Login

नदीचा कोप ४

महापुरात अडकलेल्या कुटुंबाची करुण कहाणी
भाग ४

ती रात्र गेली, तीन दिवस झाल्यानंतर पाऊस थांबला. ढग हळूहळू दूर सरकू लागले, आणि सूर्यकिरणांची पहिली रेष झाडांच्या पानांतून झिरपली. गावाचा चेहरा ओळखू येत नव्हता, सगळीकडे चिखल साचलेला होता. तुटलेली झाडे, वाहून गेलेल्या घरांचे अवशेष सगळ्या लोकांचे खच्चीकरण करत होते.

शाळेच्या गच्चीवरून दिगूभाऊ, कामिनी, नेहा आणि स्वरूप खाली उतरले. पायाखाली भयंकर ओलसर माती आणि थंड वारा अंगाला डसत होता. गावातील काही माणसे अजूनही त्या उंच जागेवरच बसली होती, कोणाच्या चेहऱ्यावर सुटका, तर कोणाच्या नजरेत पुढच्या संकटांची मांदियाळी दिसत होती.

“चला, आपले घर पाहू या… काही उरले असेल की नाही कोणास ठाऊक?” दिगूभाऊ पोट तिडिकेने बोलत होते.

“देव करो आणि घराचे छप्पर तरी सापडो.” कामिनी डोळ्यात आसवे लपवण्याचा प्रयत्न करत होती.

 “आई, शाळा… शाळा सुरु होईल ना लगेच?” नेहाला तिच्या अभ्यासाची काळजी होती.

 “सगळे बघू बाई, पण एकेक करून.” दिगूभाऊ सगळ्यांचे समाधान करत होते. 

रस्त्यात चिखलात पाय रुतत होते. काही ठिकाणी खड्डे पाण्याने अजूनही भरलेले होते. नदीच्या दिशेने पाहिले तर ओळखीचा पूल गायब होता, फक्त लोखंडी बीम आणि पाण्यात तरंगणारे काही तुकडे दिसत होते. सगळीकडे मेलेल्या जनावरांचा खच पडला होता आणि त्यावर माशा घोंगावत होत्या.

गावात पोचल्यावर सगळ्यांनीं नाकावर बोट ठेवले, घाणेरडा तीव्र वास त्यांच्या नाकपुड्यात पोहोचला होता. घराच्या जागेवर पोहोचताच कामिनीच्या डोळ्यावर अंधारीच आली, तिच्या डोळ्यांसमोर त्यांचे घर नव्हते. फक्त घराच्या जागेवर विटांचा ढीग होता आणि वाड्याचा अर्धा पाया दिसत होता.

“अहो हेच का आपले घर, काहीच राहिले नाही?” कामिनी रडतच बोलू लागली.

“घरासकट, आपले आयुष्य देखील पाण्यात गेले असे वाटू लागले आहे, पण नशीब बघ, आपण सगळे अजूनही एकत्र आहोत ना. तेच महत्वाचे आहे.” दिगूभाऊ खिन्न स्वरात म्हणत होते.

“बाबा माझ्या वहीतल्या कविता देखील गेल्या.” नेहा देखील रडवेल्या आवाजात बोलू लागली.

 “त्या गोष्टी तू पुन्हा लिहिशील ग, पण आता सध्या जगणे महत्वाचे आहे.”

ते सगळे तसेच एका तुटलेल्या भीतीवर बसले. स्वरूपने चिखलातल्या त्याच्या छोट्या खेळण्याला पाहिले, त्याचा छोटा ट्रक होता तो. त्याने तो स्वच्छ करून आईला दाखवला.

“आई, बघ ना! माझा ट्रक वाचला! आता आपल्याला विटा घेऊन यायला जास्त त्रास होणार नाही, माझा ट्रक आपल्याला मदत करेल."

  
 “देवाने एक तरी आठवण ठेवली.” कामिनीला रडवेल्या अवस्थेत देखील हसायला आले.

दरम्यान, गावात प्रशासन पोचले होते. मोठी गाडी गावात आली, त्यातून मोठ मोठे अधिकारी राजकारणी येऊ लागले, कॅमेरा घेऊन फिरणारे काही लोक प्रत्येक ठिकाणाची छायाचित्रे काढत होते. गावात वेगवेगळ्या घोषणा होत होत्या.

 “सरकारतर्फे पूरग्रस्तांना मदत दिली जाणार आहे, प्रत्येकाने आपले नाव नोंदवा आणि झालेल्या नुकसानीचे विवरण द्या!”

दिगूभाऊ त्या मंडळाजवळ गेले.

“माझे नाव दिगंबर नारायण नेवरेकर. माझे पूर्ण घर वाहून गेले आहे.”


“ गावाच्या यादीत तुमचे नाव नाही दिसत. तुम्ही याआधी कधी नोंदणी केली होती का?” तिथला लिपिक नाव लिहिण्यास टाळंटाळ करत होता.


“आधी कधी नुकसान झाले नाही तर मग नोंदणी करायला कशाला येऊ?” दिगूभाऊ राग दाबत म्हणाले.


“थांबा थांबा, हा माझ्या गावातला माणूस आहे. नाव टाका याचे, सगळे गावकरी साक्ष देतील.” जोशी भट सरपंच म्हणून त्या लिपिकाला सांगत होते.

लोकांनी देखील हुंकार दिला. प्रशासनाने फोटो काढले, नावे लिहली, पण काही ठोस मदत मिळेल असे वाटत नव्हते.

“हे फक्त लिहून जातील की खरंच आपल्याला काही मदत करतील?” कामिनी संशयाने नवऱ्याला विचारात होती.


“कामिनी, आपण वाट पाहू या. मदत नाही मिळाली तरी आपल्याला घर हे बांधावेच लागणार, थोडे थोडे करून सुरुवात करू” दिगूभाऊ कामिनीची समजूत काढत म्हणाले पण प्रत्यक्षात त्यांनाच पुढे कसे होणार याबाबत संशय होता.

त्या संध्याकाळी गावात लाकडाच्या ओंडक्यांवर आग लावली गेली. गावातील सगळे लोक थंड वाऱ्यातून बाहेर येण्यासाठी  उब घेत होते. कोणाचे जनावर वाहून गेले होते, कोणाचे घर, कोणाचा नातेवाईक हरवला होता.

नेहा एका भग्न भिंतीजवळ बसली होती, तिच्या शाळेच्या इमारतीचा तो भाग होता. भिंतीवर अजूनही एक फिकट झालेले घोषवाक्य दिसत होते,

“शिक्षण म्हणजे जीवनाची खरी दिशा.”

नेहाने मातीने बोट भिजवून त्याखाली हळूच लिहिले,

“नदी रागावली की जीवनाची दिशा नाहीशी होते.”

“ताई, तू काय लिहिललेस?” स्वरूप तिच्याकडे येत प्रश्न विचारत होता.

“आपल्यावर रागावलेली नदी आपल्याला खूप काही शिकवून गेली, स्वरू.”


 “काय?” स्वरूपने विचारले.

 
“आपण निसर्गाचा भाग आहोत. त्याला हरवायचा प्रयत्न न करता त्याच्याबरोबरच जगायला शिकायला हवे.”

रात्र पुन्हा काळी झाली,  चौघे जण प्रशासनाने दिलेल्या तात्पुरत्या तंबूमध्ये पडलेले होते, या वेळी त्या काळोखात आशेचा एक किरण होता. कामिनीने देवळातून आणलेला एक छोटा दिवा पेटवला होता.

“या दिव्याच्या प्रकाशाच्या लहान ज्योतीसारखे आपण आपले घर पुन्हा उभारून दाखवू. घर जरी गेले तरी आपली हिम्मत जाऊ देऊ नका.”

 “हो कामिनी, या चिखलातूनच नवीन बी उगवेल. उद्या पहाटे मी शेत बघायला जाईन. पाण्याने किती नेले अन किती उरले आहे हे पाहता येईल.” दिगू भाऊ म्हणाले.


नेहा व स्वरूप आईच्या कुशीत शिरले. बाहेर चंद्रकिरणांनी पाण्याच्या थेंबांना चांदीचा रंग दिला होता. ते दृश्य शांत होऊन सगळ्यांची माफी मागत होते असे वाटू लागले.

त्या रात्री, पहिल्यांदाच, गावातील सगळ्यांना थोडा विसावा अनुभवला. हो, घर दार, शेती उद्ध्वस्त झाली होती, पण जिवंत राहिल्याचे समाधान प्रत्येकाच्या मनात पेटलेल्या त्या दिव्यासारखे झळकत होते.

क्रमशः 

©®भालचंद्र नरेंद्र देव 

जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५
0

🎭 Series Post

View all