Login

नकळत सारे घडले - भाग ३१

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ३१

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026



मंगल कार्यालयातून सगळे जण घरी जायला निघाले. गाव तसे जास्त लांब नव्हते, साधारण दोन तीन तास लागतील. तरीही आता संध्याकाळ झालेली होती आणि रात्रीच्या आत घरी पोहोचायला पाहिजे; म्हणून सगळे घाई करत होते.


विदाई.. हा क्षण असाच असतो. सगळ्यांना रडवून लेक सासरी जायला निघते. तेव्हा प्रत्येकीला स्वतः चे आठवूनच जास्त रडू येते. सगळ्या चुलत बहिणी मीराला जवळ घेत होत्या. काळजी घे म्हणून सांगत होत्या.


मीराला खूप भरून येत होते. तिच्या ध्यानी मनी नसताना असे अचानक लग्न झाले आणि आता ती इथूनच सासरी जायला निघणार होती. घरातून निघताना तिने असा विचार पण केला नव्हता, की आता पुन्हा ती येईल ते लग्न होऊनच.


"ताई, काही राहिलं असेल तर सांभाळून घे. मी नंतर सगळं करतो."
तात्या कल्पना ताईला आणि विलास भाऊजींना बोलत होते.


"तात्या अरे, उलट वेळेवर तू आम्हाला सांभाळून घेतले. मी तुझे आभार मानायला पाहिजे."
कल्पना ताई तात्यांचा हात हातात घेत बोलल्या.

"ताई, मीरा लहान आहे. काही चुकल तर सांभाळून घ्या तिला."
सुनिता बाई पण खूप हळव्या झाल्या होत्या. 


"मीरा मला परकी आहे का वहिनी, अग ती तर मला माझ्या मिनल सारखीच आहे. तू अजिबात काळजी करू नकोस."
कल्पना ताई वहिनीला सावरत बोलल्या.


"ताई, मला माहितीय माझी लेक तुझ्या घरात खूप सुखी राहील, पण तरीही सांभाळून घे. मीरा अजून अल्लड आहे."
मीराला जवळ घेत तात्या बोलले.


"मीरा खूप गुणी मुलगी आहे. तुझी सोन्यासारखी लेक माझ्या पदरात घातली यासाठी तुझे मनापासून आभार."
कल्पना ताईं मीराच्या डोक्यावर हात ठेवून बोलल्या.


"मीरा, तुला काही अडचण आली की मला लगेच फोन कर. काही वाटलं बोलावंसं, सांगावस तर नक्की आठवण कर."
निवेदिता काकू मीराला जवळ घेऊन सांगत होत्या. त्यांच्याही डोळ्यात पाणी दाटून आले होते.


"काकू, मी न सांगता ही तुला सगळेच तर कळते माझ्या मनातले."
मीरा त्यांच्या जवळ जाऊन खूप रडली.


"आई.. "
मीरा गाडीजवळ गेली, पण पुन्हा फिरून सुनिता बाईंना घट्ट बिलगली. त्यांना दोघींना असे बघून बाकीचे बघणारे नातेवाईक पण रडवेले झाले.


"काळजी घे.. दोघांची."
सुनिता बाईंना बोलणेही जड झाले होते, त्या इतक्या हळव्या झाल्या होत्या.


मीरा आणि मल्हार.. नवीन जोडपे गाडीत बसले आणि मागून पाहुण्यांची ठरवलेली ट्रॅव्हल्स गाडी निघाली होती. सगळे पाहुणे एका गाडीत बसले होते.


तात्या, सुनिता बाई आणि नाना, निवेदिता काकू मात्र आपल्या गाडीत बसून घरी गेले. त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांच्या लेकीचे लग्न झाले आणि ती सासरी गेली.


तात्यांनी निघताना आठवणीने तिथले कार्यालय आणि जेवणाचे जितके पैसे झाले तितके भरून दिले होते. खरंतर मितालीचे वडील आणि भाऊ दोघेही नकोच म्हणत होते, पण त्यांना ते योग्य वाटले नाही. त्यांनी त्यांच्या वतीने जितके होईल तितके बघितले आणि पैसे भरून दिले. शेवटी मुलीच्या लग्नाचा खर्च हा इतरांकडून करवून घेणे त्यांना बरोबर वाटले नाही. मुलीचे लग्न म्हटले, की खर्च हा होतोच आणि तसेही इथे तर सगळे तयारच होते; त्यामुळे त्यांना जास्त काही करायची गरज पडली नाही. हा फक्त हौस मौज करता आली नाही, त्यांचे इतके मात्र बाकी राहिले. पण ते ही मीरा सासरी घरी गेल्यावर नक्कीच भरून काढणार ही खात्री होती.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.