Login

नदीचा कोप ५ अंतिम भाग

महापुरात अडकलेल्या कुटुंबाची करुण कहाणी

भाग ५ अंतिम भाग

पूर ओसरून दोन आठवडे झाले होते. चिखल सुकू लागला होता, पण दुर्गंधी आणि माशांचा त्रास वाढला होता. गावात लोक पुन्हा घरे बांधू लागली होती. शेते पाण्याखालून उघडी पडत होती, मोडकळीस आलेल्या झाडांच्या फांद्याना पुन्हा नवीन पालवी फुटत होती.

दिगूभाऊ रोज सकाळी नदीकाठी जायचे. पाण्याच्या पृष्ठभागावर त्यांना कधी कधी इंगळे काकांची  तर कधी राऊळ दादांची आठवण यायची.

“ या पुरात नदीने खूप सारे जीव घेतले होते,” ते मनाशीच म्हणत असत.

गावात मात्र एक नवीन संकट सुरू झाले होते, साथीचे रोग गावात थैमान घालू लागले होते. पूर गेल्यावर दूषित पाण्यामुळे ताप, पोटाचे विकार, कॉलरा आणि इतर जंतुसंसर्ग पसरू लागले होते. आरोग्य केंद्रात औषधे संपू लागली होती, साथ भयंकर असल्याने बरेच डॉक्टर स्वतःहून गावाबाहेर गेले होते, जे होते त्यांना इतक्या लोकांना सांभाळणे कठीण जात होते.

त्या दुपारी कामिनी पाण्याची कळशी भरून आली, आणि तिला दिसले कि स्वरूप थरथरत बसलेला होता.

“स्वरूप , काय झाले तुला? अंग गरम आहे का?” कामिनी काळजीने त्याच्या डोक्याला हात लावून म्हणाली.


“आई, थंडी वाजतेय… आणि पोट देखील दुखते आहे.” स्वरुप कमकुवत आवाजात बोलत होता. 

दिगूभाऊंनी हात ठेवला, अंग निखाऱ्यासारखे तापलेले होते.

 “कामिनी, त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ या लगेच.” दिगूभाऊ म्हणाले.

ते गावाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले, पण तिथे गर्दीचा समुद्र आधीच भरलेला होता. सर्वत्र तापाची तक्रार, पोट दुखून रडणारी मुले दिसत होती. त्यांच्या बरोबर आलेले त्यांचे आईवडील देखील हताश दिसत होते


 “भाऊ, माझ्या मुलाला भरपुर ताप आहे. डॉक्टर आहेत का?” दिगूभाऊ तेथे काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीशी बोलत होते.

 “डॉक्टर तालुक्याला गेलेत. सगळी औषधे संपली आहेत. सगळ्यांना हलका ताप येत आहे, सध्या थंड पाण्याच्या घड्या कपाळावर ठेवत रहा.”

दिगूभाऊ थबकले. कामिनी हातात आदित्यचे डोके धरून होती.

“त्याला बघा तरी… त्याचे ओठ पांढरे झाले आहेत.” कामिनीचा आवाज बोलताना थरथरत होता.

“आम्ही काय करू ताई? सरकारने मदत पाठवली नाही अजून.” कर्मचारी खांदे उडवत म्हणाला.


ते परत निघाले. संध्याकाळपर्यंत स्वरुपची अवस्था वाईट झाली होती. नेहा त्याच्या जवळ बसून ओल्या कपड्याने त्याचं अंग पुसत होती.

 “स्वरू… तुला शाळेत जायचं आहे ना अजून.” नेहा डोळ्यात पाणी आणून बोलत होती.

“ताई… माझा ट्रक कुठे ठेवला आहेस?” स्वरूप त्या अवस्थेत देखील कमकुवत हसत होता. 

“तो सुरक्षित आहे रे. तू बरा हो मग आपण अजून मोठा घेऊन येऊ आणि सगळे मिळून खेळू.” नेहा तिच्या मनातल्या वेदना दाबत होती. 

रात्र होत गेली. कामिनी देवाजवळ हात जोडून बसली होती, ती पुटपुटत होती.

“देवा, घर घेतलेस, शेत नेलेस, पण माझे लेकरू सोड. तू जितक्या माझ्या परीक्षा घेशील त्याला मी सामोरे जाईन.”


दिगूभाऊ बाहेर शांत बसले होते. पुढे काय करायचे या बद्दल त्यांना चिंता लागून राहिली होती.

पहाटेच्या आधी स्वरुपचा श्वास मंद झाला.

“अहो ! अहो , बघा ना...!” कामिनी जोरात ओरडली.


 “स्वरूप ! बाळा… बोल रे काहीतरी!” दिगूभाऊ घाबरून धावत आले. 

पण त्याचे डोळे अर्धवट उघडेच राहिले होते. त्याचे छोटे शरीर थंड होऊ लागले होते.

क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. मग कामिनीचा हंबरडा फुटला.

“देवा, यालाही नेलेस का रे! मला पोरके करून तुला काय मिळाले?”

नेहा तिथेच बसून होती. तिच्या हातात अजूनही स्वरुपचा छोटा ट्रक होता. तिने तो हळूच जमिनीवर ठेवला आणि रडत रडत डोळे मिटून बसली.


“तू देखील इतरांसारखा आम्हाला सोडून गेलास रे.” नेहा रडत होती. 

गावात त्या दिवशी तीन मुलांचे अंत्यसंस्कार झाले. स्वरुप त्यातलाच एक होता. त्याचे छोटे शरीर स्मशानाच्या कडेला पुरले गेले. दिगू भाऊंनी हातात माती घेतली, पण ती टाकायला त्यांचा हात थरथरत होता.

“दिगूभाऊ, देवाची इच्छा म्हणावे लागेल.” जोशी भट सांत्वन करत होते.

“देवाची इच्छा नाही ही, जोशी भट ! ही प्रशासनाची चूक आहे. आरोग्य केंद्रात औषधे नव्हती, डॉक्टर नव्हते… सगळे  सरकार झोपले आहे!” दिगूभाऊंच्या डोळ्यात आग होती.


ते शब्द ऐकून सगळे गावकरी गप्प झाले. प्रत्येकाच्या मनात दडलेला राग दिगूभाऊंनी व्यक्त केला होता.

कामिनीने देवाजवळ दिवा लावला होता . नेहाने दिव्याच्या बाजूला आदित्यचा ट्रक ठेवला.

काही दिवसांनी गावात पुन्हा तळपता सूर्य उगवला. मदतीच्या गाड्या आल्या, नवीन आरोग्य केंद्र उभारले गेले. पण दिगूभाऊंच्या घराच्या देव्हाऱ्यात अजूनही तो छोटा ट्रक ठेवलेला होता, त्याच्या चाकांवर चिखल वाळून दगडासारखा झालेला होता.

नेहा दर सकाळी त्याच्याजवळ बसायची.

“तू म्हणाला होतास ना, ताई ट्रक वाचला… पण खरे तर तूच त्या ट्रकमध्ये बसून दुसऱ्या जगात निघून गेलास.” नेहा मनातल्या मनात बोलत होती.  

नदी पुन्हा शांत वाहू लागली होती. वाऱ्याने झाडे पुन्हा हिरवीगार होऊन डुलत होती.

समाप्त 

©®भालचंद्र नरेंद्र देव 

जलद लेखन स्पर्धा ऑक्टोबर २०२५
0

🎭 Series Post

View all