Login

नकळत सारे घडले - भाग २६

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग २६

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


मीराला तिच्या मामाने मल्हार जवळ नेऊन उभे केले. कार्यालयाच्या मुख्य दारापाशी दोघेही उभे होते आणि त्यांच्या पाठीमागे सगळे मित्र मंडळी, सगळ्या बहिणी उभ्या होत्या. दोघांना पुढे हळुहळू चालत यायला सांगितले तसे दोघेही पुढे गेले आणि त्यांच्या मागे सगळेच येत होते.

मीरा आजूबाजूला बघत पुढे चालत होती, तर मल्हार स्टेजवर लावलेल्या नावांकडे बघत होता. सकाळी तिथे मिल्हार आणि मिताली लिहिलेले होते आणि आता तिथे मल्हार आणि मीरा टाकले होते. आयुष्यात कधी काय अचानक घडणार हे कोणीच सांगू शकत नाही. आपण फक्त पुढे चालत राहायचं आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाला तोंड देत राहायचं. कधी कधी आपल्या भल्यासाठीच असते सगळे आणि आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्ती आपल्याला सांभाळून घेत असतात; त्यामुळे त्यांना डावलून चालणार नाही. आपल्या जे हवे असते ते कधी कधी होते, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने; म्हणून ते आपल्यासाठी वाईटच असेल असे नाही. आपल्या चांगल्यासाठी काही गोष्टी नकळत घडत असतात, पण आपल्याला त्या खूप उशिराने कळतात. तसेच आत्ता मीरा आणि मल्हारच्या बाबतीत झाले होते. पुढे त्यांच्या आयुष्यात कित्येक सुंदर क्षण येतील हे अजून त्यांना माहिती नाही; त्यामुळे ते सध्या तरी एकमेकांना जाणून घ्यायला पुरेसा वेळ देत होते.  


चालता चालता दोघेही स्टेजजवळ आले आणि फोटोग्राफरने त्यांना तिथेच थांबवले.
"मल्हार तुम्ही एक पायरी पुढे वरती या आणि नंतर त्यांना हात द्या."
त्याने सांगताच मल्हार थांबला.


"मीरा, तुम्ही हसून त्यांच्याकडे बघा आणि त्यांच्या हातात हात द्या."
त्याने सांगितल्याप्रमाणे दोघेही एकमेकांकडे बघू लागले.


"अरे चला, कोणाची वाट बघताय?"
मागून मित्र म्हणाले तसे मल्हार पुढे झाला आणि एक दोन पायऱ्या चढून मागे वळून बघू लागला.

त्याने हात पुढे करायच्या आधीच मीरा एक पाय पायरीवर ठेवत त्याच्याकडे बघू लागली, की केव्हा हा हात पुढे करणार?

मल्हारने तेव्हा तिच्याकडे वळून पाहिले. त्याने पहिल्यांदाच मीराला वेगळ्या नजरेने पाहिले होते. ती खूप सुंदर दिसत होती. डाळिंबी कलरची साडी तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत होती. मीरा साधी सिंपल, पण खूप गोड दिसत होती. मल्हार तिच्याकडे बघतच राहिला. त्याला भानच राहिले नाही, की तिला हात द्यायचा होता.

"मल्हार, वहिनींना किती वाट बघायला लावणार अजून. हम्म्म.."
मागून मित्रांचा चिडवण्याचा एकच आवाज सुरू झाला तसा मल्हार भानावर आला. त्याने पटकन हात दिला तसे मीरा त्याच्या हातात हात देत स्टेजवर चढली. मागून मिनल पण तिच्या सोबत आली आणि बाकीच्या बहिणी सुद्धा.

स्टेजवर मल्हारचे सगळे मित्र आणि बहिणींचा घोळका जमा झाला होता. बाकीचे नातेवाईक स्टेजच्या खाली उभे होते.

मंगलाष्टके सुरू झाले आणि आशिर्वाद रुपी अक्षता दोघांच्या डोक्यावर पडत होत्या. मंगलाष्टके सुरू असताना मल्हार मीराकडे बघणे टाळत होता, पण का कुणास ठाऊक त्याची नजर आपसूकच तिच्याकडे वळत होती. मीरा मात्र खाली मान घालून उभी होती. तिला माहिती होते, की मल्हारचे सगळे लक्ष तिच्याकडेच आहे.

"मल्हार, आ.. आ.. काय सुरू आहे?"
गणेशने त्याला असे म्हणताच तो इकडे तिकडे बघू लागला. जणू काही त्याची चोरी पकडल्या गेली, पण मीराला खूप ओशाळल्यासारखे वाटतं होते. ती अजूनही खाली मान घालून गालातल्या गालात हसत होती.


मित्र असतातच असे, त्यांना फक्त एखादी गोष्ट माहिती पाहिजे चिडवण्यासाठी मग ते कोणालाच सोडत नाही. त्यांच्याशिवाय मजा नाही कोणत्याच कार्यक्रमाला आणि इथे तर मल्हारच्या लग्नाचा चांगला चान्स कोण सोडणार होते. त्याचे सगळे मित्र खूप चांगले होते. कोणीही त्याला सकाळी एकटे सोडून गेले नाही. त्यावेळी त्याची काय मनस्थिती असेल हे चांगलेच ठाऊक होते; त्यामूळे कोणीही त्याची साथ सोडली नाही. दुसरे लग्न ताबडतोब जमवले तेव्हाही त्याला समजावून सांगितले.


आपल्या आयुष्यात मित्र मैत्रीणी खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यांना कधीही अंतर देऊ नका. एखाद्याचे चुकले तर समजून घ्या किंवा समजावून सांगा, पण एकमेकांची साथ कधीच सोडून जाऊ नका. ते आहेत म्हणून तर आपण आहोत. घरात ज्या गोष्टी माहिती नसतात त्या मित्रांना सगळ्या माहिती असतात. आपले मन मोकळे करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे मैत्री; त्यामुळे मैत्रीला जपा. मैत्रीचा सुगंध आपल्या आसपास कायम दरवळत राहिला पाहिजे.



क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.