भाग ३
सकाळ झाली होती, ऊन पावसाचा शिवाशिवीचा खेळ चालू होता, पण सूर्याचा चेहरा अजूनही ढगांआडच लपलेला होता. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी पाण्याचा ओघ अजूनही थांबलेला नव्हता. शाळेच्या वरच्या मजल्यावर लोकांचा मेळा जमला होता, कोण भिजलेल्या चादरी वाळवत होते, तर कोण राहिलेले अन्न मोजत होते.
दिगूभाऊ खिडकीतून बाहेर पाहत होते. खाली सगळीकडे पाणीच पाणी फिरत होते. झाडांची फक्त टोके दिसत होती.
“हे बघ कामिनी,” ते म्हणाले,
“गावाचा नकाशाच बदलून गेलाय. जिथे जिथे रस्ता होता, तिथे तिथे नदीचे पाट पसरले आहेत.”
कामिनी गप्प होती. तिचे ओठ शांत होते, फक्त डोळ्यात एक प्रश्न सारखा सारखा डोकावत होता,
“कधी ओसरेल हे पाणी?”
तेवढ्यात दूरवरून हेलिकॉप्टरचा आवाज येऊ लागला. लोक बाहेर धावत आले.
“मदत आली! अन्न-पाणी टाकतायत!” कुणीतरी ओरडले.
सगळ्यांनी हात हलवले, पण पावसाच्या वार्यात पॅकेट्स बर्याचदा पाण्यातच पडत होती.
नेहाने धावत जाऊन एक पिशवी उचलली त्यात बिस्किटे, दोन बाटल्या पाणी, आणि काही औषधे होती.
ती ते सगळ्यांना वाटू लागली.
ती ते सगळ्यांना वाटू लागली.
“घ्या काका, बाळांना आधी द्या. आई म्हणते, उपाशीपोटी कुठलेच औषध घेऊ नये.”
जोशी भट आले आणि म्हणाले,
“दिगूभाऊ, आपण अजून वरच्या टेकाडावर लोकांना स्थलांतरीत करतोय. काही नाविक आलेत, नौका तयार आहेत. जितके वाचवता येईल तितके वाचवायचे.”
दिगूभाऊने विचारले,
“पाणी अजून वाढतंय का?”
“हो. काल रात्री धरणाच्या पुढच्या काही गेटमधून देखील पाणी सोडले आहे असे म्हणतात.”
नेहा खिडकीतून खाली पाहत होती. लांबवर एका झाडाच्या शेंड्यावर दोन बकऱ्या अडकल्या होत्या.
“बाबा, त्या बिचाऱ्या बकऱ्या बघ, आपण त्यांना वाचवू शकतो का?”
दिगूभाऊकडे उत्तर नव्हते. त्यांनी फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
“बेटा, सगळ्यांना वाचवता येत नाही. पण आपण प्रयत्न थांबवायचे नाहीत.”
दुपारच्या सुमारास नदीच्या ओढ्याने शाळेतील एक बाजू कोसळली, लोक किंचाळले. कुणीतरी ओरडले,
“माणसे पाण्यात पडलीत!”
दिगूभाऊ धावत गेले. जोशी भटांनीं दोरी फेकली, दोन तरुण पाण्यात उतरले.
“जपून! पायात ओढ आहे!” त्यांच्यापैकी कोणी तरी ओरडला.
पण या सगळ्या गडबडीत एक तरुण सगळ्यांसमोर वाहून जाऊ लागला. सगळीकडे रडारड सुरु झाली, पण कोणालाच काही करता येणार नव्हते. काही क्षणानंतर सगळे स्तब्ध झाले, पाण्याचे रौद्ररूप ते पाहत होते.
स्वरूप आईच्या कुशीत शिरला.
“आई, देव इतका रागावला का?”
“नाही रे बाळा,” कामिनी म्हणाली, “देव रागावत नाही, पण माणूस विसरतो की निसर्ग देवासारखाच असतो.”
इतक्यात नेहाकडे एक छोटे मुल आले, त्याचा चेहरा फिकट पांढरट झाला होता.
“ताई, प्यायला पिण्याचे पाणी राहिले आहे का?”
नेहाने तिचे शेवटचे पाणी राहिलेली बाटली तिला दिली.
“हे घे. थोडे उरवून पी, अजून आपल्याला माहित नाही किती काळ असे राहावे लागणार आहे.”
मदतीची वाट आणि घोर निराशा घेऊन प्रत्येक जण वावरत होता.
संध्याकाळ झाली तशी नदीचा आवाज अजून भेसूर झाला. आकाशात गडद राखाडी रंग पसरला होता. तेवढ्यात राऊळ दादांचे कोणीतरी नाव घेतले,
“ते कालपासून दिसले नाहीत!”
दिगूभाऊचा चेहरा गंभीर झाला.
“मी पाहून येतो,” ते म्हणाले.
“नाही!” कामिनी घाबरून म्हणाली,
“आता बाहेर पाणी फार वाढलंय तुम्ही परत बाहेर जाऊ नका, तुम्हाला तुमच्या मुलांची शपथ आहे.”
“राऊळ दादा आपल्याबरोबर दोन दिवसापासून होते, आता अचानक कुठे गेले, त्यांना इथे जवळपास तरी शोधलेच पाहिजे.”
त्यांनी दोरी कमरेला बांधली आणि एका तरुणासोबत खाली उतरले. पाण्यात पाय टाकताच थंड तापमान अंगभर चुरचुरायला लागले. अंधारात वाट काढत ते पुढे जात होते.
“राऊळ!” ते ओरडले. “दादा, कुठे आहात?”
उत्तर येत नव्हते त्यामुळे ते शाळेच्या भग्न भागाकडे वळाले. तिथे पाण्यात काहीतरी तरंगत होते. हळूहळू जवळ गेल्यावर त्यांना दिसले, राऊळ दादा एका झाडाच्या फांदीला अडकले होते. त्यांचा श्वास चालत नव्हता. चेहरा मात्र पाण्यात राहून फुगलेला दिसत होता. जणू नदीने त्यांना परत वर पाठवले होते.
दिगूभाऊ काही क्षण पाण्यातच थांबले.
“दादा... तुम्ही इतके दिवस आमच्या बरोबर होतात,” तो कुजबुजला, “या पुराने खरंच आतापर्यत चांगली चांगली माणसे गिळंकृत केली आहेत.”
त्यांनी राऊळ दादाचे शरीर त्याच्या आसऱ्याजवळ आणले. पण त्यांना बघून लोकांनी नाक मुठीत धरले आणि या प्रेताला कशाला इथे आणले, इथे आधीच रोगराई पसरली आहे त्यात भर नको, लोटून टाका याला पुन्हा पाण्यात सध्या अंत्यसंस्कार करायला आपल्याकडे काहीच नाही.
हे ऐकून कामिनी डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली, तिला त्यांची पूर्वीची आठवण आली.
“त्यांनी एकदा सांगितले होते, ही आपली गिरीजा नदी आईसारखी आहे", पण त्यांना हे लक्षात आले नाही कि आईही रागावते कधी कधी.
त्या रात्री सगळे शांत होते. कोणी रडत नव्हते, कारण सगळ्यांना माहीत होते, प्रत्येक घरातुन कोणीतरी वाहून गेले होते.
दिगूभाऊ शाळेच्या गच्चीवर बसले होते. दूरवर वीज चमकली आणि तिच्या उजेडात पाण्यावर तरंगणारी पिकांची कणसे दिसत होती.
“हे पाणी जे घेऊन गेलंय ना कामिनी,” दिगूभाऊ म्हणाले, “ते नक्की परत देईल. आपली माती जिवंत होईल, पुन्हा सोनेरी कणसे उगवतील.”
कामिनी त्याच्या शेजारीच बसली होती.
“घर गेले, पण लोकांची माणुसकी टिकून राहू दे एवढेच वाटते, आता ती देखील जाऊ लागली आहे असे वाटायला लागले आहे.”
नेहा बाजूला बसून काहीतरी वहीत लिहत होती.
“काय लिहतेस ग?” दिगूभाऊंनी विचारले.
काही नाही हा पूर संपल्यावर काय काय करायचे याची यादी बनवत आहे, तेवढेच या नैराश्यावर मात करण्याचा प्रयत्न करत होते."
दिगूभाऊ हसले. “तुझ्या मनात अजूनही आनंदी राहण्याची ओढ आहे हे पाहून बरे वाटले.”
रात्र सरू लागली होती. फक्त नदीचा मंद खळखळणारा आवाज येत होता. आकाशात हलकासा तांबूस प्रकाश दिसू लागला पहाटेचा संकेत सगळ्यांना आनंद देत होता. जोशी भट आले आणि म्हणाले,
“पाणी ओसरायला लागलंय, असेच राहिले तर उद्या सकाळी सगळ्यांना बाहेर पडता येईल.”
दिगूभाऊंनी कामिनीकडे पाहिले, आणि हळूच पुटपुटले,
“आता पुढच्या कामाला लागले पाहिजे.”
नेहाने खिडकीतून बाहेर पाहिले. आकाशातला पहिला किरण नदीवर उतरला होता, ती म्हणाली,
“आई, बघ, सूर्याचे रूप पाण्यात दिसू लागले आहे.”
कामिनी डोळे मिटून म्हणाली,
“हो गं, देव कधी कधी पूर घेऊन येतो, ते फक्त इथल्या माणसांना जागे करण्यासाठी, जे जिवंत राहिले त्यांनी आता तरी यावरून धडा घेतला पाहिजे.”
क्रमशः
©®भालचंद्र नरेंद्र देव
जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा