#लघुकथालेखनस्पर्धा
शीर्षक:- नव्याचे नऊ दिवस
माधवी आणि विराटचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला होता.
माधवीचे तिच्या सासरी उत्साहात स्वागत झाले. सोबत तिची आत्या पाठराखीण म्हणून आली होती.
माधवी ही स्वभावाने चंचल असलेली आणि विराट हा शांतताप्रिय होता. लग्नाआधी तिने थोडे दिवस नोकरी केली आणि कामाचा कंटाळा म्हणून लगेच सोडून दिले.
विराट हा फार्मा कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता.
नातेवाईकांच्या ओळखीने त्याला माधवीचे लग्नासाठी स्थळ आलेले होते. पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि मध्येच लॉकडाऊन लागले त्यामुळे फक्त फोनवर बोलणे होत होते.
नातेवाईकांच्या ओळखीने त्याला माधवीचे लग्नासाठी स्थळ आलेले होते. पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि मध्येच लॉकडाऊन लागले त्यामुळे फक्त फोनवर बोलणे होत होते.
कोरोना नंतर नियमात शिथिलता आली त्यामुळे घरच्यांनी लग्न करण्याचे ठरवले आणि त्यांचे लग्न झाले.
आज पूजेचा दिवस होता. नवीन जागी झोप लवकर लागत नसल्याने माधवी खूप वेळ झोपली होती. तिच्या आत्याला आणि तिला झोपण्यासाठी वेगळी खोली दिली होती.
आत्या "अगं, जरा लवकर उठ. आता लग्न झाले आहे तुझे. बघ किती उशीर झाला. बाहेर पूजेची तयारी चालू आहे."
"झोपू दे गं आत्या, एकतर रात्री लवकर झोप नाही आली." ती वैतागत म्हणाली.
तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने पाहिला तर आईचा होता.
लगेच उचलला.
लगेच उचलला.
"हॅलो मम्मी, बोल." ती झोपूनच बोलत होती.
"उठले का माझे बाळ?" तिची आई तिकडून विचारत होती.
" हो, मला अजून झोप आली आहे, पण ही आत्या बघ ना सारखी उठ म्हणत आहे." ती आत्याकडे पाहून नाक मुरडत म्हणाली.
आत्याने डोक्यावर मनातच हात मारला. अजून ही काय लहान आहे का, असेच विचार तिच्या मनात आले.
अर्धातास गप्पा मारत शेवटी ती अंघोळ करायला गेली तेव्हा तिच्या आत्याने सुस्कारा सोडला.
थोड्यावेळाने पूजेसाठी भटजी आलेत म्हणून माधवीला तयारी करायला सांगितली.
विराटची मामी स्वयंपाकघरात पूजेसाठी प्रसाद बनवत होती. तिला काही हे पटले नाही.
"ताई, तुम्ही जराही सुनेला ढील देवू नका नाहीतर डोक्यावर बसायची."
"वहिनी, माधवीचा पहिलाच दिवस आहे. आतापासूनच कशाला आपण बोलायला सुरुवात करायची? नवीन आहे आपल्यालाच समजून घ्यावे लागेल."
लग्नाचे सुरुवातीचे दिवस माधवीला समजून घेण्यात गेले. त्यात विराट हा नोकरीनिमित्त शहरात राहणार होता. त्यामुळे आधी लग्नासाठी त्याने काही दिवस सुट्टी घेतली होती.
पुन्हा त्याने फिरण्यासाठी गोवा हे ठिकाण ठरवले परंतु त्याला कामावर तातडीने काही दिवसांतच हजर राहावे लागणार म्हणून त्याला तो प्लॅन रद्द करावा लागला.
माधवी हिरमुसली होती. त्यात तिला प्रत्येक वेळी नवीन सून म्हणून सर्वांसमोर चांगलेपणाचा आव आणून वैताग आला होता.
शहरात दोघेच असणार म्हणून तिला आनंदही होत होता. आपल्या गाडीने ते घरी जाण्याचे ठरवत होते. मध्येच ते लोणावळ्याला दोन दिवस थांबले तेवढी रजा त्याला दिली होती.
"अहो, मला भूक लागली आहे." रात्री ती म्हणाली.
"हो, चल आता जायचेच आहे." असे म्हणत ते तिथल्या जवळच्या हॉटेलमध्ये गेले.
दिसायला बारीक जरी असली तरी सर्व जेवण माधवी संपवत होती.
"एवढी भूक लागली होती?" विराटने हसतच विचारले.
"हो मला भूक लागली आहे." असे म्हणत त्याचा विचार न करता ती होते ते सर्व खात होती.
त्याने नाही मध्येच मान हलवत आपले जेवण संपवले.
नव्याचे नऊ दिवस म्हणतच. त्याने दुर्लक्ष केले होते.
ती जे जे काही करेल ते सर्व घरी सांगत होती. सारखा मोबाईल तो तिचा घरच्यांसाठी चालूच असायचा.
"माधवी, घरी कॉल करून सांग आपण पोहोचलो आहोत." त्याने सांगितले.
"हो." असे म्हणत तिने जेवणासाठी खिचडी बनवायला घेतली.
"तू गावी फोन केला होतास का?" थोड्यावेळाने त्याने विचारले.
"नाही. विसरले." ती म्हणाली.
"थांब मी करतो." असे म्हणतच त्याने व्हिडिओ कॉल लावला.
आपली बहीण, भाऊ आणि आईवडील ह्यांच्याशी तो बोलत होता. ती कुठे आहे म्हणून विचारले तर ती जेवण बनवत आहे असे त्याने सांगितले.
पुन्हा गाव आणि शहरात जेवणाचे वेळ वेगळी असते असे त्याने समजून सांगितले पण त्यांचे बोलणे ऐकून तिला राग आला होता.
दुसऱ्या दिवशी पासून त्याचा डब्बा बनवायचे होते त्यामुळे माधवीने जेवण बनवून त्याला डब्बा दिला.
नवीनच लग्न झाल्याने स्पर्शाची ओढ आणि एकमेकांस पाहण्याचे निमित्त ते शोधत असायचे.
दुपारी जेवणाची वेळ झाली म्हणून त्याने डब्बा उघडला तर चपाती बिल्कुल बरोबर बनवल्या नव्हत्या.
त्याला तिच्या आईचे पाहण्यावेळी झालेले बोलणे आठवले होते, "आमची माधवी सुगरण आहे. सर्व जेवण तिचं बनवते. मी तर कधी स्वयंपाक घरात पाऊल ठेवतच नाही."
सर्वांसमोर आता आपला डब्बा कसा खायचा म्हणून त्याने तो तसाच ठेवला. रात्री येवून त्याने चपाती विषयी बोलल्यावर तिने तिला अशाच येतात सांगितले.
रात्री भात बनवायला सांगितले तेव्हा तर त्यात जास्त प्रमाणात पाणी दिसले. त्याने मग त्यावरून चिडून बोलायला सुरुवात केली.
"अगं, तुझी आई तर बोलली होती की तू सुगरण आहेस. मग हे काय?" त्याने भातात राहिलेले पाणी दाखवत विचारले.
"राहिले असेल त्यात काय?" असे ती म्हणाली.
दुसऱ्यादिवशी त्याने जवळच राहणाऱ्या एका नातेवाईक असलेल्या काकूंना तिला जेवण बनवण्यासाठी मदत करायला सांगितले.
असतो एकेकाला स्वयंपाक करण्याचा कंटाळा म्हणून त्या काकूंनी तिला काय कसे बनवायचे हे सांगितले.
"काकू, तुम्हाला येत नाही का ? नाही म्हणजे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव असेल ना?" तिने मस्करीत त्यांना टोमणा मारला.
"तुला काय येते आणि कशी करतेस ह्यासाठी तुला विचारले होते. काय आहे ना तुझ्या नवऱ्याने मला तुला जेवण कसे बनवतात सांगायला सांगितले. हे तर माझी मुलगी तुझ्यापेक्षा लहान असूनही खूप नीट बनवते. तुझ्या नवऱ्यासाठी मी इथे आले." त्यांना तो तिने केलेला अपमान सहनच झाला नव्हता म्हणून त्यांनी पण तसेच सांगितले.
गावी जायचे निमित्त निघाले आणि तो तिला काही दिवस आपल्या आईच्या हाताखाली तरी शिकून घेईल असे म्हणून तिथे सोडून आला.
तिथेही काही काम करायला नको म्हणून माधवी मुद्दाम चुका करायची. हसतच कोणाला मनाला लागेल असे बोलायची. त्यामुळे कोणी तिला मदत करायला पुढे येत नव्हते.
"हॅलो मम्मी, तू सांगितले तसेच मी सर्व केले आहे. बघ कशी आता ह्यांना नाचवते. मी शिकलेली आहे हे त्यांना समजत नाही का? किती कामे करावी लागतात इथे. एकतर साडेपाच- सहा वाजता उठा. माझी जाऊ कशी करते तिलाच माहीत. मी तर जेवढे सांगेल तेवढेच करते."
"शाब्बास माधवी, असेच वाग." तिची आई तिला म्हणत होती.
काही दिवसानंतर तिच्या दिराने तिला विराटच्या घरी सोडले.
जो पर्यंत ती तिथे होती सर्वांना खूप काही बोलून आपण चांगले काम करत आहोत असेच माधवीला वाटत होते.
जो पर्यंत ती तिथे होती सर्वांना खूप काही बोलून आपण चांगले काम करत आहोत असेच माधवीला वाटत होते.
घरी आल्यावर तिने ऑनलाईन मागवूया म्हणून सांगितले. तेव्हा माझ्या भावाला घरचे लागते असे म्हणून त्याने आधी डाळ-भात कुकरमध्ये लावला. मग ती चपात्या आणि बटाट्याची आमटी करत होती.
बटाट्याची आमटी मधले बटाटे हे कच्चेच होते. दुसऱ्या दिवशी त्याचा भाऊ गावी जातानाही त्याला चहा आणि नाश्ता दिला नसल्याने तो तसाच निघून गेला.
रात्री घरी आल्यावर ह्यावर बोलावे म्हणून त्याने तिला आवाज दिला.
"माधवी तुझ्या घरी एकूण किती जण आहेत?"
"आम्ही सहा जण. आता मी इथे आल्याने घरी पाच जण असतात." ती म्हणाली.
"तुझे मोठे बहीण आणि भाऊ तिथे सुट्टीत आल्यावर किती जण होतात?" त्याने विचारले.
ती "दहा - बारा जण तर होतात पण तुम्ही हे मला का विचारत आहात?"
"एवढ्या जणांचे जेवण तुझ्या घरी कोण करायचे?" त्याने विचारले.
"मम्मी, कारण माझे जेवण बनवताना चुका व्हायच्या." तिने सांगितले.
"बरं, मग तुला साधे जेवण बनवता येत नाही? तुझी आई तर बोलली होती की तू सुगरण आहेस म्हणून." त्याने विचारले.
"प्रयत्न करतेय ना? आणि तुम्ही जेवणावरून मला का बोलता?" रागातच ती म्हणाली.
"कारण मी मुलगा असूनही माझ्या आईने गरजेपुरते शिकवले आहे. तुला जर कोणती गोष्ट येत नसेल आणि कोणी शिकवायला आले तर तू त्यांचा असा अपमान करतेस की लोक तुला नावे ठेवतात. आता मी तुला साधे जेवण करायला येत नाही म्हणून विचारले तर तुला राग आला. तू गावी गेलीस तेव्हा तुला रिंगटोन कशी बदलायची असे विचारल्यावर तू तिथे वहिनींना हसत होतीस? तुला नीट जेवण बनवता यावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले पण तू काय केलेस?" तो रागात होता.
तेवढ्यात तिचा फोन वाजला आणि त्यावर मम्मी नाव झळकले होते.
"हा मम्मी बोल." तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि फोनवर बोलायला लागली.
त्याने रागात तिच्या हातातून फोन घेवून तो बंद केला.
"हे काय केले तुम्ही?" तिला त्याने असे केलेले बिल्कुल आवडले नाही.
पुन्हा फोन वाजला. ह्यावेळी त्याने उचलला आणि म्हणाला,
"सासूबाई दिवसातून किती वेळा तुम्ही फोन करता? तुमच्या मुलीला जरा घरात लक्ष द्यायला सांगा. एवढे फोन वर बोलता तर चार गोष्टी समजुतीच्या पण सांगा की मोठ्यांशी कसे बोलायचे ते." त्याने रागावर नियंत्रण ठेवून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
"सासूबाई दिवसातून किती वेळा तुम्ही फोन करता? तुमच्या मुलीला जरा घरात लक्ष द्यायला सांगा. एवढे फोन वर बोलता तर चार गोष्टी समजुतीच्या पण सांगा की मोठ्यांशी कसे बोलायचे ते." त्याने रागावर नियंत्रण ठेवून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
समोरून फोन बंद झाल्याचे समजले.
"तुम्ही मला काय करायचे ते सांगू नका. मी इंग्लिशमध्ये मास्टर केले आहे. जरा तुमच्याकडे पाहा तुमच्या ह्या रंगाला पाहून कोणी लग्न तर केले असते का? तुमच्या घरचे काम मी का करायचे? तुमच्या घरचे जसे काय खूप चांगले आहेत. मी शहरात राहिलेली आहे. हे काम करण्यासाठी नाही लग्न केले." ती रागात म्हणाली.
फोनवर तासनतास गप्पा मारणारी आणि आपल्या घराला समजून घेईन असे म्हणणारी हीच माधवी होती का असा प्रश्न त्याला पडला.
पुढेही ती मनाला येईल असेच वागत होती. त्याच्या घरच्यांनी समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण माधवीचे घरचे त्यांनाच गप्प करायचे. उगाच कुठे घरातील गोष्ट बाहेर नको पडायला आणि समाज हसू नये म्हणून माधवीकडून विराटने अपेक्षा करणे सोडल्यावर तिने नवऱ्याला गृहीत धरून सासरची माणसे परकी आणि माहेरची माणसे जवळची हेच तिच्या आईने मनावर बिंबवलेले डोळ्यांवर पट्टी बांधून स्वीकारले होते.
विराटला नव्याचे नऊ दिवस संपल्यावर वास्तविकता किती निराळी असते हे अनुभवावरून समजले होते.
समाप्त.
© विद्या कुंभार
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
