Login

नकळत सारे घडले - भाग ८

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणार दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ८


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मल्हारसारखा जावई मिळणे म्हणजे नशीबच, असे तिथे जमलेले सर्वच जण म्हणत होते. त्यांचे ऐकून तात्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी ती बोलायची हिम्मत देखील दाखवली, पण त्यांचा विचार सगळ्यांना पटेलच असे नाही. तरीही बोलून बघायला काय हरकत आहे.. असे म्हणून त्यांनी आधी त्यांच्या पत्नी म्हणजेच सुनीता बाईंना विचारायचे ठरवले. त्यांना बाजूला घेऊन हळूहळू विषयाला धरून पुढे बोलू लागले. सुनिता बाई पण त्यांच्या बाजूने बोलत होत्या. हीच वेळ आहे पुढचे बोलायची असे म्हणून मामांनी मनातला इतका वेळ दाबून ठेवलेला विचार त्यांच्यापुढे बोलून दाखवला.

"मी काय म्हणतो सुनिता, मल्हारसारखा खरचं आपल्याला भेटेल का कोणी?"
तात्या बोलत होते, पण बहुतेक मामींना त्याचा काहीच अर्थ लागत नव्हता.

"अहो नेमकं म्हणायचं तरी काय आहे तुम्हाला? मला समजेल असे तरी बोला."
मामी शेवटी वैतागून बोलल्या.


"इतकं सगळ चांगल आहे ताईच्या घरी, मग आपण आपल्या मीरासाठी विचार करायला काय हरकत आहे."
तात्यांनी शेवटी बोलून टाकले एकदाचे.

"काय?"
थोडा वेळ सुनिता बाई तर अगदी शॉकमध्ये गेल्या. त्यांना काहीच सुचत नव्हते पुढे काही बोलायला.

"अग बोल ना काहीतरी, अशी काय बघतेय. मी विचार करतोय तो अगदी योग्य आहे. कसलीच कमी पडू देणार नाही ताई आपल्या मीराला. अगदी पोटच्या लेकीसारखी माया करते ती तिची, मग विचार करायला काय हरकत आहे."
तात्यांना आता लवकरात लवकर निर्णय घ्यायचा होता.


"आपल्या मीरेसाठी, अहो काहीही काय बोलताय. पोटच्या पोरी विषयी असा कोण विचार करतं बरं. ती मुलगी पळून गेली; म्हणून तुम्ही स्वतः च्याच मुलीला उभ करणार का तिच्या जागी मांडवात."
सुनिता बाईंना तात्यांचे हे बोलणे काही पटतं नव्हते.

"अग पण थोडा तरी विचार कर ताईच्या बाजूने. आता असच गावात गेल्यावर ताईची किती नाचक्की होईल. ती मुलगी जरी पळून गेली ती तिच्या नशिबाने, यात मल्हारची काय चूक बरं! तरीही गावातली लोकं माहिती आहे ना तुला, त्यांना चघळायला काही विषय लागत नाही. उद्या उठून ते आपल्या मुलावर बोट ठेवतील, की ह्याच्यातच काहीतरी दोष असणार म्हणूनच ती मुलगी लग्नाच्या आधी भर मांडवातून अशी पळून गेली."
तात्यांच्या आवाज वाढत होता. आजूबाजूची उभी असलेली पाहुणे मंडळी बघू लागले होते.

"तुम्ही आधी शांत व्हा बरं, मला तर काही समजत नाहीये. तुम्ही असे अचानकपणे काहीतरी बोलाल याची जरा सुद्धा कल्पना नव्हती मला."
सुनिता बाईंना खरचं काय बोलावं हेच कळत नव्हते.

"आता यात विचार करण्यासारखी काय गोष्ट आहे बरं! माझी बहिण आहे ती. आजपर्यंत भाऊजींनी ताईला कसली कमी केली का? ती नेहमीच सुखी राहिली तिच्या संसारात. उलट तिच्या पायगुणाने भरभराट झाली, मग ती आपल्या पोरीला कसली कमी पडू देईल का कधी? थोडा तरी विचार कर. मी आपल्या मीराच्या भल्याचाच विचार करतोय."
तात्यांनी आता ठणकावून सांगितले.

मुलीसाठी कुठलाही बाप तिच्या भल्याचा, तिच्या चांगल्या भविष्याचाच विचार करतात. मग परिस्थिती कशीही असो, ते नेहमीच मुलगी सुखी रहावी हेच बघतात.


"मला नाही वाटतं ताई हो म्हणातील, त्यांना जर करायचं असतं तर याआधीच त्यांनी आपल्याला विचारले असते."
सुनिता बाई तर्क लावत बसल्या होत्या.

"अग तिच्या डोक्यात तरी होते का हे असे काही होईल म्हणून.. आता परिस्थिती समजून घे ना तू.. आणि मी सगळं चांगल व्हावं हाच विचार करतोय."
तात्या अगदी कळकळीने बोलत होते. त्यांना दोघांना असे बोलताना बघून लहान मामा मामी पण जवळ आले.

"तात्या, काय झाले? नेमकं काय चालू आहे तुमचं? इतका वेळ झाला दोघे काहीतरी बोलताय आणि चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय मला तुमच्या. सगळं ठीक आहे ना!"
लहान मामांनी दोघांना विचारले.

"हो भाऊजी, सगळं ठीक आहे. आम्ही ते असच बोलत उभे होतो."
सुनिता बाई उगाच वेळ मारून न्यायची म्हणून बोलून गेल्या, पण तात्यांना ते काही पटले नाही. त्यांनी सर्व खरं खरं सांगून टाकलं.
कितीही झालं तरी लहान भाऊ आहे तो त्यांचा; त्यामुळे त्याच्यापासून काहीच लपवून राहू शकत नाही.


"नाना, माझ्या मनात एक विचार चालू आहे. हे लग्न तर आता फिसकटलेच आहे, तर आपल्या मीरासाठी मल्हारबद्दल विचार करायला काय हरकत आहे."
तात्यांनी सरळ मुद्द्याला हात घातला.
आता पुढे बघुया सुनिता बाईंना हे पटते की नाही.


क्रमशः

माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.