Login

नकळत सारे घडले - भाग १८

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग १८

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


जेव्हापासून मल्हार मीरासोबत बोलून बाहेर गेला तेव्हापासून मीरा वेगळ्याच दुनियेत गुंग होती. सुनिता बाई तिला केव्हापासून प्रश्न विचारत होत्या, पण तिचे त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. न जाणो ती कोणत्या इतक्या विचारत गढून गेली होती काय माहिती? चेहऱ्यावर मात्र हलके हसू होते; त्यामुळे सुनिता बाई निश्चिंत होत्या.


"मीरा, अग ए मीरा. कुठे हरवलीस? मघाचपासून मी काय विचारतेय तुला?"
सुनिता बाई तिला हाताला धरून हलवून विचारतात.


"हा.. ते आई मी.. काही नाही."
मीराला काय बोलावे तेच कळत नव्हते.


"लक्ष कुठे आहे तुझे? अजून काय बोलला मल्हार? सांग मला."
सुनिता बाईंना खूप उत्सुकता लागून होती मल्हारचे मीरासोबत काय बोलणे झाले हे ऐकून घ्यायची.

"काही नाही, मल्हार फक्त इतकेच बोलला, की या लग्नाला मी नक्की तयार आहेस का? हेच दोनदा विचारले मला त्याने."
मीरा आईला सांगताना सुद्धा तोंड लपवत होती.

"अग आता त्याला नावाने हाक नाही मारायची, होणारा नवरा आहे तो तुझा."
सुनिता बाई हसून बोलल्या तशी मीरा गालातल्या गालात लाजून हसली.


"हो आई."
इतके म्हणून तिने आईकडे पाहिले.


"चला बरं आता, बाहेर तुमच्या सुपारी आणि साखरपुड्याचा कार्यक्रम होणार आहे. तुला छान तयार व्हावं लागेल."
सुनिता बाईंनी तिला घाई केली तशी मीरा उठून उभी राहिली.


"मीरा, हे बघ तुझ्यासाठी आम्ही काय घेऊन आलो आहोत."
नाना काका आणि काकू आतमध्ये आल्या बरोबर बोलत होते.


"आलात का तुम्ही! बरं झालं केव्हापासून आम्ही वाट बघत होतो तुमचीच."
असे म्हणून सुनिता बाईंनी काकूंच्या हातातून पिशव्या घेतल्या आणि एक एक करून पाहू लागल्या.

"ताई, आपल्या मीरासाठी एकदम मस्त मस्त साड्या घेतल्या आहेत. सगळ्या अगदी माझ्या आवडीच्या आणल्या आहेत.. आता फक्त मीराला आवडल्या म्हणजे बास्स!"
काकू इतके बोलून मीराकडे पाहू लागल्या.


"अग, तू आणल्या म्हणजे तिला आवडणारच. तुझ्या सगळ्या साड्या आवडतात तिला; म्हणून मुद्दाम तुलाच पाठवले होते मी खरेदीला."
सुनिता बाईंनी लगेच एक एक साडी काढून मीराच्या अंगावर टाकून पाहू लागल्या.


"हा शालू बघा ताई, कित्ती मस्त आहे ना! डाळिंबी रंग सुद्धा खूप खुलून दिसेल आपल्या मीरावर."
काकू शालू दाखवत बोलल्या.


"हो ना, खरचं खुप सुंदर रंग आहे. मीरा उजळ आहे; त्यामुळे तिच्यावर कोणताही रंग छानच दिसेल."
आईला तर मुलीसाठी सगळे छानच दिसते.


"आणि ही बघा, ही हळदीची साडी. ही साखरपुड्याची आणि अजून दोन साड्या आणल्यात. ते लग्नासाठी पाच साड्या घेतात ना त्या आणल्या फक्त. बाकी आपण नंतर बघू."
असे म्हणून काकूने सगळ्या साड्या मीरापुढे खोलून दाखवल्या.


"काकू, खरचं खुप सुंदर चॉईस आहे तुमची. मी आले असते तुमच्यासोबत तरी मला लवकर निवडता आल्या नसत्या इतक्या छान साड्या, पण तुम्ही माझ्यासाठी हे काम अगदी सोपे करून टाकले."
मीरा सुद्धा साड्या पाहून खुश झाली आणि तिला पाहून आई काकू दोन्ही खुश झाल्या.


"चला, तुला साड्या आवडल्या ना! मग झाले माझे काम. आता काय करायचं आहे ताई तुम्ही सांगा."
काकू स्वतः हून लग्नाच्या कामाला पुढे आली.

"आता तू मीराला छान तयार कर फक्त! मी बाहेर बघून येते."
सुनिता बाई इतके बोलून बाहेर निघून गेल्या.


"मीरा, लग्न म्हणजे दोन व्यक्ती नव्हे तर दोन मनांचे मिलन असते. तुझे लग्न हे असे घाईघाईने जरी होतं असले तरीही तुम्ही दोघे एकमेकांना वेळ द्या. हे नात घट्ट व्हायला जरी वेळ लागला तरी चालेल, पण तुम्ही मनात कुठलीच अढी ठेवू नका किंवा एकमेकांबद्दल मनात कुठलीच शंका आणू नका."
काकू मीराला अगदी मैत्रिणीसारखे समजून सांगत होत्या.


"हो काकू, मला माहितीय तुम्ही सांगताय ते सगळे बरोबर आहे."
मीरा पण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलत होती.


"तुम्ही दोघे एकमेकांना ओळखतात.. अगदी चांगले ओळखतात; त्यामुळे उगाच एकमेकांना दोष देऊ नका. आता परिस्थितीच तशी आहे; त्यामुळे हा निर्णय घेतला गेला, पण लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात. असच इतक्या सहजासहजी घडत नसतात ह्या गोष्टी."
काकू मीरासोबत अगदी भावनिक होऊन बोलत होत्या.


"काहीही.. असे काही नसते."
मीरा उगाच बोलून गेली.


"अग खरचं, नाहीतर मल्हारसोबत आत्ता ती मिताली बायको म्हणून त्याच्या बाजूला उभी असती, पण तिच्या नशिबात ते सुख नाही."
काकू मीराला जोर देऊन सांगू लागल्या. यावर मीरा फक्त त्यांच्याकडे बघून हसत होती.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.