Login

नकळत सारे घडले - भाग ३२

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ३२

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


तात्या आणि सुनिता बाई घरी जातात तेव्हा त्यांना घर अगदी सूनेसूने वाटते. मुलीचे लग्न झाले असे वाटतच नव्हते. त्यांना मीराची खूप आठवण येत होती. नाना आणि निवेदिता काकू दोघेही त्यांच्यासोबत काही दिवस थांबायचे ठरवतात, कारण सगळे इतके अचानक घडले, की त्यांना कोणालाच तयारीला वेळ मिळाला नव्हता. आता घरी आल्यावर काय काय करायचे हे गाडीत बसल्या बसल्या बोलणे झाले होते.

पुढची तयारी करावी लागेल; म्हणून नाना आणि निवेदिता काकू दोघांनीही थांबून घेतले. त्यांच्याशिवाय सुनिता बाईंना काहीच करायला सुचत नव्हते.


सुनिता बाई आणि निवेदिता काकूने लगेच सर्व कामांची यादी तयार केली. ठरल्याप्रमाणे दोघीही कामाला लागल्या होत्या.


तिकडे मीरा आणि मल्हारचा गृहप्रवेश करायचा होता. दोघेही दाराजवळ येऊन उभे होते. कल्पना ताईंनी दोघांचे औक्षण केले. मीराने मापटे ओलांडले आणि लक्ष्मीच्या पावलांनी घरात गृहप्रवेश केला.

याआधी मीरा या घरात खूपदा येऊन गेली होती, पण आज ती या घराची सून म्हणून प्रवेश करत होती; त्यामुळेच तिला सगळे नवीन वाटतं होते. हे घर तिला काही नवीन नव्हते. तिला या घराचा अगदी कानाकोपरा माहिती होता, तरीही मिनलने तिला सर्व घर फिरवले. मिनल तशी तिच्यापेक्षा दोन तीन वर्षांनीच मोठी होती, पण तरीही दोघी अगदी मैत्रिणीसारख्याच राहत होत्या आधीपासून; त्यामुळे मीरा थोडी निवांत होती.


गेल्या गेल्या मिनल आणि चुलत मावशीने सगळ्यांसाठी मसाले भात बनवला. थोडं थोडं जेवण करून जो तो आपापल्या घरी निघून गेला. लग्नाला आलेले सगळे पाहुणे जवळच राहणारे होते; त्यामुळे जास्त कोणी थांबले नाहीत. आजी तेवढ्या थांबल्या होत्या.


रात्र बरीच झाली होती. मोजकेच पाहुणे घरात होते. झोपण्यासाठी सगळ्यांना हॉलमध्ये अंथरूण टाकले आणि बायका आतल्या खोलीत झोपल्या. मीरा मिनलसोबत तिच्या खोलीत होती आणि मल्हार मात्र त्याच्याच खोलीत होता.


दुसऱ्या दिवशी मीराला जरा उशिरानेच जाग आली. बाकीचे घरातले लवकर उठून आवरत होते. मीराला जाग आली तेव्हा नऊ वाजत होते. फोनची रिंग वाजली तेव्हा मीरा बाई उठली.

"काय ग मीरा, आवरले का तुझे? चहा नाश्ता झाला का?"
पलीकडून मीरासोबत निवेदिता काकू बोलत होती.


"अग काकू, लवकर तरी फोन करायचा ना!"
मीरा टेन्शनमध्ये येत बोलली.


"का ग! काय झाले?"
निवेदिता काकूंना पण काळजी वाटली.


"अग मला आत्ता जाग आली. बाहेर सगळे काय म्हणतील."
मीरा बिचारी काळजीत बोलत होती.


"वेडा बाई, त्यात काय इतकं. कालच्या प्रवासाने दमली असणार ना तू! मग होतं असं.. आणि तसेही तुला कोणी काही बोलणार नाही. नवी नवी नवरी ना तू."
निवेदिता काकू तिला नॉर्मल करत बोलत होती.


"तरी पण, मलाच कसतरी वाटतंय. आता आवरते पटकन. चल बाय."
असे म्हणून मीराने लगेच फोन ठेवून पण दिला.


"काय ग! काय म्हणाली मीरा?"
सुनिता बाई हसत असलेल्या निवेदिताकडे बघून बोलल्या.


"काही नाही, वेंधळी आपली मीरा. आता उठली बाईसाहेब."
काकू हसत बोलली तसे सुनिता बाई पण हसायला लगल्या.

"लग्न झालं पोरीचं, आता लवकर उठण्याची सवय व्हायला पाहिजे. नाहीतर काही खर नाही."
सुनिता बाईंनी डोक्याला हात लावत म्हटले.


"होईल तिला पण सवय, तुम्ही लगेच नका बोलू तिला. एकतर लग्न पण घाईत केले तिचे, मी समजावेन तिला; त्यामुळे तुम्ही नका पडू आमच्यात."
कल्पना काकू असं म्हणाल्या त्यावर सुनिता बाई फक्त हसल्या.


"बरं बाई, तुम्ही दोघी काय ते बघून घ्या, फक्त तिला चार गोष्टी चांगल्या शिकव ज्या पुढे संसारात तिला उपयोगी पडतील."
सुनिता बाई लेकीच्या काळजीत बोलत होत्या.


मीराचे लग्न झाले, पण तरीही ती अजून लहानच आहे असे समजत होत्या. आपली मुलगी कितीही मोठी झाली तरी प्रत्येक आईसाठी ती लहानच असते.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.