Login

नकळत सारे घडले - भाग २२

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग २२


दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


हळदीची तयारी झाली. मीरा आणि मल्हार दोघांना त्या कमळामध्ये बसवले. मीराने छान अशी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. साडी अगदी साधीच होती, पण मीरा त्यात खूप सुंदर दिसत होती. गळ्यात आजकाल पिवळ्या रंगाचे दागिने येतात ते सगळे घातले होते. ही सर्व तयारी ती घरातून निघतानाच करून आलेली, पण इथे तिचे स्वतः चेच लग्न होईल हा तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता.


हळद नाना मामा आणि निवेदिता मामीच्याच हातची होती, म्हणजे सुरुवात तेच करणार होते. एक एक करून सगळे जोडीने उभे होते मीरा आणि मल्हारला हळद लावायला.

आधी हळद मल्हारला लावली आणि मग लागलीच मीराला पण लावून घेतली. फोटो पण सुरूच होते. सगळ्या बहिणी खूप मजा करत होत्या. एकमेकींना हळद लावून आनंद व्यक्त करत होत्या.


"कल्पना, या तुम्ही दोघे पुढे. भाऊजींना पण पुढे यायला सांग."
नाना मामा सगळ्यांना बोलवत होते.

"हो हो, सुनिता वहिनी कुठे आहे?"
कल्पना ताई खूप खुश होत्या आपल्या मुलासाठी.


मल्हारकडे बघून त्यांना खूप आनंद होत होता. आज सकाळी जे झालं ते विसरून पुन्हा सगळे खुश होते. मल्हार जरी नाराज दिसत होता, पण बाकीच्यांना खुश बघून त्यालाही बरे वाटतं होते. त्याने ठरवले होते, आता स्वतः साठी नाही, तर घरातल्यांसाठी खुश राहायचे.


सुनिता बाई आणि तात्या पुढे आल्या बरोबर मीराला खूप भरून आले. ती खाली वाकून डोळ्यातले पाणी लपविण्याचा प्रयत्न करत होती, पण सगळ्यांना ते दिसले होते. सुनिता बाई पण लगेच रडायला लागल्या. दोघींना सावरत असताना जमलेल्या बाकीच्या बहिणींच्या डोळ्यात देखील पाणी आले. 

"अरे अजून रडायला भरपूर वेळ आहे. तुम्ही आतापासूनच नका रडत बसू. पुढे जाऊन माझ्या मित्राची पण हीच अवस्था होणार आहे."
मल्हारचे मित्र हळद लावायला पुढे आले तसे त्यांनी जोक मारायला सुरुवात केली. त्यांचे बोलणे ऐकून सगळे रडता रडता हसायला लागले.


कल्पना ताईंनी तात्या आणि सुनिता वहिनीला हळद लावली. दोघेही आता एकमेकांचे भाऊ बहिणी म्हणून नाही तर एकमेकांचे होणारे व्याही म्हणून खुश होते. अगदी मनापासून त्यांनी हा निर्णय घेतला होता आणि त्यांच्या ह्या निर्णयाला मीरा मल्हार तयार झाले, त्यांच्यासाठी हेच खूप होते. आज मुलांनी त्यांचा स्वतःचाच नाही, तर घरातल्यांचा सुद्धा मान राखला होता. यावर दोन्ही घरांना त्यांच्या मुलांचा अभिमान वाटतं होता.


मितालीचे आई वडील लांबूनच सगळा कार्यक्रम बघत होते. आईंच्या डोळ्यातले पाणी अजूनही थांबलेले नव्हते. त्या अजूनही त्याच विचारात होत्या, की आत्ता इथे त्यांची मिताली असती तर किती छान झाले असते, पण देवाच्या मनात काही औरच होते.


"अरे मितालीचे आई बाबा. तुम्ही पण या ना. दोघांना हळद लावा."
नाना मामांनी त्यांच्याकडे बघून बोलले.


"हो हो, येतोच. तुम्ही लावून घ्या आधी."
मितालीचे बाबा उठून पुढे येत बोलले.


"नाही नाही, या ना तुम्ही पुढे. या ताई, तुम्ही सुद्धा या पुढे."
असे म्हणून मितालीच्या आई बाबांना त्यांनी हळदीचे ताट पुढे केले.


मितालीच्या बाबांनी दोघांना हळद लावली. आई पुढे झाली, त्यांनी मल्हारकडे बघितले आणि नंतर मीराला हळद लावायला हात पुढे केला तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. त्या लगेच बाजूला झाल्या. त्यांना जाताना बघून कल्पना ताई पुढे झाल्या.


"मला कळतेय तुमची अवस्था, तुम्ही नका जास्त त्रास करून घेऊ."
कल्पना ताईंना सगळे कळतं होते आणि म्हणूनच त्या सांत्वन करायला पुढे झाल्या.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.