Login

नावरसी भाग २

This is the part 2 of a story of a boy, where because of being the only child, excessive pampering spoils the boy, and in the end he becomes a great trouble for the family.
चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलद कथा लेखन स्पर्धा
संघ - कामिनी

नावरसी भाग २

दुसऱ्या दिवशी सकाळी सगुणा तिचा मुलगा सखारामला म्हणाली, "बामणाकडे जाऊन जरा बघून ये, काही बाहेरची बाधा झालेय का ते कळेल."

सखाराम बामणाकडे मुलाची पत्रिका बघून आला.
"आई आगं बाळ नावरसी आहे. आपले आबासाहेब आले परत."

"असं व्हय? बरं अजून काय सांगितलं बामणानं?" सगुणाने विचारले.

"आबांचं नाव बाळाला ठेवायला सांगितलयं." सखाराम म्हणाले.

"बरं बरं, म्हंजी माझं सासरे आलं परत तुझ्या पोटाला. आवं मामंजी, आबासाब सेवा करून घ्यायला आला व्हय परत?" असं म्हणत सगुणाने बाळाला आबांच्या नावाने अंगारा लावला. तिला आता बाळाचे अजूनच कौतुक वाटू लागले होते.

तिने एका ताटात साखर भरून दोन नंबरच्या सुनेला सासऱ्यांच्या नावाने आजूबाजूच्या घरात साखर वाटायला सांगितली. त्यांचं नाव 'दौलतराव' पण त्यांना सगळे 'आबासाहेब' म्हणत म्हणून आजपासून बाळाला 'आबासाहेब' म्हणायचं असं सगळ्यांना साखर वाटत सांगितलं आणि काय आश्चर्य बाळ खरेच अर्ध्या तासात रडायचे थांबले.

सर्वांना आश्चर्य वाटले आणि खात्री झाली खरेच आबासाहेब पोटाला आले. बाळ नावरसी आहे म्हणून सगळे अजूनच लाड करू लागले. सगुणा तर आता बाळाला 'मामाजी' म्हणून बोलवू लागली होती. बाळाचे आजोबा जाम खूश होते. ते म्हणाले, "शेवटी आबा आपल्या माणसांत परत आलेच."

बाळ खूप लाडाकोडात वाढत होते. त्याला कुणी 'मामाजी' म्हणत होते तर कुणी 'आबासाहेब' म्हणत होते. लाडाने हाक मारल्यावर बाळ खुदकन हसत होते. सगळे कोडकौतुक करत होते म्हणून बाळाच्या आईला पण आनंद वाटत होता.

दिवसेंदिवस बाळ अतिशय लाडाकोडात वाढत होते. त्याला सगळे उचलून घेत होते. बाळाचे सगळे लाड करत होते ते सुनीताला खूप आवडायचे. बाळ रांगू लागले, हळूहळू चालू लागले, पायातले पैंजण छमछम वाजवत एक एक पाऊल पुढे टाकू लागले. बाळ सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झाला होता. सगळे त्याला फिरवून आणत, त्याच्याबरोबर खेळत. त्याचे आजोबा तर सगळ्या घरभर त्याला पाठीवर बसवून घोडा घोडा करत फिरवत असत. बाळ कोणाचे केस ओढत असे तर कोणाला फटके मारत असे तरीही 'आज आबासाब का पिसाळले...' असं बोलून सगळे त्याचे कौतुक करत.

बाळाचा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा केला. गावजेवण घातले. बाळ हळूहळू वाढत होते तसतसे आततायीपणा आणि हट्ट करू लागले होते आणि सगळेजण या आबासाहेबांचा हट्ट पुरवत होते.

लहान मुले खेळत असताना हे आबासाहेब आता मुलांच्या खोड्या काढू लागले होते. कधी मुलांना फटके मारायचे तर कधी चिमटे काढू लागले होते. मुलांच्या आया तक्रार घेऊन आल्या तर सगळे या आबासाहेबांना पाठीशी घालत होते.

क्रमशः
©®सौ. सुप्रिया जाधव
११/९/२०२५
0

🎭 Series Post

View all