Login

नदीचा कोप १

महापुरात अडकलेल्या एका कुटुंबाची करुण कहाणी
भाग १

“अहो, शेतातले पाणी आता दारी येईल असे दिसतंय,” ती ओढणी घट्ट बांधत म्हणाली.

आकाशात काळे ढग दाटून आले होते. वार्‍याचा वेग इतका जबरदस्त होता की, आंब्याच्या झाडावरची पिकलेली फळे धडाधड खाली पडत होती. नेवरेकरांच्या घराच्या ओट्यावर बसलेली कामिनी चिंतेने आभाळाकडे पाहत होती.

घरातल्या लाकडी पायऱ्यांवरून दिगूभाऊ खाली उतरले. त्यांच्या अंगावर नेहमीसारखाच जुना झब्बा, डोक्यावर पांढरी टोपी, आणि हातात लाकडी छत्री घेत ते दाराशी आले.

“अजून दोन दिवस असा पाऊस पडला तर सगळे धुवून नेईल बघ. पण काय करू? राजाने मारले आणि पावसाने झोडपले म्हणून तक्रार थोडीच करता येणार आहे, या आभाळावर राग धरून चालत नाही.”

ते शेताच्या बाजूला पहात होते. पाण्याचा प्रवाह आता रस्त्यालगत येऊ लागला होता. दुरून नदीचा गडगडाट ऐकू येत होता, कानाला तीव्र कानठळ्या बसतील असेच त्याचे स्वरूप होते.

घरातली मोठी मुलगी नेहा, शाळेची बॅग घेऊन धावतच आली. अंगावरचा गणवेश चिखलाने माखलेला होता.

“आई, शाळेच्या अंगणामध्ये पाणी शिरलंय. गुरुजींनी सांगितले, उद्यापासून शाळेला सुट्टी, पाऊस थांबल्याशिवाय आता शाळा सुरू होणार नाही."

“सुट्टी?” दिगूभाऊ हसत म्हणाले, “हे बघ, देवाने तुझे म्हणणे ऐकले.”


नेहा ओशाळली,

“असे म्हणू नका बाबा, अभ्यासाचे नुकसान होते, या वर्षी शिष्यवृत्तीची परीक्षा आहे.”

लहानगा स्वरूप अंगणाच्या बाहेर जमत असलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडत होता, त्याच्या भोवती कोंबड्याची टोपली भिजत होती.

“आई, बघ ना, माझी होडी तरंगून पुन्हा बुडून जात आहे!” तो केविलवाण्या चेहऱ्याने ओरडत होता.

कामिनी हसली, “बाळा, हसावे की रडावे कळत नाही. हे पाणी खेळण्यासाठी नाही रे, आता याचा धोका वाटू लागला आहे.”

तेवढ्यात बाहेरून जोशी भट आले, अंगावर रेनकोट, हातात विजेरी घेऊन ते बाहेरूनच बोलत होते.

“दिगू भाऊ, नदीचे पाणी आज तिसऱ्यांदा वाढले. मी धरणाकडे गेलो होतो, तिथे पाणी सोडण्याच्या भाषा चालू आहेत.”

दिगूभाऊचे कपाळ आठ्यांनी भरले.

“मग?”

“मग काय, जर असेच चालू राहिले तर आज मध्यरात्रीपर्यंत गावात सगळीकडे पाणी येईल.”

कामिनी दचकल्यासारखी झाली.

“देवा!” ती ओठ चावून म्हणाली, “आपले घर धरणापासून जवळ नाही म्हणून बरे..”

जोशी भट शांतपणे म्हणाले, “तुमचे घर वर आहे म्हणून थोडे बरे,  पण खबरदारी घ्या.”

दिगूभाऊंनी त्वरित चुलीपाशी ठेवलेले धान्य, पिठ आणि काही मोजके कपडे बांधायला सांगितले.

“नेहा, तू पिशवीत कपडे ठेव. कामिनी, मुलांची कागदपत्रे घे. स्वरूप, त्या होड्या थांबव आता!”

बाहेर पाऊस आणखीन वाढला होता. विजांच्या कडकडाटात घर हादरल्यासारखे वाटत होते. आकाशात चमकणारे पांढरे प्रकाशचक्र क्षणभर सगळे उजळवून जात होते.

नेहा भीतीने आईच्या जवळ जाऊन अगदी बिलगून बसली.

“आई, पूर आला तर आपले घर वाहून जाईल का?”

“नाही ग, देवावर भरोसा ठेव.” कामिनी तिला जवळ घेत म्हणाली.

दिगूभाऊ बाहेर जात म्हणाले,

“मी जरा शेताकडे जाऊन बघतो. गोठ्यातली जनावरे वर काढायला हवीत.”

बाहेर, पावसाचे थेंब इतके मोठे येत होते की अंगावर पडले की जोरात फटका बसायचा. शेतातले पाणी आता ओसंडून रस्त्यावर आले होते. त्यांनी दोरीपासून बैलांना मोकळे केले आणि वळवून वरच्या पायवाटेने घराकडे नेऊ लागले. प्रत्येक थेंब जणू एखाद्या इशाऱ्यासारखा वाटत होता.

गावात सगळीकडेच धावपळ सुरू झाली होती. कोणी गाई-वासरे घेत होते, कोणी घरचे सामान वरच्या माळ्यावर टाकत होते.

लाऊडस्पीकरवरून जोशी भटांचा आवाज घुमला

“सगळ्या नागरिकांनी वरच्या देवळात जमावे. धरणाचे ४ दरवाजे उघडले गेले आहेत, आणि त्यातून पाणी वेड्यासारखे पळत आहे, काही मिनिटातच ते आपल्या गावात शिरू शकते.”

दिगुभाऊ घरी परतले तेव्हा कामिनी भांडी, धान्याच्या पोत्यात भरत होती.

“काय म्हणाले?” तीने विचारले

“धरण सोडले म्हणतात. रात्रभर खबरदारी घ्यावी लागेल.”

स्वरूप भीतीने विचारू लागला, “बाबा, नदी आपल्यावर रागावली का?”

दिगुभाऊ त्याला जवळ घेत म्हणाले,

“नाही बाळा, नदी रागावत नाही. ती आपल्याला धडा शिकवते,  निसर्गाचा आदर करायला.”

नेहा खिडकीतून बाहेर पाहत होती.

“बाबा, पाण्याचा रंग पाहा, मातीसारखा झाला आहे. असे वाटते नदी आपल्याला मिठी मारायला धावत येत आहे."

दिगुभाऊ काही क्षण काहीच बोलले नाहीत.

“हो ग, आणि म्हणूनच आपण तिच्याशी खेळ करू नये. ती जे जे देते ते सगळे व्याजासकट घेऊ शकते.”

काही क्षणातच वीज गेली. अध्ये मध्ये फक्त आकाशातल्या विजांची चमक दिसत होती. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. घराच्या बाहेर पाणी घुसू लागले होते.

कामिनीने देव्हाऱ्यात ठेवलेली देवीची मूर्ती उचलली.

“देवा, घर राहो न राहो, माझी माणसे वाचव.”

नेहा स्वरूपला ओढत अंगणात उभी होती.

“आई, देवळात जाऊया का?”

“हो, पण आधी बाबा काय. म्हणतात ते बघू.”

दिगुभाऊ माडीवरून खाली आले, श्वास घेत म्हणाले, “वरच्या देवळात सगळे गेलेत. आपणही निघूया. अजून उशीर झाला तर रस्ता पाण्याने भरून जाईल.”

त्यांनी लवकरात लवकर एक दोन चटया, एक-दोन कपडे आणि देवाची मूर्ती घेतली. स्वरूपच्या हातात विजेरी दिली.

घर सोडताना कामिनीने दाराकडे वळून पाहिले, ओट्यावरचे तेलाचे दिवटे अजूनही मंद उजेडात जळत होते.

ती हलकेच म्हणाली, “माझ्या घराचे रक्षण कर ग बाई."

दिगुभाऊंनी हलकेच नमस्कार केला आणि हातातल्या स्वरूपला घट्ट धरून ते पुढे निघाले.

रस्त्यावर पाणी गुडघ्यापर्यंत आले होते. गावात घराबाहेर लोकांची गर्दी वाढत होती, जनावरे ओरडत होती, मुले रडत होती. कोणीतरी ओरडले,

“धरण पूर्ण सोडलंय! धावत जा वरच्या टेकाडावर!”

नेहाने मागे पाहिले,  त्यांच्या घराच्या ओट्यापर्यंत आता पाणी पोहोचले होते.

“आई!” ती किंचाळली.

दिगुभाऊ मागे वळले नाहीत, फक्त म्हणाले, “धाव ग नेहा, देवळात पोहोचलो की मग बघू!”

ते चौघे टेकाडावरील देवळात पोहोचले, मागे वीज चमकली, आणि त्या प्रकाशात त्यांच्या घराचे छप्पर हळूहळू पाण्यात बुडताना दिसत होते.


क्रमशः

©®भालचंद्र नरेंद्र देव 

जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५
0

🎭 Series Post

View all