Login

नकळत सारे घडले - भाग १०

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळतपणे एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग १०

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


तात्या मीरासोबत बोलायचे; म्हणून तरातरा तिच्या दिशेने गेले, पण अचानक मध्येच थांबले. त्यांच्या मनात असंख्य विचारांचे जाळे तयार झाले होते. ते असे का थांबले असतील? हे मागे उभे असलेल्या नानांना आणि सुनिता बाईंना अजिबात कळले नाही. ते दोघेही त्यांच्याकडे बघून अंदाज घेऊ लागले.

"तात्या, आता असे का मध्येच थांबला? काय झाले?"
नानांना वाटले त्याने त्याचा निर्णय बदलला असेल.

"ते.. मला असे वाटते की आधी मी ताईसोबत बोलून घ्यायला हवे आणि.. मग."
तात्या बोलता बोलताच आधी ताईकडे वळले.

"ताई, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी."
मल्हारची आई चिंतेत दिसत होती.

"हा बोल ना तात्या, काय झाले?"
ताईने सहज विचारले.

"इथे नको, आपण जरा बाजूला जाऊन बोलू शकतो का?"
तात्यांना तिथे सगळ्यांमध्ये बोलणे योग्य वाटले नाही.

"का? काय झाले? काही झालंय का?"
त्याला असे विचारात बघून ताईला जरा काळजी वाटली.

"नाही, तसे काळजीचे काही कारण नाही.. पण तू जरा बाजूला येतेस का आमच्यासोबत?"
तात्यांचे बोलणे ऐकून ताई लगेच उठून उभ्या राहिल्या. त्यांच्यासोबत बाजूला जाऊ लागल्या.

"तात्या, अरे नेमकी काय भानगड आहे. तू अचानक असे बाजूला जाऊन बोलायचे म्हटले. सर्व ठीक आहे ना! आपण निघुया थोड्याच वेळात सर्व आवरले की.. मग तर झालं."
ताईंना वाटले की तिथून कधी निघायचे असे विचारणार असेल.

"नाही ते नाही, मला जरा दुसरेच बोलायचे आहे तुझ्यासोबत. विषय थोडा नाजूक आहे."
तात्या जरा अडखळतपणे बोलत होते हे ताईच्या लक्षात आले.

"अरे मग बोल ना लवकर, असं का अडखळत बोलत आहे."
ताईला तर काहीच कळत नव्हते.

"माझ्या मीराला तुझ्या घरची सून म्हणून स्विकारशील?"
आता न अडखळता तात्यांनी एका दमात विचारून टाकले.

"काय?"
ताईला तर काय बोलावे हेच समजत नव्हते.

"तुला सून म्हणून मल्हारसाठी माझी मीरा चालेल?"
आता तात्यांनी हात जोडून पुन्हा विचारले.

"अरे! हे काय बोलतोयस तू?"
अचानक हे ऐकून ताईला अगदी भरून आले होते.

"तुला योग्य वाटतं नसेल तर ठीक आहे. माझी काही बळजबरी नाही."
तात्यांना वाटले ती नको म्हणतीय.


"तात्या, अरे लाज राखली बघ आज तू माझ्या घराची. कोणत्या तोंडाने गावात जाणार होतो आम्ही. अख्ख्या गावात तोंड दाखवता आले नसते आम्हाला, पण आज तू हे बोलून मन जिंकलेस माझे."
ताईला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून घेत होता.

"अग, असं काय बोलतेस ताई, लहानपणी आई बनून तू सर्व केलंस आमच्या सगळ्यांसाठी.. मग आज मी इतके सुद्धा करू शकत नाही."
तात्यांना पण अगदी भरून आले होते.

नाना अजूनही चिंतेत दिसत होते आणि सुनिता बाई फक्त त्यांचा अंदाज घेत होत्या. त्यांनाही हे सर्व अनपेक्षित होते. ताई पण लगेच तयार होतील हे सुनिता बाईंना वाटले नव्हते. भाऊ बहिणीच्या बोलण्यात त्या मध्ये काहीच बोलल्या नाहीत.

"पण आधी मीराला विचारलेस का? ती तयार आहे का?"
ताईने तात्यांना अगदी काळजीने विचारले.

मीरा तयार होईल का या लग्नाला? बघुया पुढील भागात.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.