Login

नकळत सारे घडले - भाग ४

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ४


दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर जानेवारी 2025 - 2026

मितालीचे वडील मल्हारच्या घरच्यांशी बोलायला आले होते. रडून रडून त्यांचा चेहरा अगदी सुकला होता आणि रागामुळे डोळे लाल झालेले होते.

"पाहुणे, आज जे काही झाले त्याची मी मनापासून हात जोडून माफी मागतो सगळ्यांची. माझ्या मुलीने असे करायला नको होते, तुमच्या घरी ती सुखात नांदली असती यात मला काडीमात्र शंका नव्हती. जे झालं ते खूप वाईट झालं, तुम्ही आम्हाला समजून घ्याल अशी आशा करतो. ह्या लग्नाचा तुमच्याकडून जो काही खर्च झाला तो मी पूर्ण भरून देण्यासाठी तयार आहे."

त्यांना असे सगळ्यांसमोर हात जोडून हतबल बघून खूप वाईट वाटले. मितलीची आई तर अजूनही आसवे गाळत होती.

"हे बघा, तुम्ही लग्नाच्या खर्चाची अजिबात काळजी करू नका. जे घडलं ते नक्कीच चांगल झालं नाही, पण इथून पुढे तुम्ही तुमची काळजी घ्या. शेवटी इतकंच म्हणेन, की तुम्ही मुलीशी आधी बोलून घ्यायला हवे होते. तिच्या मनात काय सुरु आहे हे जाणून मगच पुढे जायला हवे होते. आम्ही समजू शकतो तुमच्या मनाची परिस्थिती. अशा वेळी मुलीबद्दल राग आणि चीड येणं साहजिक आहे, पण तुम्ही ताईंना सावरा. त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. शेवटी मुलगी आहे ती तुमची."
मल्हारचे वडील त्यांना समजावून सांगत होते.


"ज्या क्षणी ती इथून निघून गेली, तेव्हाच आमच्यासाठी ती मेली. पुन्हा तिचे नाव आमच्या घरात कधीच घेतले जाणार नाही."
असे म्हणताच सगळे त्यांच्याकडे एकदम आश्चर्याने बघू लागले.


मितालीची आई एकदम शांत झालेली होती, पण डोळ्यातून पाणी मात्र चालूच होते. त्या आतून पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या. त्यांच्याजवळ दोघी तिघी जणी बसून त्यांना सावरत होत्या. कोणी पाणी पाजत होते तर कोणी त्यांचे डोळे पुसत होते.

मल्हार त्याच्या आई वडीलांजवळच उभा होता. तो खूप शांत वाटतं होता. अंगात हळदीचे कपडे तसेच होते. त्याच्याशी बोलणार तरी काय? तरीही मितालीचे वडील त्याच्याशी बोलायला पुढे आले.

"मल्हारराव, मी कोणत्या तोंडाने तुमची माफी मागू हेच कळत नाहीये मला. तरीही तुम्ही आम्हाला समजून घ्याल अशी आशा करतो. अखेर जे नशिबात असतं तेच घडतं, कदाचित तुमची गाठ दुसऱ्या कुठल्या मुलीशी बांधली गेली असेल! म्हणूनच हे घडले असे समजावे. ह्यावेळी तुमच्या मनाची चलबिचल मी चांगलीच समजू शकतो आणि तुमचा होणारा राग ही मी समजू शकतो."
पाठमोऱ्या उभ्या असलेल्या मल्हारला मितालीच्या वडिलांचे बोलणे कानावर पडताच तो त्यांच्याकडे वळला आणि त्यांचा हात हातात घेतला. क्षणभर थांबून तो पुन्हा तिथून काहीच न बोलता निघून गेला.


"त्याच्यासोबत सतत कोणीतरी थांबायला हवे."
लहान मामांनी तिथे असलेल्या त्याच्या मित्रांना पाहून सांगितले, तसे दोघे तिघे जण त्याच्या मागे तो ज्या दिशेने गेला तिकडे वळले.


"पाहुणे, मी खरचं अगदी मनापासून बोलत आहे. ह्या लग्नाचा तुमचा जो काही खर्च झाला असेल तितका मी भरून द्यायला तयार आहे. मनात कुठलीही अढी न ठेवता निसंकोचपणे बोला. आमच्या मुलीने जे काही केलं ते तिचे नशीब, पण मल्हार सारखा जावई आम्हाला लाभला नाही याची मात्र खूप खंत वाटते. तुमचा मुलगा खूप हुशार आणि कर्तबगार आहे. आम्हीच कुठेतरी कमी पडलो असू."
असे म्हणून मितालीचे वडील त्यांच्यापुढे हात जोडून उभे होते.
आता बघुया मल्हारचे वडील काय बोलतात ते, पण पुढील भागात.


क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंगमध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.