नकळत सारे घडले - भाग १९
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
काकू मीराला अगदी आपल्या लेकीसारखे छान समजून सांगत होत्या. मीरा पण त्यांचे ऐकून घेत होती आणि मध्येच तिला अचानक हसू ही येत होते.
"काय ग काय झाले? अशी का हसतेय? मी काय तुला जोक सांगतेय का?"
काकू आणखी मजाक करत बोलत होत्या.
"काही नाही, ते असच जरा."
मीराला आता खरचं लाजल्यासारखे झाले होते.
"काय ग! मला नाही सांगणार का?"
काकू तिच्याकडे बघून बोलल्या तशी मीरा पुन्हा लाजली.
"अग्ग माझी लाडो, तू खुश आहेस ना! मग आम्हाला बाकी काही नको. तू तयार होते की नाही? याचे किती टेन्शन आले होते आम्हाला, पण आता तुला असे बघून खूप आनंद होतोय."
काकू अगदी हसून बोलल्या.
"काकू, मल्हारकडे मी कधी ह्या नजरेने बघितले नव्हते. आत्याने पण कधीच आम्हाला तसे वागवले नाही किंवा आमच्या मनात हा विचार सुद्धा आला नाही; त्यामुळे थोडे जड जात होते, पण मल्हार येऊन गेल्यापासून खूप दिलासा मिळाला."
मीरा आता मल्हारला एकेरी नावाने बोलत नव्हती हे काकूंच्या लक्षात आले.
"हम्म्म, मग आहेच आमचा मल्हार तसा. बघ तू पण फसली की नाही."
काकू आता तिला चिडवत बोलत होत्या.
"तसे नाही, मी खरचं मनातून खूप घाबरले होते. अचानक लग्न म्हंटल्यावर काहीच सुचत नव्हते, पण मल्हार आले आणि मला अगदी आपुलकीने विचारू लागले. त्यांच्या मनात कुठलीच शंका किंवा स्वतः चा स्वार्थ नव्हता.. होती ती फक्त माझ्याविषयी काळजी."
मीरा मल्हारविषयी बोलताना एकदम चमकत होती.
"तो खूप विचार करतो सगळ्यांचा, मग अशावेळी तुझा विचार नक्कीच केला असणार त्याने."
काकूंना पण मल्हारचे बोलणे पटले होते.
काकूंना पण मल्हारचे बोलणे पटले होते.
"मला बोलले कुठल्याच दबावाखाली किंवा बळजबरी लग्नाला तयार व्हायची काही गरज नाही. मी बाहेर सगळे सांभाळून घेईन."
मीरा त्यांच्यात काय बोलणे झाले ते सगळे सांगत होती.
"मग! मग तू काय बोललीस की नाही त्याला?"
काकू अगदी उत्सुकतेने ऐकत होत्या.
काकू अगदी उत्सुकतेने ऐकत होत्या.
"आई वडिलांनी माझ्यासाठी जो निर्णय घेतला असेल तो मला मान्य आहे. मी लग्नाला तयार आहे. इतके बोलून मी शांत बसले आणि ते बाहेर निघून गेले."
मीरा तोच प्रसंग आठवून सांगत होती.
"वेडाबाई, आणखी काही बोलला नाही का?"
काकुंचे प्रश्न सुरूच होते.
"काहीच नाही."
मीरा खाली मान घालून बोलू लागली.
"मीरा, खरं खरं सांग. मल्हारसोबत तू लग्नाला आधी नाही म्हणत होतीस आणि आता अचानक हा बदल कसा काय बरं?"
काकूंना शंका वाटली.
"मल्हार जेव्हा माझ्याशी बोलायला आले तेव्हा मी फक्त आई वडिलांसाठी तयार होते, पण त्यांचे बोलणे ऐकल्यावर असे वाटले, की हीच ती व्यक्ती आहे जिच्यासोबत आपण आयुष्यभर राहू शकतो. जो माणूस स्वतः चा विचार न करता समोरच्याचे मन जाणून घेतो त्याला नाही कसे म्हणू! ते बोलत होते आणि मी फक्त ऐकत होते. त्याच क्षणी.. अगदी त्याच क्षणी मी मल्हारच्या प्रेमात पडले. कशी काय? ते मला सांगता येणार नाही आणि आता तुम्ही पण विचारू नका."
इतके बोलून मीरा पाठमोरी झाली आणि स्वतः चा चेहरा ओंजळीत लपवू लागली.
"मीरा अग, कित्ती गोड आहेस तू. यालाच तर प्रेम म्हणतात. स्वतः च्या आधी समोरच्याचे मन सांभाळणे. मल्हार खरचं खुप छान आहे. आम्ही सगळे खुश आहोत तुमच्या दोघांसाठी. छान सुखाचा संसार होऊ दे तुमचा आणि असेच प्रेमाने रहा."
काकू हळव्या होऊन बोलत होत्या.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा