Login

नावरसी भाग १

Because of being the only child, excessive pampering spoils the boy, and in the end he becomes a great trouble for the family.
चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलद कथा लेखन स्पर्धा
संघ - कामिनी

नावरसी भाग १

दिवसेंदिवस मुलाचे उपद्व्याप वाढत चालले होते. सुनीताताई त्याची आई पार वैतागून गेली होती. आता तो सुधारणेच्या पलीकडे गेला होता. घरात सर्वांनाच त्याचा त्रास होत होता. आज तर कहरच झाला होता, 'याचे कसे होणार?' असा विचार करत सुनीता डोक्याला हात लावून बसली होती. नेमके काय चुकले आपले आता तिला सगळे आठवू लागले. तिचे मन भूतकाळात गेले.

सुनीता बाळंत झाली होती. तिला छान गोंडस मुलगा झाला होता. एक दिवस तो छोटासा जीव रडून रडून लालबुंद झाला होता. शेजारच्या जमलेल्या आयाबाया वेगवेगळे सल्ले देत होत्या. कुणी दृष्ट काढायला सांगत होते तर कुणी पोटातले झाले असेल म्हणत होते. बाळाची आई सुनीता बाळाला शांत करत होती. ती बाळाला दुध पाजण्यासाठी पदराखाली घेत होती; पण बाळ रडायचे अजिबात थांबत नव्हते. बाळाचे पोट दुखत असेल म्हणून बाळाची आज्जी सगुणाबाईने तेलाची बाटली घेतली आणि ओटीपोट, लवण येथे बाळाला तेल लावून चोळू लागली तरी बाळ शांत होत नव्हते. कोणीतरी बोलले घास मुटका टाका तर तो उताराही बाळावरून उतरुन टाकला.

नुकतेच दोन दिवसांपूर्वी बाळाचे बारसे झाले होते. तान्हुल्याचे नाव दिपक ठेवले होते. सगुणाच्या मोठ्या सुनेला पहिली मुलगी झाली होती आणि आता मुलगा झाला म्हणून घरात सर्वांना खूप आनंद झाला होता. घराण्याला पुढचा वारस मिळाला, कुलदीपक जन्माला आला म्हणून सारे घरदार आनंदून गेले होते; पण सकाळपासून रडत असलेल्या बाळामुळे सगळे हवालदिल झाले होते. बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारची शांताआजी आली आणि बोलली,

"पोरगं दृष्टावलयं वाटतं? ती वरच्या आळीची माली आली होती का? तिचीच दृष्ट लागली आसल, मेलीला पोरबाळ न्हाय आणि बारशाला आलेल्या कुणाची नजर कसली काय बी सांगता येत न्हाय."

सगुणाने आपल्या धाकट्या लेकीला कुंदाला हाक मारली आणि म्हणाली,
"काढ बाई तुझ्या हाताने बाळाची दृष्ट."

"तिलाच काढू द्या. रागीट माणसाच्या हातानं काढायची दृष्ट म्हंजी लगेच उतारते."
शेजारची आजी म्हणाली त्याबरोबर कुंदाने रागाने आजीकडे बघितले.

"आगं माझ्याकडे अशी बघू नगं, रागारागानं दृष्ट काढ मग बघ कशी पाटदिशी उतारते."

बाळाची आत्या असलेल्या कुंदाने बाळाची दृष्ट काढली. रडून रडून बाळ थकले होते. दूध पिऊन ते झोपले तेव्हा सगळ्यांना हायसे वाटले. एक तासाभरात बाळ परत किंचाळत उठले. तेवढ्यात बाळाचे बाबा सखाराम पाटील शेतातून घरी आले ते म्हणाले,

"बहुतेक बाळाच्या पोटाबिटात दुखत असावे. एवढासा जीव त्याला काय होतेय ते काय सांगता येतेय का? त्याला दवाखान्यात नेऊ."

यावर सगुणा म्हणाली,
"आताच ववा ( ओवा) फुकलाय थांब जरा, एवढासा मुटका कशाला भाहिर न्यायचा, अजून सव्वा महिना पण झाला नाही."

"असं म्हणतेस व्हय? बरं डॉक्टरला घरलाच घेऊन येतो."
असे बोलून मोटर सायकलवर बसून तो डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी बाळाला तपासून औषधे लिहून दिली. औषध पिऊन बाळ झोपले .

पण रात्री अचानक किंचाळून उठले.
सगळ्यांची झोपमोड झाली. बाळाची आई रात्रभर बाळाला मांडीवर घेऊन बसली. बाळाची परत एकदा दृष्ट काढली पण बाळाने संपूर्ण रात्र जागवली.

क्रमश:
©®सौ. सुप्रिया जाधव
११/९/२०२५
0

🎭 Series Post

View all