Login

नाचता येईना अंगण वाकडे भाग 2

लोणच्याची आंबट गोड गोष्ट
नाचता येईना अंगण वाकडे भाग 2


मागील भागात आपण पाहिले सर्जेराव पारुने लोणचे बचत गटाकडून घ्या असे सांगितल्याने चिडून स्वतःच लोणचे बनवायचा घाट घातला . त्यासाठी विळी शोधायला सर्जेराव आणि दोस्त मंडळी बाहेर पडली . आता पाहूया पुढे .


" गंगू मावशे , हाय का घरात ? "
बाळूने आवाज दिला .

" अय बाळ्या आजुन खपले न्हाय . कशाला बोंबलतो माझ्या नावानं ? "
आतून दुप्पट जोरात आवाज आला .

" काय न्हाय जरा एक बारीक काम व्हत ."
शक्य तितका गोड आवाज काढत बाळू म्हणाला . म्हातारी बाहेर आली .

" तरीच म्हणलं भूत एकट कसं आलं येताळ कुठं चुकला ? " सर्जाकडे बघून म्हातारीने नाक उडवत टोमणा दिला .

" मावशे , अग असं काय करतीस , माह्या आईची दोस्त नव्हं तू ? "
सर्जा पुढे झाला .

" आर म्हणून तर तुझं थोबाड फोडत न्हाय म्या . लवकर बोला काय काम हाय? "
गंगू चिडली .

" मावशे कैऱ्या फोडायची ईळी पायजे व्हती ."
बारीक आवाजात रामा मागून म्हणाला .

" तिकडं गोठ्यात पडली हाय जा ."
एवढे बोलून गंगूने धाडकन दरवाजा बंद केला .

" अबब! आर ही ईळी हाय का चेष्टा ? "

इतकी मोठी विळी गंगूच्या म्हाताऱ्याने तरुणपणी हौसेने बनवली होती . आलिया भोगासी असावे सादर . विळी उचलून दोस्तांनी घरचा रस्ता धरला .


" आगाय आय मेलो . "
बाळूने विळी खाली टाकली .

" बाळ्या , आर मोडली असती ईळी मंग ? "
रामा चिडला .

" अस्स , त्वा उचल की मंग ."
बाळ्या चिडला .

" शिरपा , रामा तुम्ही दोघांनी धरा दोन बाजूंनी . "
सर्जाने सूचना दिली .

कसेबसे इथेतिथे टेकवत घामाघूम होत विळी घराजवळ पोहोचली . रात्रीचे बारा वाजून गेले होते . दमलेल्या बाबांनी तिथेच अंगणात पडी टाकली .


सकाळी पारू उठून बाहेर आली आणि अंगणात आडवे पडलेल्या सगळ्यांना बघून हसली . कोपऱ्यात विळी पडलेली दिसली . सर्जा डोळे चोळत उठला . सगळ्यांना घरी जाऊन अंघोळी करून यायला पिटाळले आणि घरात आला .


चहा पित असलेल्या सासूला म्हणाला , " मामी ईळी मिळाली बर का . "

चहाचा कप खाली ठेवून मंजुळाबाई बाहेर आली . विळीच्या चारही बाजूने फिरली .

" जावाय , हिला धुवायला लागलं . "
सर्जाने घरात नजर टाकली .

पारू भाकरी थापत होती .

" चिंगे , हिकडं ये . आजीला ईळी धुवायला मदत कर . "


" बया , जावाय तुमच्या घरी सासूला कामाला लावता व्हय ? गावातली लोकं नावं ठिवत्याल . "

शेवटी सर्जा आणि चिंगी दोघांनी विळी धुवायला घेतली .


" चिंगे , पाणी टाक . हिकडं कचरा रहायला बघ . खालून धुवून घे . "
मंजुळाबाई नुसत्या सूचना देत होती .

" अय आज्जी त्यापरीस तूच का न्हाय धुवून टाकत . "
चिंगी चिडली .

कसेबसे विळी धुण्याचे काम आटोपले .

" आई , समद बनवून ठिवल हाय . आज कैऱ्या फोडायच्या हाय . "
पारू भराभर आवरून निघाली .


" चिंगे , चला कैऱ्या काढून घ्या . "
मंजुळाबाई आत जाताना काम सांगून गेली .

" अय रामा , शिरपा , गणपा चला एकजण झाडावर चढा . " सर्जाने हुकूम सोडला .

" बाळ्या आपल्यात बारीक हाय . त्याला चढू दे . "
शिरपा कान कोरत म्हणाला .

" बरं , बाळ्या तू चढ झाडावर . "
तोपर्यंत मंजुळाबाई बाहेर येऊन उभी राहिली .

" पिवळ्या कैऱ्या काढू नग , हा ती बघ वर डोक्यावर . "
खालून सूचना चालू झाल्या .

तितक्यात एक कैरी बाळूच्या हातातून निसटली . नेमका तेव्हाच सर्जा वर बघून सूचना देत होती . सरळ नाकावर कैरी आपटली .

" बाळ्या सुक्काळीच्या , आर माणसं मारतो का काय ? "
नाक दाबत सर्जा मोठ्याने ओरडला .

" आर तुम्ही कशाला खालून टिव टिव करता . "
बाळू वरून ओरडला .

बघता बघता कैऱ्यांचा मोठा ढीग अंगणात जमा झाला .


" आग बाबो , येवढं लोणच करायचं व्हय ? "
रामाने डोक्याला हात लावला .

" आर , संगी आन तिच्या लोकांना दाखवू आपण काय चीज हाय . "
सर्जाने त्याच्या पाठीत थाप मारली .

" चिंगे , कैऱ्या धुवायला घ्या . धुवून कोरड्या करा . तवर म्या दोन घास खाऊन घेते . "
सूचना सांगून मंजुळाबाई आत गेली .

" अय इतक्या कैऱ्या कोण धुवायच्या ? "
शिरपा वाकडे तोंड करत म्हणाला .

" व्हय , लोणच करायचं म्हणजी खायचं काम नसतं भावजी . " पारू नेमकी त्याचवेळी परत आली .

" आग मागच्या येळी म्या फक्त कैऱ्या अंगणात ठिवा म्हणलं तर किती ऐकवलं . "
रखमाने नाक मुरडले .

" सर्जा , आपून धुवू समद्या कैऱ्या . लोकांना वाटतं आपल्याला काय जमतं न्हाय . "
शिरपा चिडून म्हणाला .

" सर्जा भावजी जपून न्हाय तर नाचता येइना आन आंगण वाकड . "
रखमा पुन्हा चिडवत म्हणाली .

" अय आता पारू वैनीच्या लोणच्यावर लई उडू नगा . त्यांची आई हाय आमच्या संग . "
शिरपाने उत्तर दिले .

" रखमा , ह्यांच्या नादी कुठं लागती . आपल्याला उद्या मसाला घ्यायला जायचं हाय . "
पारू तिला आत घेऊन गेली .


" मामी , उद्या मसाला घ्यायला जाऊ बाजाराला . "
सर्जाने असे म्हणाल्यावर मंजुळाबाई सावध झाली .


" जावाय , सरूला फोन लावा ."
आपला बटणाचा फोन तिने समोर धरला .
चार पाच वेळा फोन लावला तरी नंबर बंद येत होता .

" कुठं उलथली सरी ."
मंजुळाबाई चिडली .

अखेर तिला सर्जासोबत जायचे नाईलाजाने कबुल करावे लागले .

" जावाय , चला कैऱ्या फोडायला घ्या . "
त्याबरोबर सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले .


अखेरीस सर्जाने पहिली कैरी विळीवर ठेवली . खटकन खटका दाबला आणि एका बाजूला ठेवल्याने कैरी ताडकन उडून मंजुळाबाईच्या नाकावर आपटली .

" मेले , आई गं ! "
म्हातारी मोठ्याने ओरडायला लागली .

तरीही धीर धरून सर्जाने ती कैरी पुन्हा विळीवर मांडली .


कैऱ्या फोडणे म्हणजे काय ? याची पुरेपूर प्रचिती सगळ्यांना आली . अनेकदा पारूचे हात भरून आल्यावर ती का वैतागत असे हे त्याला समजले . तरीही हार मानणे सर्जेरावच्या स्वभावात नव्हते . वाकड्या तिकड्या फोडलेल्या फोडी सगळ्यांनी मिळून अंगणात सुकायला ठेवल्या .


लोणचे बनेल का चविष्ट ?
पाहूया अंतिम भागात .
वाचत रहा .
नाचता येईना अंगण वाकडे

©® प्रशांत कुंजीर
0

🎭 Series Post

View all