Login

नकळत सारे घडले - भाग २

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग २

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


"अहो मितूची आई, आपली पोरगी पळून गेली हो!"
मितालीचे वडील रडवेल्या स्वरात खुर्चीवर बसून बोलत होते. त्यांचा अजूनही ह्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, की त्यांची मितू कोणाला काहीही न सांगता अशी निघून गेली.


त्यांना हे सगळे असह्य होतं होते. त्यांचे मन हे मानायला तयारच होत नव्हते, की त्यांची मिताली लग्नाच्या दिवशी पहाटे पहाटे पळून गेली. एका बापाच्या मनाला किती पीळ पडत असणार हे त्यांनाच माहिती.


"मला अजूनही कळतं नाहीये, ती असं कसं करू शकते? तिला काहीच कसं वाटलं नसेल हे असं वागताना."
मितालीची आई रडत रडत बोलू लागली.


"अहो ती काय सगळ्यांना सांगून करणार होती का हे! तुम्हाला लक्ष ठेवायला हवे होते. आता हे सगळं बोलून काय फायदा. गेली आपली पोरगी. आता इथून पुढे पुन्हा तिचं नाव देखील घ्यायचं नाही माझ्यासमोर! जमलेल्या सगळ्या पाहुण्यांसमोर तोंडावर पाडले तिने आपल्याला."
वडिलांचा पारा चढत होता. स्वतः चीच मुलगी त्यांच्याशी असं वागून निघून गेली; त्यामुळे आता तिचे नाव जरी घेतले तरी चीड येत होती.


"कालपर्यंत हळद लावताना ती खूप खुश दिसत होती. सगळ्यांशी छान बोलली, अगदी हसत हसत नाचली सुद्धा सगळ्यांसोबत.. आणि आज अचानक असे काय घडले? जे तिने इतकं मोठं पाऊल उचललं. असं करायला नको होतं तिने. आई वडिलांचा जरा तरी विचार करायला हवा होता. हे इतकं सगळं आपण तिच्यासाठीच तर करत होतो."
मितालीची आई अगदी भावूक होऊन बोलत होती. 


"अहो तुम्ही हे सगळं हौसेने करत होतात तिच्यासाठी, पण या सगळ्यात तिची मर्जी जाणून घेतली होती का? ती खरचं तयार होती का ह्या लग्नाला? की तुम्ही बळजबरीने उभ केलं होतं तिला बोहल्यावर! म्हणूनच हे सगळं घडलं. आधी मुलीच्या मनात काय चाललं आहे हे बघायला नको! नाहीतर मग हे असं तोंड काळं करून भर मांडवातून पळून जातात मुली.. आणि त्यांना याच काहीच वाटतं नाही. माघारी आई वडिलांचं काय होईल याचा विचार सुद्धा करत नाही."
लहान मामा सगळ्या जमलेल्या पहुण्यांममध्ये सुद्धा त्यांना चिडून बोलत होते.


"नाना, जे झालं ते झालं. तू जास्त काही बोलू नकोस त्यांना आता आणि त्रास करून घेऊ नकोस."
मल्हारची आई आपल्या लहान भावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती.


खरंतर ह्या सगळ्यात मुलाकडचे पाहुणे मंडळी सर्व लांबून लांबून लग्नासाठी आले होते. त्यांना तोंड देता देता नाकी नऊ आले होते, पण तरीही मोठे मामा पाहुण्यांना बसवत होते. त्यांची उठबस करत होते. दुपारचे लग्न होते आणि आता साधारण दहा वाजत आले होते. सकाळपासून कोणीच चहाचा घोट किंवा पोटात अन्नाचा कण सुद्धा घेतला नव्हता.


लांबून आलेल्या पाहुण्यांना किमान फ्रेश होऊन चहा नाश्ता तरी द्यायला हवा असे मोठ्या मामांना म्हणजेच तात्यांना वाटतं होते. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ती सगळी तयारी पहिली. आपल्या पाहुण्यांची तारांबळ नको व्हायला, आपल्यासाठी आलेत ते सर्व लोकं; त्यामुळे त्यांची व्यवस्था करावीच लागणार असे म्हणून ते बघत होते. त्यांच्या मोठ्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात हे असं अनर्थ घडायला नको होते.


'इतका चांगला शिकलेला मल्हार, आयटी कंपनीत मोठ्या पगारावर नोकरी, घर-दार, शेती-पोती सर्व सुख सोयींनी युक्त असे घर.. मग तरीही ती मुलगी का पळून गेली असावी? तिच्या जागी दुसरे कोणीही असते तरी हे इतके चांगले हातचे स्थळ सोडले नसते. माझ्या बहिणीला दाजींनी इतक्या वर्षात कधीच कसली कमी पडू दिली नाही. कधी तिचे मन दुखावले नाही.. इतके चांगले आहेत सगळे, मग हे असं तिच्याच बाबतीत का व्हावं?'
मल्हारचे मोठे मामा म्हणजे तात्या मनात विचार करत होते. बहिणीच्या बाबतीत हे घडायला नको होतं, असं त्यांना वारंवार वाटतं होतं आणि मल्हारकडे बघून वाईट ही वाटतं होते.
काय होईल पुढे जाणून घेण्यासाठी वाचत राहा पुढील भागात.

क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंगमध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.