म्हणून प्रियाचे आई-वडील आपल्या मुलीकडे आले होते.

"रात्री झोपताना प्रियांशने आपल्या बायकोला तिच्या आई-वडिलांनी टेस्ट करण्याबाबत सांगितलेल्या गोष्टीवरुन खूप वेळ तिच्याशी वाद घातला. त्याचा आवाज एवढा मोठा होता की बाजूला असलेल्या खोलीमध्ये प्रियाचे आई-वडील सुद्धा होते,तर त्यांच्या कानावर बोलणे जात होते.

प्रियांशचा खरा चेहरा आता त्यांना समजला होता. लग्नाआधी चौकशी केल्यावर तो शांत आणि समजूतदार आहे, असे सर्वांकडून समजले होते. तसेच नेहमी तो प्रियाबद्दल सगळीकडे चांगले लिहायचा त्यावरून आपल्या एकुलत्या एक मुलीला चांगला जोडीदार लाभला आहे, असे त्यांना वाटायचे.

भांडण करण्यामध्ये प्रियांशने बोलण्याची हद्दपार केली होती. खालच्या थराला जाऊन तो तिच्याशी बोलला होता तिने सुद्धा मध्ये बोलल्यावर त्याचा राग आल्याने त्याने तिला तिच्या आई-वडिलांसोबत माहेरी कायमची जाण्याबद्दल असे सांगितले होते.

प्रियाची घरची परिस्थिती ही बेताची होती. तिला बाळ होत नाही यावरून सतत लोकांकडून ऐकायला लागत होते आणि आता तर जर ती माहेरी जाऊन राहिली, तर बाकीचा समाज काय बोलेल; हा विचार करून त्यावेळी तिने शांतपणे ऐकून घेण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या दिवशी लवकरच तो कामाला निघून गेला होता. ना त्याला तिच्या घरच्यांशी बोलण्याची इच्छा होती, ना त्याच्या बायकोशी काही बोलावे असे त्याला वाटत होते.

सकाळी नाश्ता करण्यासाठी तिचे आई-वडील जावई खोलीतून बाहेर येतील, म्हणून वाट बघत होते; परंतु प्रियाने प्रियांश लवकरच गेल्याचे सांगितल्यावर मात्र तो अजूनही रागात आहे; हे त्यांना समजलं.

" प्रिया, तू आपल्या घरी चल. जर तुला खूप त्रास होत असेल तर चल. प्रियांश असा असेल असं मला वाटलं नव्हतं." तिचे बाबा म्हणाले.

"आता जे आहे ते माझे नशीब आहे. चांगली नोकरी तुम्ही मला सोडायला लावली, तसेच आता दुसरे लग्न करण्याची माझी इच्छा नाही. जोपर्यंत सहन करू शकते तोपर्यंत सहन करीन. तुम्ही काळजी करू नका." एवढेच ती बोलली.

दुपारच्या गाडीने तिचे आई-वडील आपल्या घरी निघून गेले.

" काय मग?  आज तुझ्या गृहदक्ष बायकोचाका स्टेटस टाकला नाहीस तू?"  त्याच्या एका सहकाऱ्याने विचारले.

" मला काय तेवढेच काम असतात का?"  असे म्हणून त्याने आपल्या कामावर लक्षकेंद्रित केले.

आज काही त्याचा मूड ठीक नाही, असे समजून तो सहकारी सुद्धा आपले काम करायला निघून गेला.

क्रमशः

प्रियांश जे वागला ते बरोबर होते का?

© विद्या कुंभार.
0

🎭 Series Post

View all