Login

नकळत सारे घडले - भाग १३

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग १३

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026



मीराला अचानक तिच्या लग्नाचे विचारल्यावर तिचा खूप गोंधळ उडाला होता. तिला काहीच कळतं नव्हते, नेमकं तिने काय करावं.
"तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण तरी.."
मीरा अगदी गडबडून गेली होती. तिला पुढे बोलायला काहीच सुचत नव्हते.


"आजपर्यंत तुझे सर्व लाड पुरवले, तुला एका शब्दाने देखील दुखावले नाही. तुझ्या सगळ्या ईच्छा पुरवल्या आणि यापुढे ही पुरवल्या जातील. लग्न झाले म्हणून तुला आम्ही विसरून थोडीच जाणार आहोत. तुझ्या आत्त्याला सर्व काही माहिती आहे, ती तुला कधीच अंतर देणार नाही. तुला सूनेसारखं नाही तर लेकीसारखी माया करेन याची मला खात्री आहे आणि तू सुद्धा खूप खुश राहशील.
आमच्या मनात सुद्धा नव्हते हे असे काही घडणार म्हणून आणि आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल, पण आता तूच आम्हाला समजून घ्यावं आणि ह्या लग्नाला होकार द्यावा असं मला तरी वाटतं."
तात्या बोलताना ताईचा विचार करूनच बोलत होते.


"मला तुमचं सगळं कळतंय आणि आत्त्तू पण खूप छान आहे, पण.. पण मी मल्हारकडे बघून कधीच हा विचार केला नव्हता."
आता खरं बोलत होती मीरा.


"मग त्यात काय बिघडलं, उलट तुम्ही एकमेकांना अगदी चांगले ओळखतात. तुम्हा दोघांना तुमच्या आवडी निवडी माहिती आहेत. लहानपणापासून एकत्र खेळत आलात, मग आता असा विचार करायला काय हरकत आहे."
तात्या तिला प्रत्येक वेळी पटवून सांगत होते.


"पण मल्हार.. मी कसं सांगू तुम्हाला?"
मीरा खूप त्रासिकपणे बोलत होती.


"मला कळतंय मीरा तुला काय म्हणायचं आहे ते, पण आता ते सर्व समजून घेण्याची वेळ नाही. तुमच्या दोघांच्या लग्नाबद्दल सगळ्यांशी बोलून झालं आणि सर्वांना मान्य देखील आहे. मला माहितीय, तुम्हां आजकालच्या मुलींना लग्न म्हंटले की छान छान साड्या, मेहेंदी, दागिने, सर्व कार्यक्रम अगदी थाटामाटात हवे असतात. अगदी मेहेंदीपासून ते चुडा भरण्याचा कार्यक्रम, बॅग भरण्याचा कार्यक्रम, संगीत, साखरपुडा, हळद, लग्न.. हे सर्व पाहिजे असते. आपल्याला आता इतके करायला तर नाही जमणार, पण होईल तितके सगळे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू."
सुनिता बाई लेकीला समजून सांगत होत्या. मुलीच्या बाजूने देखील विचार करायला हवा म्हणून त्या तिला समजून देखील होत्या.

आजकालच्या मुलींची खूप स्वप्न असतात. लग्न कसे व्हावे याबद्दल त्यांच्या मनात खूप साऱ्या कल्पना असतात. एकमेकांचे बघून बघून पण त्यांना हुरूप येत असतो. रोज येणाऱ्या नव्या ट्रेण्ड बरोबर त्यांनाही पुढे जायचे असते. साहजिक आहे, लग्न म्हंटले की हल्ली देखावा हा आलाच.


"हो, तुला हवं ते सगळं करण्याची, आणण्याची जबाबदारी माझी आणि तुझ्या काकुची असेल. तुम्ही काही काळजी करू नका. मी बघून घेईन सगळे."
नानांनी तयारी दाखवली तसे तात्या आणि सुनिता बाई खुश झाल्या.


"एका मुलीच्या लग्नाचा विचार करताना बापाची काय हालत होतं असणार हे त्यालाच माहिती, पण तरीही मनावर दगड ठेवून मी तुला विनंती करतो. नाही म्हणू नकोस बाळा."
तात्यांनी शेवटी मीरापुढे हात जोडले.


मीराला सुद्धा त्यांच्या ह्या परिस्थितीकडे पाहून भरून आले. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. तिने तात्यांचा हात हातात घेतला आणि रडत रडतच मान डोलावली.


"मी तुमचा मान राखणारी मुलगी आहे पप्पा! आजवर तुमच्या शब्दाबाहेर मी कधीच कुठले काम केले नाही, मग आता तुम्हाला नाही कसे म्हणू. तुमच्यासाठी मी ह्या लग्नाला तयार आहे."
मीराने लग्नाला होकार दिला.


"तू चारचौघात आज माझी लाज राखलीस पोरी, मी तुला शब्द देतो. त्या घरात तुला कसलीच कमी पडणार नाही. तू कायम सुखात राहशील. एका मुलीच्या आई वडिलांना आणखी काय पाहिजे असते."
तात्या अगदी भारावून गेले होते.


"चला, आम्ही लागतो आता पुढच्या तयारीला."
नाना लगेच पुढच्या तयारीला लागले.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.