Login

नाचता येईना अंगण वाकडे भाग 1

लोणच्याची आंबट गोड गोष्ट

नाचता येईना अंगण वाकडे भाग 1


" पप्पा , पप्पा , हिकडं या लवकर . "
चिंगी आंब्याच्या झाडाखाली उभी राहून किंचाळत होती .

" कार्टे , कुठ आग लागली ? चांगलं आबा म्हणायचं सोडलं आन पप्पा काय ? "

" मम्मे , हे बघ कैरीला बाठ लागला . " चिंगी आनंदाने कैरी नाचवत होती .

" मंग ? आता कैऱ्या मोठ्या झाल्यावर बाठ लागणारच . "
तितक्यात सर्जा बाहेर आला .

" चिंगे , आजच मोठ्या कैऱ्या उतरवून घेऊ . आजीला निरोप पाठवतो म्या . "
सर्जा असे म्हणताच पारूला सगळा उलगडा झाला .


आठवडाभरापूर्वी तिने घरात लोणचे करण्यापेक्षा आम्ही बचत गटात करतो ते आणू असे जाहीर केले होते .


" कोणती आजी येणार हाय चिंगे ? "
पारू मोठ्याने हसली .

" मामाची आई येणार हाय . तुला काय वाटलं तुला एकटीला लोणच बनवता येत व्हय ? "
चिंगी नाक उडवत म्हणाली .


पारू फक्त गालात हसली आणि आत निघून गेली . तिने फोन लावला .

" सरे , तू आईसंग हिकडं यायचं न्हाय . "
" पर आक्का त्या काल पासन माझ्या माग लागल्यात . "
मग पारूने तिला एक युक्ती सांगितली आणि फोन ठेवला .


" पारू , अय पारू आवरलं का न्हाय ? "
रखमाने आवाज दिला .

" रखमे , आत ये . घोटभर चहा घे . "
पारूने रखमाला आत बोलावले .
" पारे लवकर आवर , आज दहा किलो लोणच बनवायचं हाय . " रखमा चहाचा कप ओठाला लावत म्हणाली .

" घरच प्वार उपाशी आन शेजारणीच ठेवलं तुपाशी . "
सर्जा भांग पाडताना म्हणाला .

" समदी मेली तसलीच . आता ह्यांना म्हणलं आपल्याला लागतच किती लोणच . आमी बनवतो तिथून घ्याच का ? " रखमा सर्जाकडे रागाने बघत सांगू लागली .

" काय म्हणाल मग शिरपा भावजी . "

" कुत्र्याची शेपटी सरळ व्हती व्हय ? काय तर म्हण संगीच्या बचत गटाचं काय घ्यायचं न्हाय . "

" रखमे , चल आपल्याला काम हायत . "
पारू आणि रखमा बाहेर पडले .


आपल्याला मारलेले टोमणे ऐकुन सर्जा प्रचंड चिडला होता . त्याने त्याच तिरिमिरीत गणपाचे हॉटेल गाठले .

" गणपा समद्यासनी पेशल बनव आज एकेक . "
सर्जाने आरोळी ठोकली .

" पैलवान , आज घरी चहा मिळाला नाय का ? "
गणपा हसला .

" च्यायला ह्या संगीमुळ समदा इस्कोट झालाय . "
सर्जा तंबाखू मळत म्हणाला .

" न्हायत काय ? आज आमाला तालुक्याला पिक्चर बघायला जायचं व्हत पर बायकू म्हणाली लोणच्याची लई मोठी आर्डर हाय . "


लोणचे हा शब्द ऐकताच शिरपा माजलेल्या बैलाने शिंगे उगारावी तसा गुरकला , " नाव काढू नग त्या संगीच्या गटाचं . घराफूड आंब्याच झाड हाय . लोणच घाल म्हणल तर मांजरीवानी अंगाव आली रखमा ."


" ह्या बायां काय समजतात . लोणच बनवायला काय अवघड हाय तवा . "
सर्जा असे म्हणताच सगळ्यांनी त्याला थांबवले .

" नग , कुरडई करतानी काय हाल झालं आपल . " गणपा ती आठवण काढून चिडला .

" ह्यावेळी पारूची आई आपल्याला मदत करणार हाय . "
सर्जा म्हणाला .


" आयला भारीच की , वैनी माहेरी जाऊन आल्याव लोणच आमच्या घरी येतं . चवीला झ्याक असत लई . "
रामाच्या तोंडाला आताच पाणी सुटले .

" अय नुसत बनवायचं न्हाई , आपून ते बाजाराला इकू . "
बाळू टाळी देत म्हणाला .

" कधी येणार हाय मामी ? "
शिरपाने विचारले .

" संध्याकाळच्या मुक्कामी एस.टी न येणार हाय . "
सर्जा आता दोस्त सोबत असल्याने फॉर्मात आला होता .

" आता संगीच्या आणि समद्या बायकांच्या नाकावर टिच्चून लोणच बनवू . "
रामा आनंदात ओरडला .


सर्जा जाताना मस्त गावरान कोंबडी घेऊन गेला . पारू नुकतीच आली होती .

सर्जा जोरात ओरडला , " मस्त झणझणीत कोंबडी बनवा . मामी येणार हाय . "

" चिंगे , जा पिशवी आण . काय सासू आन काय जावाय ." पारू हसून आत गेली .

" पारे , अय पारे कुठं हाय पोरी ? "
दरवाजातून आवाज येताच चिंगी पळत आली .

" आज्जे , खाऊ काय आणला ? "
पारू तिला धपाटा घालणार इतक्यात म्हातारीने पारूला फटकारले .

" लहान हाय चिंगी . सारखी काय लेकराला कावती? "

" म्या मामाच्या पिशवीत चाफायचे तर माझा कान कोण वढायच ? "
चहाचा कप हातात देत पारूने ऐकवले .


नथीचा आकडा वर उचलून चहा पिताना मंजुळाबाई सगळीकडे बघत होता . बशी खाली ठेवली आणि पदराने तोंड पुसून मग ती सर्जाकडे वळली .

" पावन , आडकित्ता हाय नव्हं घरात ? "

" मामी , आडकित्ता काय कुठं बी मिळल , चिंगे बजा नानाकड जाऊन आडकित्ता आन . "
सर्जाने हुकूम सोडला .
पाच मिनिटात चिंगी हजर .

" आज्जे घे आडकित्ता ."
मंजुळाबाई एकदा चिंगीकडे , एकदा सर्जाकडे आणि एकदा आडकित्ता बघत होती .

" मामी , घ्या . पान खायच व्हत ना ? "
सर्जा म्हणाला .
त्याबरोबर पारू फिसकन हसली .

" रांधलाय म्या रोडगा आन सुगरण म्हण गं दुर्गा . "
पारूने टोमणा मारला .

" जावाय , आव कैऱ्या फोडायला ह्यो आडकित्ता व्हय ? " मंजुळाबाई शक्य तितका नरम आवाज काढत म्हणाली .

" आर तिच्या , ईळी पायजे आस म्हणा की मामी . धारा काढून झाल्या की हजर करतो . "
सर्जा आत धारा काढायला गेला . चिंगी खाऊ खायला पुढे झाली .


धारा काढून झाल्या आणि सर्जा विळी उर्फ आडकित्ता शोधायच्या मोहिमेवर निघाला . सोबत दोस्त मंडळी होतीच .

" खालच्या आळीत जनाकाकूला इचारू . "
बाळू म्हणाला .

" जना काकू , हाय का घरात ? "
सर्जाने आवाज दिला .

" कोण पैलवान व्हय ? काय काम काढलं ? "
म्हातारी बाहेर आली .

" काके , लोणच्याची ईळी पायजे . "
शिरपा म्हणाला .

" कालच रखमान नेली . मला वरून काम करायला बी बोलावल . "
" म्हणजी न्हाय मिळायची का ईळी ? " बाळू म्हणाला .


म्हातारीने नकार दिला . आठ दहा घरे फिरली कुठेच विळी नव्हती . गावातील मोजक्या घरात अशा विळ्या असत . आता एकच घर उरले होते . तिथे जायला सर्जा आणि दोस्त मंडळी तयार नव्हती . शेवटी मनाचा हिय्या करून सुताराच्या गंगूचे दार सर्जाने वाजवले .


गंगू विळी देईल का ?

लोणचे मोहिमेत पुढे काय अडचणी येतील ?
वाचत रहा

नाचता येईना अंगण वाकडे
©® प्रशांत कुंजीर
0

🎭 Series Post

View all