नकळत सारे घडले - भाग २१
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
साखरपुड्याची पूजा झाली आता अंगठ्या घालण्याचा कार्यक्रम होणार होता, त्यासाठी मल्हार आणि मीरा स्टेजवर उभे होते. मल्हार स्टेजवर उभा होता, पण मीराकडे बघत नव्हता. मीराचे सगळे लक्ष मात्र मल्हारकडेच होते. त्याने अजूनही तिच्याकडे मान वर करून बघितले नव्हते.
"चला, मुलाने आधी अंगठी घाला आणि मग नंतर मुलीने अंगठी घाला."
गुरुजी बोलले तसे मल्हारने मीराकडे बघितले. मीरा खाली मान घालून उभी होती.
"मीरा.."
मल्हारने मीराकडे बघून हात केला, तिनेही त्याच्या हातात हात दिला. जसे काही तो तिला विचारत होता, तू तयार आहेस ना माझ्या हातात तुझा हात द्यायला?
त्याने मीराचा हात हातात घेतला तसे तिने वर बघितले. मागे मित्रांचा एकच गोंधळ सुरू झाला. सगळे त्यांच्याकडे बघून त्यांना अभिनंदन करत होते, फुलांच्या पाकळ्या त्यांच्या अंगावर टाकत होते आणि टाळ्या वाजवत होते.
मल्हारच्या हातांचा स्पर्श होताच मीरा एकदम शहारली. तिने खूप आशेने त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्याकडे बघतच राहिली. तो मात्र तिच्या हातात अंगठी घालून मोकळा झाला. आता बारी होती तिची. तिच्या हातात मागून कोणीतरी अंगठी दिली तेव्हा तिने डायरेक्ट मल्हारचा हात हातात घेतला तसे त्याचे सगळे मित्र ओरडले आणि मल्हार भानावर आला. तो एकदम शॉक होऊन तिच्याकडे बघत होता. दोघेही एकमेकांना बघतच राहिले आणि स्टेजवर सोबत उभे राहूनच सगळ्यांना नमस्कार केला.
थोडावेळ ते दोघे तसेच थांबले, सगळ्यांनी त्यांच्यासोबत स्टेजवर जाऊन फोटो काढले. त्यांचे दोघांचे सुद्धा खूप सारे फोटो काढले.
"चला आता, पुढच्या तयारीला लागले पाहिजे."
असे म्हणून सुनिता बाईंनी मीराला हाताला धरून रूममध्ये नेले.
"आई, अग फोटो अजून झाले नव्हते."
मीरा अजूनही वळून वळून मल्हारकडे बघत होती.
"आता हळदीचा कार्यक्रम सुरू करायचा आहे आपल्याला. तासाभरात तो ही कार्यक्रम उरकला पाहिजे."
सुनिता बाई बोलत होत्या पण मीराचे त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते.
"सरिता, प्रीती या बरं तुम्ही दोघी इकडे. आता हिला एकटीला सोडू नका तुम्ही. हिचं सगळं आवरून द्यायचं आणि बाहेर घेऊन यायची जबाबदारी तुमची. मी बाहेर पुढची तयारी करत आहे."
सुनिता बाई इतके बोलून बाहेर निघून गेल्या.
"हो हो काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही बघतो सगळे."
सगळ्या बहिणी बोलल्या तसे सुनिता बाई त्यांच्याकडे बघून हसून निघून गेल्या.
"ताई, पाटाभोवती पाच तांबे आणि त्याला सुत बांधून ठेवले आहे मी. हळद पण कालवून ठेवली आहे. आता पहिले मल्हारची हळद झाली की आपण मीराला बाहेर बोलवू."
नाना मामांची बायको म्हणजे निवेदिता बोलली.
"हो हो, बरं केलं तू सगळी तयारी पटापट करून घेत आहेस ते. मला तर बाई काहीच सुचत नाहीये."
सुनिता बाई डोक्याला हात बोलत होत्या.
"असं कसं बोलताय ताई तुम्ही, ते पण मी असताना."
निवेदिता बोलली आणि सुनिता बाईंना दिलासा मिळाला.
"हो ना खरचं, तुलाच काळजी आहे माझी."
असे म्हणून त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला.
"मी काय म्हणतो, दोघांना एक एक करून बोलावण्यापेक्षा एकत्रच हळदीचा कार्यक्रम उरकून घेऊ. आजकाल नवरदेव नवरीला सोबत बसवून लावतात म्हणे हळद."
नाना मामा बोलले तसे निविदिता मामी पण हो ला हो करून बोलत होत्या.
"बरं असं म्हणताय तुम्ही, आधी कल्पना ताईंना विचारून घेऊ."
सुनिता बाई त्यांना विचारायला जातच होत्या की नानांनी त्यांना थांबवले.
"वहिनी, तुम्ही थांबा. मी सांगतो ताईला. तुम्ही मीराच्या तयारीच बघा."
नाना मामा इतके बोलले आणि निघून गेले.
"निवेदिता, चल बरं मीरा तयार झाली असेल तर तिला घेऊन येऊ बाहेर."
दोघी पण बोलत बोलत रुममध्ये आल्या.
आजकाल मोठे कमळ ठेवतात हळदीसाठी त्यातच दोन पाट मांडले आणि दोघांना एकत्रच हळद लावण्याचे ठरवले. याने वेळ पण वाचेल आणि लग्न पण वेळेत लागेल; म्हणून सगळेच तयार झाले.
"मामा, आम्हाला हळद खेळायची आहे. तुम्ही असे सगळे शॉर्टकट कार्यक्रम नका ना करू!"
मल्हारची लहान बहिण बोलली तसे नाना मामा हसायला लागले.
"अरे बेटा, आपण आता घाई करतोय. घरी गेल्यावर जेव्हा उद्या त्यांचा हळद उतरविण्याचा कार्यक्रम होईल तेव्हा आपल्या दारात खेळा मनसोक्त हळद, पण आता घाई केलीच पाहिजे."
नानांनी तिला समजावून सांगितले तेव्हा ती शांत झाली.
हळद म्हटले की मजा मस्ती ही आलीच, पण हळदीचा कार्यक्रम थोडक्यात करायचा म्हणून दोघांना एकत्रच हळद लावण्याचे ठरले. आता बघुया पुढे काय होते.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा