Login

नदीचा कोप २

महापुरात अडकलेल्या एका कुटुंबाची करुण कहाणी
भाग २

“बाबा… आपले घर गेले.” नेहा थरथरत म्हणाली,

“घर गेले ग, पण आपण सगळे वाचलो ना… म्हणजे देव आपल्यासोबत आहे.” दिगुभाऊंनी बावरल्या नजरेने उत्तर दिले ,

देवळाच्या आत रात्रभर थंडी आणि वाऱ्याचा तडाखा बसत होता. बाहेर सतत विजांचा कडकडाट, आणि डोंगरावरून खाली जाणारे पाण्याचे लोट सगळीकडे दिसत होते.


दिगूभाऊ, कामिनी, नेहा आणि छोटा स्वरूप देवळाच्या एका भितींच्या आडोशाला एकत्र बसले होते.

“आई, मला झोप येतेय...” स्वरूप कुडकुडत म्हणाला.


कामिनी त्याला मांडीवर घेत म्हणाली, “थोडे सहन कर बाळा. पहाट झाली की पाऊस कमी होईल, मग आपण पुन्हा एकदा आपल्या घरी जाऊ.”


दिगूभाऊ, उठून बाहेर पाहू लागले. गावात सगळीकडे पाणी पसरले होते, जणू काही सगळीकडे नदी आहे आणि ते एका  बेटावर अडकून पडले आहेत असे वाटत होते. दूरपर्यंत कुठेच दिवा दिसत नव्हता.

थोड्या वेळाने गावचे जोशी भट आणि दोन तरुण नौका घेऊन आले.

“दिगूभाऊ!” जोशी भट आवाज देत म्हणाले, “शाळेच्या वरच्या इमारतीत लोकांना ठेवतोय. देवळात देखील थोड्या वेळात पाणी चढेल, सगळ्यांनी तिकडे जायचय.”

दिगूभाऊंनी मान हलवली.

“नौकेत जेव्हढी जागा आहे, त्यात आधी बायकांना व मुलांना बसवा.”

नेहा भीतीने म्हणाली, “बाबा, तू पण बस ना, पाणी अजून वाढतंय.”

“मी शेवटी येतो ग, आधी तुम्ही जा.”

दिगूभाऊंनी मुलांना नौकेत बसवले.


पाणी आता देवळाच्या दारापर्यंत आले होते. वाऱ्याने छप्पर उडण्याच्या बेतात आले होते.


नौका हळूहळू पुढे निघाली. कामिनी पाण्याकडे पाहत होती, तिच्या नजरेसमोर घर, शेती, गोठा सगळे पाण्याखाली गेलेले दिसत होते.

“बाबा येणार ना आपल्यामागे?” स्वरूपने विचारले.

 “हो ग बाळा,” कामिनी म्हणाली, “ते देवळातलया काही गोष्टी घेऊन येत आहेत.”

थोड्याच वेळात नौका शाळेच्या प्रांगणात पोहोचली. शाळेच्या पहिल्या मजल्यावर लोक जमा झाले होते. कोणी रडत होते, कोणी सामान छातीशी घट्ट धरून होते.


नेहा कोपऱ्यात बसून खिडकीतून बाहेर पाहत होती.

“आई, पाणी अजूनही वाढतंय... ते बघ, आपल्या आंब्याच्या झाडाचे फक्त टोक दिसत आहे.”

 “हो गं, पण तू घाबरू नकोस झाड नक्की टिकेल, मुळे घट्ट असली ना तर कितीही पाणी आले तरी काही करू शकणार नाही,” कामिनी म्हणाली.

तेवढ्यात दिगूभाऊ आले, ते पूर्णपणे भिजलेले, थकलेले होते, पण त्यांना पाहून कामिनी आणि त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.

“जनावरे आधीच मोकळी केली होती. आपल्या गायीने तिच्या वासराला वाचवले, पण बैल मात्र सापडत नाही.” त्यांचा आवाज दाटून आला होता.

नेहा धावत त्याच्या गळ्यात शिरली.


“बाबा, आता आपण कुठे राहणार आपले घर तर?”

 “पाण्यात गेले ना, पण आपण सगळे आहोत ना, पुन्हा नवीन घर उभे करू.”

रात्रभर पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. शाळेच्या खालच्या वर्गात पाणी शिरले होते. लोक वरच्या मजल्यावर हळूहळू सरकत होते. लहान मुले रडत होती, म्हातारे लोक घाबरून प्रार्थना करत होते.

सकाळी जोशी भटांनी घोषणा केली.

“ज्यांच्याकडे औषधे, अन्न आहे त्यांनी ते सगळ्यांना वाटावे. सरकारची मदत पोहोचायला अजून वेळ लागेल.”

दिगूभाऊ उठून उभे राहीले,

 “आम्ही पिशवीतुन थोडे पीठ आणि सुके नारळ आणले आहेत, चला ते थोडे थोडे वाटून घेऊया.”


 नेहाने पिशवीतून दोन पोळ्या काढल्या आणि बाजूला बसलेल्या म्हाताऱ्या आजीला दिल्या.

“आजी, या घ्या. तुम्हाला याची जास्त गरज आहे.”


 “बाळ, तू खा आधी,” आजी थरथरत म्हणाली.
 

“आई म्हणाली, एक दिवस उपवास केला तरी चालेल.” नेहा डोळ्यात पाणी आणून हसली.

संध्याकाळी आकाश थोडे उजळले, पण नदीचा आवाज अजूनही भेसूर येत होता. दूरवरून एक मुलगी ओरडत आली,

“माझे बाळ पाण्यात पडले ... वाचवा!”

गोंधळ उडाला. लोकांनी विजेरी लावून शोध सुरू केला. दिगूभाऊ देखील पाण्यात उतरायचा प्रयत्न करत होते, पण जोशी भटाने त्यांना थांबवले.

“नाही दिगूभाऊ, पाण्याचा ओघ जबर आहे.”

“एखादे लेकरू असहाय्यपणे वाहून जाईल आणि आपण फक्त बघत बसायचे का?”

दिगूभाऊ थांबले नाहीत. त्यांनी एका दोरीचा शेवट कमरेला बांधला आणि पाण्यात उतरले.

दहा मिनिटांनी ते परत आले, त्यांच्या हातात तीन वर्षांची मुलगी होती, तिचा श्वासोच्छवास हळू हळू चालू होता. लोकांनी टॉवेलने तिला पुसले. नेहा तिच्या जवळ बसली, तिच्या हाताला, पायाला तेल लावून त्यांना गरम करू लागली. 


“हिचे नाव काय आहे ?” तीने विचारते.


 “आरती,” कोणीतरी म्हणाले, “आईचा हात सुटला.”

नेहाने आपला घास तिच्या तोंडाशी आणला.

“घे, तू खा.”

 “बघा, मुलीचे संस्कार कसे आहेत." कुणीतरी दुसऱ्याला सांगून नेहाचे कौतुक करत होते.”

त्या क्षणी कामिनीच्या डोळ्यात समाधानाची चमक येत होती.


रात्रीपर्यंत बचावपथकाने काही लोकांना गावाबाहेर नेले होते. दिगूभाऊंनी मात्र गावापासून बाहेर जाण्यास नकार दिला.

“आम्ही इथेच राहतो. अजून काही लोक सापडायचेत.”

जोशी भट म्हणाले,


“दिगूभाऊ इथे धोका आहे, इथून जितक्या लवकर निघता येईल तितके चांगले.”


“धोका तर रोज असतो, पण आज भीती वाटली तर उद्या गावात तोंड कसे दाखवू?”

थोड्या वेळाने पावसाचा जोर कमी झाला, पण नदी अजूनही ओसंडत होती.

दिगूभाऊंनी खाली असलेल्या देवळाकडे पाहिले.

“देवा, आता थांब. लोक थकलेत.”

रात्रीच्या शेवटी, इंगळे काकांच्या घराकडून बातमी आली.

“इंगळे काका दिसत नाहीत. पाण्यात वाहून गेले बहुतेक.”

कामिनी हात जोडून म्हणाली,

“त्यांनी काही दिवसापुर्वीच सांगितले होते ना, नदी कधीही रागावू शकते.”


नेहा खिडकीतून बाहेर पाहत होती. चंद्र ढगांआडून आपला प्रकाश पाडत होता पण त्याचा चेहरा काही दिसत नव्हता.

“आई, पाऊस थांबेल ना?”

“हो रे,” कामिनी म्हणाली, “पण पाण्याने नेलेले सगळे परत आणायला आपल्याला प्रयत्न करावा लागेल.”

बाहेर नदीचा ओघ हळू हळू कमी होत होता.

“पहा,” दिगूभाऊ म्हणाले, “पाण्याचा आवाज मंद होतोय... म्हणजे पहाट जवळ आहे.”

कामिनी स्वरूपला मांडीवर घेत पुटपुटली,

“बाप्पा, या गावाला पुन्हा एकदा सूर्य दाखव, तुला १०१ वेळा अभिषेक घालीन.”

शाळेच्या खिडकीतून बाहेर येणाऱ्या विजेच्या झगमगाटात नेहाला दूरवर काहीतरी चमकल्यासारखे दिसत होते, कदाचित पहाटेचे पहिले काही किरण नदीवर उतरत होते.

क्रमशः 

©®भालचंद्र नरेंद्र देव 

जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५

0

🎭 Series Post

View all