Login

नाचणी पापड Recipe In Marathi

उन्हाळा स्पेशल वाळवनाचे पदार्थ अचूक प्रमाणासहित
नाचणी पापड

साहित्य- एक किलो नाचणी, मूठभर गहू, ओवा, जीरे, तीळ, खायचा सोडा चिमूटभर, पापडखार एक मोठा चमचा, चवीनुसार मीठ आणि तेल.

कृती-
१) नाचणी स्वच्छ धुवून सकाळी एका मोठ्या टोपल्यात वरपर्यंत पाणी येईल असे भिजत ठेवणे.

२) नंतर रात्री ती निथळून घेऊन त्यात मूठभर गहू घालणे आणि सुती कापडात रात्रभर बांधून ठेवणे.

३ बांधून ठेवलेल्या नाचणीला छोटे छोटे मोड येतात.

४) आता ही नाचणी सावलीमध्ये चार पाच तास वाळवत घालणे आणि मग दळून आणणे.

५) आता नाचणीचे पीठ साडीने चाळून घेणे आणि कोंडा बाजूला करणे.

६) एक छोटे पातेले नाचणीचे पीठ घेणे आणि तेव्हढेच पाणी घेणे.

७) एका जाड पातेल्यात तेल लावून त्यात मोजलेले एक पातेल पाणी गरम करायला ठेवणे.

८) जीरे आणि ओवा मिक्सरमध्ये बारीक करून घेणे ते मिश्रण एक चमचाभर त्या गरम पाण्यात घालणे.

९) त्यातच मीठ, खायचा सोडा, पापडखार, तीळ घालणे.

१०) नंतर पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यात एक पातेले नाचणीचे पीठ घालणे आणि त्यावर एक मिनिटे झाकण ठेवणे.

११) आता झाकण काढून पीठ चांगले हलवून मिक्स करणे. पीठ हलवण्यासाठी लाटणे घेणे त्याला तेल लावून घेणे.

१२) ते पीठ व्यवस्थित एकही गुठळी न राहता मिक्स करणे. पीठ जास्त घट्ट झाले असेल तर त्यात घोटभर गरम पाणी ओतून पुन्हा मिक्स करणे.

१३) आता पीठावर झाकण ठेवून ते शिजवून घ्यावे साधारण पाच दहा मिनिटे.

१४) नंतर थोडेसे पीठ खाऊन बघायचे. चिकट लागत असेल तर पुन्हा झाकण ठेवून शिजवणे.

१५) नंतर गरमागरम पीठ काढून एका प्लास्टिकच्या पिशवीला आतून तेल लावून त्यात पीठ घालून व्यवस्थित एकजीव रगडून घेणे आणि तेलाच्या हाताने मळून घेणे.

१६) पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेणे.

१७) पापड यंत्रात प्लास्टिक पेपर ठेवून त्यात एक पिठाचा गोळा ठेवून दाबून पातळ पापड तयार करून घेणे.

१८) तयार पापड साडीवर वाळत घालणे.

१९) सर्व पापड करून झाल्यावर दोन दिवस चांगले उन्हात कडकडीत वाळवणे.

२०) तयार पापड हवाबंद डब्यात भरून ठेवणे.
नाचणीचे हे शिजवलेले पीठ खायला खुप छान लागते आणि त्याची खरवड तर खुप मस्त लागते.

🎭 Series Post

View all