Login

नकळत सारे घडले - भाग २७

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग २७

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि।।


मंगलाष्टके झाले तसे सगळ्यांनी दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकून अंतरपाट दूर केले. दोघांनी एकमेकांना वरमाला घातल्या. पाटाभोवती सात फेरे घेतले आणि सगळ्यांनी फोटोसाठी पुन्हा गर्दी केली. थोडावेळ दोघांना स्टेजवर सोफ्यावर बसवले आणि नंतर फोटोग्राफरने त्यांना दोघांचे फोटो घेण्यासाठी उभे केले.


स्टेजवर दोघांचे छान छान फोटो घेतले, त्यानंतर त्यांना खाली बोलवून गार्डनमधे नेले आणि तिकडे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढून घेतले. खरंतर दोघांना ते थोडे विचित्र वाटतं होते, पण आजकाल हे फोटोंचे वेड जरा अतीच होते. नाही म्हंटले तरी शंभर एक फोटो फिरून फिरून तेच काढले होते.

मीरा मल्हार दोघेही आता कंटाळले होते त्या फोटो ग्राफरला. हळूच मल्हार मीराला म्हणाला," ह्याला आता पळवून लावले पाहिजे." त्याचे बोलणे ऐकताच मीरा हसायला लागली. तिला मनातून तर आवडत होते मल्हार सोबत फोटो काढायला, निवेदिता मामींनी सांगितले तसे हेच फोटो आठवण म्हणून राहतात; त्यामुळे ती छान जगून घेत होती हे क्षण, पण मल्हारच्या चेहऱ्यावर कंटाळा लगेच दिसून येत होता. त्याला आवडत नव्हते, पण करणार काय? तरीही त्याने बास करा म्हणून सांगितले आणि स्टेजवर जाण्यासाठी पुढे निघून गेला. त्याच्या मागे मीरा पण लगेच निघून गेली.


स्टेजवर नातेवाईक एक एक करून येत होते आणि फोटो काढून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन जात होते. साधारण शंभर एक नातेवाईक असतील आणि बाकीचे घरातले. सगळे तासाभरात आटोपले. 


आता लग्नानंतरच्या विधी सुरू झाल्या. पहिले कानपिळ्याचा विधी झाला. मीराला एक लहान भाऊ होता.. शाम. त्याने मल्हारचा कान अगदी अलगद हातात धरला.

"अरे असा चान्स एकदाच मिळतो, जरा जोरात पीळ कान."
गुरुजी बोलले तसे त्याने खरचं कान पिळला आणि सगळे जण हसायला लागले.


"शाम, भाऊजींकडून ताईला काही त्रास होता कामा नये हे वदवून घे आणि हो, त्यांना असं सहजासहजी सोडू नको बरं का!"
मल्हारचे मित्र शामला सांगत होते.

"अरे तुम्ही माझे मित्र आहात ना!"
मल्हार त्यांच्याकडे बघून रागात बोलला तसे पुन्हा ते हसायला लागले.

"बरं आता सगळे दागिने आणि मंगळसूत्र घेऊन या."
गुरुजींनी कल्पना ताईंकडे बघून सांगितले.

कल्पना ताईंनी मीरासाठी घडवून आणलेल्या दागिन्यांची पिशवी आणली. त्यांना मदत म्हणून निवेदिता मामी लगेच पुढे आल्या.


पाच तोळ्यांचे मोठे मंगळसूत्र, खूप सुंदर अशी डिझाईन. कल्पना ताईंनी सकाळी दुकानात जाऊन मीरासाठी पुन्हा सर्व दागिने नवीन घडवून आणले होते. पायातील पैंजण, जोडवी, मासोळ्या अगदी सगळे नवीन. आणलेले सर्व दागिने तिला घालून दिले.

मंगळसूत्राच्या एका वाटीत हळद आणि दुसऱ्या वाटीत कुंकू भरले.
मंगळसूत्र घालताना मीराचे डोळे आपसूकच मिटल्या गेले. मल्हारला पुन्हा अपराधी असल्यासारखे जाणवले. 'मीराने किती स्वप्न पाहिले असतील स्वतः च्या लग्नाचे आणि तिच्यासोबत हे असे घाईघाईत आणि ते ही बळजबरीने लग्न होतं आहे. काय वाटतं असेल तिला?' मल्हार मनात विचार करू लागला.

"मल्हार, अरे बघत काय बसलास.. घाल ना तिच्या गळ्यात मंगळसूत्र."
निवेदिता मामी बोलल्या तसे मीराने डोळे उघडले.

मल्हारने मीराच्या भांगेत कुंकू भरले. मंगळसूत्र घातले. निवेदिता मामींनी जोडवी आणि पायातले पैजण तिला घालून दिले. सर्व दागिने घालून झाल्यावर मीरा वेगळीच दिसत होती. आता ती ह्या क्षणापासून मल्हारची पत्नी म्हणून ओळखली जाणार होती.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.