Login

नकळत सारे घडले - भाग २९

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग २९

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026



मीरा आणि मल्हार दोघेही बोहल्यावर चढतात. लग्न अगदी थोडक्यात, पण छान होते. सगळे विधी अगदी योग्य आणि शांततेत पार पडतात. 

  मितालीचे आई वडील तिथेच पाहुण्यांसारखे बसून ते नवरा नवरीचे होणारे लग्न बघत त्यांना शुभाशिर्वाद देत होते.
त्यांच्याच मुलीच्या लग्नासाठी सजवलेला हॉल आणि मंडप. लग्न ही लागले, पण तिथे त्यांची मुलगीच नव्हती. किती त्रास होतं असेल त्यांच्या मनाला, हे कोणीच सांगू शकत नव्हते. लग्न उरकले आणि जेवणाच्या पंगती उठत होत्या.

जेवण साधारण शंभर ते दीडशे लोकांचेच असेल; त्यामुळे सगळ्यांची जेवणं पण लवकरच उरकतात. आता फक्त घरातले काही मोजकेच लोकं बाकी होते. त्यांच्यासाठी खास टेबल सजवण्यात आला होता. टेबलवर फुलांच्या पाकळ्यांनी सजवले होते.

नवरदेव नवरीचा एक टेबल सेप्रेट सजवला होता. दोघांना एकाच ताटात वाढलेले होते. प्रत्येक जण येत होते आणि दोघांना घास भरवून जात होते.

"अरे तुम्ही दोघांनी पण एकमेकांना भरवायचे असते."
मित्र होतेच बाजूला उभे, ते सांगतील तसे ऐकावेच लागतं होते. त्यांचे ऐकून बाकीचे पण लगेच म्हणायला लागले; त्यामुळे दोघेही एकमेकांकडे बघत होते.


"अरे बघत काय बसलाय एकमेकांची तोंड, भरवा पटकन म्हणजे आम्हाला जेवायला सुरुवात करायला बरे."
निवेदिता काकू म्हणाली तसे मीराने गुलाबजाम उचलला आणि मल्हारला भरवला.


"अरे वाह वहिनी, बरं झालं आख्खा कोंबला. तसेही त्याला गुलाबजाम खूप आवडतात."
गणेश बोलला तसे बाकीचे मित्र हो हो करत हसायला लगले.


"मल्हार आता तू भरव घास. वहिनी वाट बघताय."
मित्र काही शांत बसत नव्हते.

"हो हो भरव भरव.. आम्ही नाही बघत. ए इकडे तिकडे बघा रे!"
दुसरा मित्र बोलला तसे पुन्हा सगळे हसायला लागले. यावेळी मीरा पण हसली.


"तुम्ही घरी चला मग बघतो तुम्हाला!"
मल्हारने असे म्हणून त्यांना दटावले, पण मित्र ऐकता कुठे. उलट त्यांना अजून चेव चढला.

"मल्हार, अरे त्यांच्यावर का ओरडतोय. घास भरवायचा असतो."
आई बोलली तर ऐकावे लागणारच होते. मल्हारने चमच्याने गुलाबजाम उचलला आणि मीरा जवळ नेतच होता, की गुलाबजाम तिच्या साडीवर पडला. सगळा पाक तिच्या साडीवर सांडला.

"अरे काय मल्हार तू पण, वहिनींची सगळी साडी खराब झाली."
मिनल लगेच त्याला बोलली.

"तुम्ही शांत बसा बरं, तुमच्या बडबडमुळे झाले हे सगळे."
मल्हारने त्याच्या मित्रांकडे रागात बघून बोलले.


"बरं आता काही नाही बोलत. तुमचं चालू दे."
असे बोलून सगळे मित्र पण गपचुप जेवायला लागले.

मीरा तिच्या साडीवर सांडलेल पुसत होती. मल्हारने खिशातून रुमाल काढून मीराला दिला. तिने हसून त्याच्याकडे पाहिले. 

"सॉरी, तुझी साडी खराब झाली."
मल्हार हळूच बोलला.

"नाही काही नाही, पाण्याने पुसले की झाले."
मीरा मात्र जास्त काहीच बोलली नाही.


मल्हारने ह्यावेळी चमचा न घेता हातात गुलाबजाम उचलला आणि तिच्यासमोर धरला. तिनेही तो परत सांडायच्या आधी लगेच खाऊन घेतला. त्यांच्याकडे बघून मित्र पण खुश झाले. घास भरवण्याचा कार्यक्रम पार पडला. जेवणं उरकली आणि सगळे बाहेर हॉलमध्ये खुर्च्या मांडून बसले होते.


"आपल्याला आता लवकर आवरून निघायला हवे. रात्र होईल घरी जायला."
मल्हारच्या वडिलांना म्हणजेच विलास भाऊजींना काळजी वाटत होती; म्हणून ते कल्पना बाईंना बोलत होते.


"हो, आवरतं घ्यायला पाहिजे आता. मी तसे सगळ्यांना सांगून देते."
कल्पना ताई घरातल्यांना सांगायला उठल्या.


"तात्या, आता निघायला हवे आपल्याला."
कल्पना ताईंनी सांगताच तात्या उठून उभे राहिले.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.