Login

नकळत सारे घडले - भाग ९

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ९


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


"तात्या, तुझ्या मनात काय चाललंय हे कळतंय मला.. पण तरीही तू पुन्हा एकदा विचार करावा असं मला वाटतं."
लहान मामा म्हणजे नानांना पण हा विचार जरासा खटकत होता. इतक्या लवकर आणि ताबडतोब हा निर्णय घेणे जरा जिकरीचे आहे.

"ताईसाठी मी काहीही करायला तयार आहे."
तात्या मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होते.

"अहो आपल्या मुलीचा तरी विचार करा. तिला एकदा विचारायला हवे असे नाही वाटतं का तुम्हाला! सगळ्यात पहिले आपल्याला तिच्याशी बोलायला हवे, तिचे मत विचारात घ्यायला हवे."
सुनिता बाई आपल्या मुलीच्या बाजूने विचार करत होत्या जो अगदीच योग्य होता.

"हो वहिनी, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आपण मीरासोबत आधी बोलायला हवे. त्यानंतरच मग पुढचा जो काही निर्णय असेल तो फक्त तिच्यासाठी योग्य असायला हवा.. बस मला इतकंच म्हणायचं आहे."
नानांना पण वहिनी जे काही बोलत होत्या ते योग्य वाटले आणि त्यांनी ते स्पष्टपणे बोलूनही दाखवले.


"मीरा माझी मुलगी आहे. ती माझ्या शब्दाबाहेर नाही.. हे मी अगदी ठामपणे सांगू शकतो."
तात्या त्यांच्या मतावर ठाम होते.

"ती आपल्या शब्दाबाहेर नाही हे बरोबर आहे; म्हणून तुम्ही तिला काहीही मान्य करायला लावणारं का? तिची ईच्छा आहे की नाही हे जाणून घेणे गरजेचे वाटतं नाही का तुम्हाला!"
सुनिता बाई लांबूनच मुलीकडे बघून बोलत होत्या.


"मी स्वतः तिला विचारेन, मग तर झाले."
तात्या जोर देऊन बोलत होते.

"अहो, तुम्ही तिला हा निर्णय घ्यायला बळजबरी करताय असे नाही वाटतं का?"
सुनिता बाई अजूनही काळजीत बोलत होत्या.

"तुम्ही सगळे थांबा जरा, मी स्वतः तिच्याशी बोलायला जातो.. आणि कोणीही माझ्यामधे बोलणार नाही."
असे म्हणून तात्या अचानकपणे तिथून निघून गेले. त्यांच्या मागे मागे नाना आणि सुनिताबाई पण घाईघाईत गेल्या.

'न जाणो ते काय बोलतील मीरासोबत, ती तयार होईल की नाही याची जरा शंकाच आहे. नाही म्हंटले तरी तिच्यासाठी हा अचानकपणे फोडलेला बॉमच आहे.'
सुनिता बाई मनातल्या मनात विचार करत होत्या.

"तात्या, जरा दमाने घे. एकदम तिला कसलीही कल्पना न देता तू असं बळजबरी नाही करू शकत तिच्यावर."
नानांना पण तिची काळजी वाटत होती.

"तुम्हाला दोघांना काय वाटतं, मी ओरडून बळजबरी करून बोलणार तिच्याशी! माझी मुलगी आहे ती.. तिला प्रेमाने समजून सांगणार मी सगळे. ती माझे मन नक्कीच समजून घेईल. तुम्ही जितक्या शंका घेताय माझ्यावर, पण ती मला काही सुद्धा बोलणार नाही याची मला खात्री आहे. मला मीरावर पूर्ण विश्वास आहे."
तात्यांना स्वतः च्या मुलीवर स्वतः पेक्षा पण जास्त विश्वास आहे, हे ते प्रत्येक वेळी बोलून दाखवत होते.

तात्यांना असे बोलताना पाहून नाना आणि सुनिता बाईंना आता जास्तच काळजी वाटतं होती मीराबद्दल. तिला काय वाटेल.. हाच प्रश्न दोघांच्या मनात घुमत होता.

तात्या काय बोलतील मीरासोबत? त्यांच्या ह्या बोलण्यावर मीराला काय वाटेल? जाणून घेण्यासाठी वाचत रहा पुढील भाग.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.