Login

नकळत सारे घडले - भाग ७

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ७


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मल्हारचे मोठे मामा म्हणजेच तात्या जमलेल्या पाहुण्यांमधे होणारी कुजबुज ऐकून त्यांच्या मनात एक वेगळाच विचार चमकून गेला. त्यांना बोलायचं होतं, पण सुरुवात कुठून? आणि कशी करावी? हेच समजत नव्हते. बोलायला जावं तरी कुणाजवळ?

'बहिणीशी बोलायला गेलं तर तिला काय वाटेल? बहिणीशी बोलायच्या आधी बायकोला तरी विचारायला पाहिजे. दोघांच्या बाजू समजून घेतल्या पाहिजे.'


तात्यांच्या मनात एक ना अनेक प्रश्न उभे राहत होते. त्यांना समजत नव्हते नेमकं बोलावं तरी कोणाशी. तरीही ते पुढे झाले. बहिणीकडे बघितले, ती खूप दुखी आणि टेन्शनमधे दिसत होती. नंतर बायकोकडे बघितले, ती बहिणीला सावरत बाजूलाच उभी होती. त्यांनी बायकोला हात केला. जरा बाजूला ये बोलायचं आहे म्हणून हळूच इशारा केला.


"सुनिता, मी आता जे काही बोलणार आहे ते प्लीज शांतपणे ऐकून घे. त्यानंतर विचार कर आणि मग बोल."
तात्यांनी बोलायला सुरुवात केली.

"अहो पण काय बोलायचं आहे नेमकं तुम्हाला?"
मामींना तर त्यांच्या बोलण्याचा अर्थच कळत नव्हता.

"मी जे काही सांगेन ते आधी ऐकून घे आणि तू मला समजून घेशील याची मला खात्री आहे."
तात्या हळूहळू बोलत होते आणि मामी त्यांना अगदी मन लावून ऐकत होत्या.

"आता बोला तरी नेमकं काय आहे ते."
मामींना आता धीर धरवत नव्हता.

"आज जे काही घडलं ते मला बिलकुल आवडलेलं नाही. असं नको व्हायला होतं."
तात्या बोलू लागले.


"हो खरंच, आज जे झालं ते कोणालाच आवडलेल नाही."
मामींनी पण लगेच त्यांचा सुर ओढला.

"ताई तर खूप नाराज झालेली दिसतेय. भाऊजी पण अगदी गप्प झालेत. राग तर आलाच असणार त्यांनाही आणि वाईटही वाटतं असणार आपल्या मुलासाठी, पण ते दाखवत नाहीये."
तात्यांनी बोलायला जम बसवला.


"हो ना, ताईंना खरचं खुप धक्का बसलाय."
मामी पुन्हा त्यांची बाजू घेत बोलल्या.


"हो ना, त्या घरात जी पण मुलगी जाईल ती खूप सुखात आणि आनंदात राहिली असती. तिथे कसलीच कमी नाही आणि दडपण नाही. ताई पण किती हौशी आहे."
स्वतः च्या बहिणी विषयी सांगताना ते अगदी भारावून जात होते.


"हो ना, त्यांनी तर सूनेसाठी किती दागिने बनवून ठेवले होते लग्नाआधीच आणि बऱ्याच भारी भारी साड्या सुद्धा घेऊन ठेवल्या होत्या. मल्हारचाची रूम तर कित्ती सुंदर सजवली होती त्यांनी. सून आल्यावर मी हे करेन ते करेन हे तर किती कौतुकाने सांगत होत्या."
सुनिता मामी तर नंदेच खूप कौतुक सांगत होत्या.

"मल्हार तर किती गुणी आहे आपला. अगदी कमी वयात त्याने बरेच काही करून दाखवले. त्याच्यासारखा जावई शोधून सुद्धा सापडणार नाही कोणाला. इतका हुशार गुणी मुलगा आणि त्याच्या बाबतीत हे असे घडावे.. विश्वासच बसत नाही."
तात्यांनी मनातले बोलुन दाखवले.

"हो ना खरचं, मल्हार खूपच हुशार आहेत. त्यांच्या बाबतीत हे नकोच व्हायला होते. जी कोणी मुलगी त्यांची बायको म्हणून आली असती ती खूप नशीबवान असती. खूप खुश ठेवले असते सगळ्यांनीच तिला."
मामी अगदी हळव्या होऊन बोलत होत्या.

"हो ना खरचं, म्हणूनच माझ्या मनात एक विचार आलाय. तुला आवडेल की नाही माहिती नाही, पण याचा विचार नक्की कर."
तात्यांनी पुन्हा एकदा बोलायची तयारी दाखवली.

"अहो मग इतका उशीर झाला तरी सांगा ना पटकन. नेमकं बोलायचं तरी काय आहे तुम्हाला?"
मामींनी आता जरा खोदून विचारले.

तात्यांना नेमकं काय सांगायचं असेल? काय चाललं असेल त्यांच्या मनात? जाणून घेण्यासाठी वाचा पुढील भाग.


क्रमशः

माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.