नकळत सारे घडले - भाग ३०
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026
मीरा आणि मल्हारचे लग्न झाले. सगळे विधी थोडक्यात पण छान पार पडले. जेवणं पण उरकली आणि आता वेळ झाली होती तिथून निघण्याची.
मितालीचे आई वडील संपूर्ण लग्न पार पडेपर्यंत त्यांच्यासोबतच होते. खरंतर त्यांना आता वाईट वाटणे ही बंद झाले होते. त्यांच्यासमोर हे सगळे होतं असताना उलट एकाअर्थी त्या मुलाचे तरी चांगले झाले असे म्हणणे पडले शेवटी मुलीकडील (मिताली कडील) पाहुण्यांचे, कारण लग्न झाल्यानंतर ते मोडले असते तर जास्त वाईट वाटले असते. मल्हार चांगला मुलगा आहे आणि जे काही झाले त्याच्यासोबत ते चांगलेच झाले.
"पाहूणे, तुमची परत एकदा माफी मागतो."
मितालीचे वडील मल्हारच्या वडिलांची माफी मागताना बोलत होते.
"अहो, नका तुम्ही पुन्हा पुन्हा माफी मागू. जे झालं ते झालं. तुम्ही काळजी घ्या."
विलासराव त्यांना म्हणाले आणि मितालीच्या आईला नमस्कार केला.
"एक विनंती होती माझी, तिचा तुम्ही स्वीकार करावा."
मितालीचे वडील बोलत होते.
"हो, बोला ना.. काही अडचण नाही."
विलासराव त्यांच्याकडे बघत बोलले.
विलासराव त्यांच्याकडे बघत बोलले.
"आम्ही इथे जे काही रुखवत म्हणून मांडून ठेवले होते ते तुम्ही आमच्याकडून ह्या लग्नाचा आहेर म्हणून स्वीकार करा."
मितालीचे वडील हात जोडून विनंती करत बोलत होते.
"नाही, ते बरोबर दिसणार नाही. तुम्ही तुमच्या मुलीसाठी केली होती ही सगळी तयारी; त्यामुळे नको हे सगळं."
कल्पना ताई पुढे येत बोलल्या.
कल्पना ताई पुढे येत बोलल्या.
"आज या जागी माझी मुलगी असती, तर तिला मी आनंदाने हे सगळे केलेच होते. मिताली नाही पण ही मीरा सुद्धा मला माझ्या मुलीसारखीच आहे. तुम्ही नाही म्हणू नका."
मितालीचे वडील खूप आग्रह करत बोलत होते.
"नका हो असा आग्रह करू. हे लग्न जरी घाईघाईने झाले असले तरी आम्ही नाही घेऊ शकत हे सगळे. आम्हाला स्वतः लाच हे बरोबर वाटतं नाहीये."
मीराचे वडील पण पुढे होऊन बोलले.
मीराचे वडील पण पुढे होऊन बोलले.
"हे बघा, मला हे सगळं पुन्हा घरी घेऊन जाताना खूप वाईट वाटतं आहे; त्यामुळे तुम्ही नाही म्हणू नका. मला समजून घ्या."
मितालीचे वडील एकदम केविलवाण्या स्वरात बोलत होते.
"आम्ही फक्त एकच वस्तू घेऊन जाऊ. ते ही तुम्ही इतका आग्रह करत आहात म्हणून. तुमचे मन आम्हाला मोडायचे नाही."
मल्हारचे वडील हो तर म्हणाले, पण सगळे जण त्यांच्याकडे बघू लागले.
"हवं तर मी स्वतः गाडी करून देतो तुम्हाला घरापर्यंत, पण माझ्याकडुन हा लग्नाचा आहेर म्हणून स्वीकार करा."
मल्हारकडे बघत ते म्हणत होते.
"नाही मामा, मी खरचं या सगळ्या वस्तूंचं काय करू? मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा."
मल्हार इतकं बोलला आणि शांत झाला.
"तुम्ही मला चांगल समजून घेऊ शकता. एका मुलीच्या बापाचं मन दुसरं कोणाला समजणार. इतकं सगळं केलेलं मी कोणत्या तोंडाने पुन्हा घरी घेऊन जाऊ."
मितालीचे वडील मीराच्या वडिलांना म्हणजेच तात्यांना म्हणाले.
"मी समजू शकतो तुमच्या भावना, पण खरचं ह्या इतक्या सगळ्या वस्तू नाही घेऊ शकत आम्ही. तुम्ही एखाद्या अनाथ मुलीला लग्नात भेट म्हणून देऊ शकता. ज्याला खरचं ह्या सगळ्या वस्तूंची गरज आहे तिथे त्या गेल्या पाहिजे."
तात्यांचे बोलणे त्यांना पूर्णपणे पटले.
"आता ह्याला नाही म्हणू नका. खूप मनापासून मी तुम्हाला भेट म्हणून देत आहे."
मितालीच्या आईने तिथे ठेवलेल्या साड्या घेतल्या आणि त्यावर तांब्याचे पाच भांडे ठेवले आणि ते मीराच्या हातात द्यायला लागल्या.
मीराने तात्यांकडे बघत होती. त्यांनी मान डोलवून हो म्हटले तेव्हा मीराने ते हातात घेतले आणि त्यांच्या पाया पडल्या.
"सुखाचा संसार करा."
मितालीच्या आई वडिलांनी दोघांना आशीर्वाद दिला.
क्रमशः
माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा