Login

नकळत सारे घडले - भाग ५

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणार दोघेह नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ५


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मितालीचे वडील मल्हारच्या घराच्यांची आणि लग्नाला जमलेल्या सर्व पाहुण्यांची माफी मागत फिरत होते. त्यांना असे हतबल बघून सगळ्यांना वाईट तर नक्कीच वाटतं होते, पण तरीही त्यांनी अगदी सर्व परिस्थिती योग्य रित्या सांभाळून घेतली होती.

पोटच्या मुलीने इतका मोठा विश्वासघात केला, तरीही ते शांतपणे हाताळत होते. मनात मात्र धुसपुस सुरूच होती, हे आईला बरोबर कळले. ते वरवर जरी दाखवत नसले, तरीही आतून तो माणूस पूर्णपणे तुटून गेला होता.

एका मुलीच्या लग्नात तिच्या सगळ्या ईच्छा पूर्ण करणे, तिला जे पाहिजे ते खरेदी करून देणे, कपडे दागिने.. सगळी हौस मौज पूर्ण करणे. अगदी लग्नाच्या मेन्यूपासून ते घर सजावट रुखवताचे सामान हे सर्व मितालीच्याच आवडीने करण्यात आले होते.

मुलीच्या लग्नात ते सर्व केले जे तिला आवडत होते. एक बाप म्हणून ते कुठेच कमी पडले नव्हते, मग तरीही तिने असे का केले असावे? हा प्रश्न तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच पडला होता, पण याचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते.


"आवरतं घ्या आता, निघुया इथून."
मितालीच्या वडिलांनी आईला सांगितले, तसे बाकीचे सामान बांधायला निघून गेले.

लग्नात घेतलेल्या सर्व वस्तू मितालीच्या आवडीच्या होत्या. टिव्ही, कपाट, डबल बेड, सर्व भांडी, वॉशिंग मशीन, आटा चक्की, सोफा.. इतकंच नव्हे तर अगदी एसी सुद्धा घेतलेला होता. हे सर्व सामान त्यांना पुन्हा घरी न्यावेसे वाटतं नव्हते, पण तरीही त्यांना ते न्यावे लागणार होते.


मितालीचे चुलत भाऊ सगळे कामाला लागले. कोणी गाड्यांमध्ये बॅगा भरत होते, तर कोणी पाहुण्यांना घरी सोडायला जात होते. मिताली आणि मल्हार.. स्टेजवर दोघांची नावं लावलेली बघून त्यांना जास्तच भरून आले. काही क्षण ते तिथेच बघत राहिले. इतक्यात मितालीच्या मोठ्या भावाने तिचे नाव काढून फाडून टाकले. त्यालाही खूप चीड येत होती, हे त्याच्या चेहऱ्यावरून साफ कळतं होते. बहीण तर पळून गेली, माघारी त्याच्याशी लग्नाला तरी कोण लगेच तयार होणार! हा प्रश्न त्याला सुद्धा पडलाच असेल.


"माधव, तू सुद्धा हात जोडून माफी मागून घे सगळ्यांची."
मितालीचे वडील मुलाला सांगत होते.

"पण का? ती गेली तिच्या कर्माने.. इथे मी का म्हणून माफी मागत फिरु सगळ्यांची?"
माधवला राग येत होता त्याच्या पळून गेलेल्या बहिणीचा, पण तिच्या बदल्यात त्याला माफी मागायची नव्हती.

"असे नको म्हणू, काहीही झाले तरी आपल्या घरातला मोठा मुलगा आहेस तू. उद्या तुझेही लग्न होईल; त्यामुळे ती जबाबदारी आतापासूनच सांभाळून घ्यायला हवी तुला. मिताली जरी पळून गेली तरी यात त्यांची सुद्धा काय चूक! मोठा भाऊ म्हणून तू त्यांच्याशी बोलायला पाहिजे. ह्या बापाची उरली सुरली लाज राख बेटा."
मितालीचे वडील मोठ्या मुलाला समजावून सांगत होते. त्यांना इतके हतबल याआधी कोणी कधी पाहिले नव्हते; त्यामुळे माधव त्यांना सावरू लागला.

"मी जातो बाबा त्यांच्याशी बोलायला. माफी मागतो आणि गरज पडली तर पाया सुद्धा पडेन मी, पण तुम्ही असे नका धीर सोडू. मी सगळे सांभाळून घेईन, तुम्ही काही काळजी करू नका. मी बघतो सगळे."
असे म्हणून माधव त्यांना धीर देऊ लागला तेव्हा त्यांना बरे वाटले.


मुलगी म्हणजे एका बापाची शान असते. घरची लक्ष्मी असते. ती हसली तर सारे घर आनंदात असते. तिच्यासाठी घरातले सर्व जण लाड पुरवायला तयार असतात. एकवेळ मुलाला नाही म्हणतील, पण मुलीला कधीच दुखवत नाही. इतक्या लाडा कोडात वाढलेली मुलगी, पण शेवटी असे काही करते तेव्हा बाप नावाचा माणूस पूर्णपणे खचून जातो.


क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंगमध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.