नकळत सारे घडले - भाग २८
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
एका मुलीच्या आयुष्यात लग्न म्हणजे हा मोठा सोहळा असतो. त्यानंतर तिचे आख्खे आयुष्याचं बदलून जाते. लग्नाच्या दिवसापासून ती वेगळीच दिसायला लागते. गळ्यात मंगळसुत्र, पायात पैजण, जोडवी, हातात हिरवा चुडा, भांगेत कुंकू.. ह्या सगळ्या दागिन्यांनी तिचे रूप खुलून येते.
मीरा सुद्धा छान दिसत होती. सगळे दागिने घातले तेव्हा तिच्या रुपात आणखी भर पडली. तिच्यासोबत हे सगळे स्वप्नवत घडत होते. अचानक लग्न ठरले, पण लग्नाचा प्रत्येक विधी ती अगदी मनापासून करत होती.
आता कन्यादानाचा विधी होणार होता. त्यासाठी तात्यांना बोलवण्यात आले आणि सोबतच नाना काका आणि निवेदिता काकू पण आल्या. सुनिता बाई तिथेच बसून होत्या. सर्व विधी अगदी छान समजावून सांगत होते गुरुजी; म्हणून सर्व जण ऐकत बसले होते.
"चला आता मुलीचे आई वडील या इकडे पुढच्या विधीसाठी."
गुरुजी बोलले तसे मीराचे आई वडील स्टेजवर आले आणि त्यांच्या जवळ जाऊन बसले.
मीराचा हात मल्हारच्या हातात दिला तेव्हा आपसूकच मीराच्या डोळ्यात पाणी दाटून आले. सुनिता बाई तोंडला पदर लावून होत्या. एकुलती एक मुलगी. तिचे लग्न असे होईल हे कोणालाच वाटले नव्हते, पण करणार काय! परिस्थितीच तशी निर्माण झाली होती; त्यामुळे कोणीच जास्त वाईट वाटून घेत नव्हते. उलट सगळे खुश होते. दुसरी कुठली मुलगी बघण्यापेक्षा मामाची मुलगीच बरी, असे इतर लोकं पण बोलताना दिसले.
नात्यात लग्न नको, कल्पना ताई आधीच बोलली होती; त्यामुळे आधी तात्या काहीच बोलले नव्हते. नाहीतर मल्हारला त्यांनी मीरासाठी आधीच विचारून घेतले असते. त्यांच्या मनात देखील होते तसे, पण ताईचे बोल आठवले आणि ते शांत बसले होते, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. खरंतर देवाचीच अशी ईच्छा असेल, की मीरा आणि मल्हारने एक व्हावे; म्हणून इतके सगळे झालेले असतानाही शेवटी मल्हारचे लग्न मीरासोबत झाले. नाहीतर मल्हार आता त्या मिताली बरोबर उभा असता. कधी काय होईल आणि कसा खेळ पलटून जाईल हे कोणीच सांगू शकत नाही.
मितालीचे आई वडील लग्नाचे सर्व विधी बघत होते. आई तर अजूनही आसवे गाळत होती. त्यांच्याकडे कोणालाच बघवत नव्हते, पण यात त्यांची तरी काय चूक म्हणा. जिला जायचं ती तर गेली निघून, पण मागे आई वडिलांना किती त्रास. त्यांच्या डोळ्यासमोर लग्नाचे सर्व विधी होतं होते आणि त्यांचा होणारा जावई दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता. हे जरी त्यांना बघवत नसले, तरी हेच सत्य त्यांना स्वीकारावे लागणार होते.
इकडे स्टेजवर तात्या आणि सुनिता बाईंचा कन्यादानाचा विधी झाला आणि नंतर नाना काका निविदेता काकूंनी सुद्धा मीराचे कन्यादान केले. कारण त्यांच्या घराण्यात मीरा ही एकच मुलगी होती. नानांना दोन्हीही मुले; त्यामुळे मीराचे कन्यादान त्यांनीही केले.
कन्यादान झाले आणि आता सात फेरे घेण्यासाठी गुरुजींनी सुपाऱ्या मांडल्या. सप्तपदी करण्यासाठी हल्ली फुलांची रांगोळी काढतात. ती सुद्धा सकाळीच काढून तयार होती. त्यावरच सुपाऱ्या मांडल्या होत्या. गुरुजींनी दोघांना तिकडे उभे केले. आजूबाजूने आई वडील आणि सर्व नातेवाईक उभे होते. प्रत्येक सुपारी ओलांडताना गुरुजी त्याचे महत्त्व आणि वचन सांगत होते. गुरुजींचे वचन ऐकताना मीरा खूप भावूक होतं होती. मध्येच मल्हारकडे ती खूप आशेने बघत होती. तिला वाटतं होते, की मल्हारने पण त्या वचनांचा मनापासून स्वीकार करावा आणि बायको म्हणून तिला मान्य करावं. तिला समजत होते, की मल्हार लगेच ह्या लग्नाला तयार नव्हता.. पण आता जे घडतंय त्याला तिच्या सारखेच त्यानेही मनापासून स्वीकारावं बस तिचं इतकंच म्हणणं होतं.
प्रत्येक वचन घेताना सुपारी पुढे सरकवत मीरा मल्हारच्या साथीने पुढे चालत जात होती. तिने पूर्णपणे त्याला मनापासून नवरा म्हणून स्वीकारले होते. आता फक्त मल्हारने तिला लवकरात लवकर समजून घेऊन तिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा. हीच आस ती मनात बाळगून होती.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा