Login

नकळत सारे घडले - भाग ३५

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात
नकळत सारे घडले - भाग ३५

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026


इकडे कल्पना ताईंनी मीरासाठी खूप तयारी करायला घेतली होती. नवीन नवरी म्हणून सगळे दागिने तर झालेच होते, पण आता पूजेसाठी कसलीच कमी नको; म्हणून आणखी तयारीला लागल्या होत्या.


तिकडे सुनिता बाई आणि निवेदिता काकू पण घरातले आवरून दोघी लगेच बाहेर गेल्या. जणू काही भरपूर शॉपिंग करायची असे ठरवूनच बाहेर पडल्या होत्या. दोन्ही हातात पिशव्या मावत नव्हत्या इतकी खरेदी झाली होती. सामान जास्त म्हणून त्यांनी नानांना गाडी घेऊन बोलवून घेतले आणि सामान घेऊन पुन्हा घरी पाठवून दिले.


मीरा आणि मल्हार सगळी मंदिर फिरतं होते. प्रत्येक मंदिरात ओटी भरून जोडीने पूजा करायची असे सांगितले असतानाही मल्हार मीरापासून लांब लांबच राहत होता. मीरा मात्र मनातून खूप दुखावली होती त्याच्या अशा वागण्याने. मित्रांना पण हे समजायला वेळ लागला नाही, पण फोटो काढण्याच्या बहाण्याने ते त्यांना जवळ आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.


गणेश आणि दुर्गेश गाडीत एकदम मस्त मस्त गाणे लावत होते. जणू काही ते मीरा आणि मल्हारसाठीच वाजत होते. इकडे मीरा मल्हारकडे बघत होती, पण मल्हारचे कशातच लक्ष लागत नव्हते. तो वेगळ्याच दुनियेत गुंग दिसत होता. त्याला काही बोललेल पण लवकर कळतं नव्हते. त्यांच्या डोक्यात भलतेच विचारचक्र सुरू होते.


"मल्हार, अरे गाण्यांच्या भेंड्या खेळूया का आपण. गाडीत बसून कंटाळा आला असेल वहिनींना."
गणेश असे म्हणताच मीराला थोडा दिलासा मिळाला.


"नाही नको, मी नाही खेळत तुम्ही खेळा. मला जरा थकवा आला आहे त्यामुळे मी झोपतो."
मल्हार एकदम डोळे झाकत बोलला तशी मीरा नाराज झाली.

पुढे ड्रायव्हर सीटवर दुर्गेश बसला आणि त्याच्या बाजूला गणेश. मागे मीरा आणि मल्हार नवीन जोडपं आणि सगळ्यात मागे मिनल आणि आणि बसली. मीरा आणि मल्हारला मुद्दाम मध्यभागी बसवले होते. त्यांच्यात जवळीक व्हावी, दोघांनी एकमेकांना नोटीस करावं म्हणून, पण तसे काही होतं नव्हते.
देवदर्शन सगळे नीट झाले आणि ते घरी जायला निघाले तरी मल्हार मीरासोबत जास्त काही बोलला नव्हता. मीरा मात्र त्याच्याकडे अधूनमधून खूप आशेने बघत होती, तरीही त्याला ते कळत नव्हते.


संध्याकाळचा चहा नाश्ता करायला म्हणून दुर्गेशने एका हॉटेलवर गाडी थांबवली. सगळे जण फ्रेश झाले. मस्त चहा आणि गरमागरम कांदा भजी मागवली. भजी आली तसे सगळ्यांनी त्यावर ताव मारायला सुरुवात केली. सकाळी नाश्ता करून निघालेले मध्ये जास्त काही खाल्ले नव्हते. सोबत आणलेले लाडू आणि सांजोऱ्या तितक्या खाल्ल्या होत्या; त्यामुळे त्यांना आता चांगलीच भूक लागलेली होती.


"मल्हार, काय सुरू आहे तुझं?"
गणेशने त्याला एकट्यात विचारले.


"म्हणेच?"
मल्हार समजून पण न समजल्या सारखे करत होता.


"तुला माहितीय मला काय म्हणायचं आहे ते, उगाच न समजल्याचा आव आणू नको."
गणेश आता सिरियसली विचारत होता.


"मला थोडा वेळ पाहिजे. मी अजूनही सावरलो नाहीये."
मल्हार आता पटकन बोलून मोकळा झाला.


"अरे ती पोरगी तुझ्याशी लगेच लग्न करायला तयार सुद्धा झाली. तिच्या जागी दुसरी असती तर तिने किती विचार केला असता. नशीब चांगल तुझं, मामाचीच मुलगी आहे म्हणून तू असं नाही वागू शकत तिच्यासोबत."
गणेश अगदी योग्य समजावून सांगत होता.


"मला माहितीये तू माझ्या भल्यासाठी सांगत आहे ते, पण तरीही मला कळत नाहीये. माझ्या मनात खूप साऱ्या प्रश्नांची यादी आहे. जी तुला नाही कळणार."
मल्हार पुन्हा तेच बोलत होता.


"तुला कळतं कसे नाहीये, तू फक्त तुझाच विचार करतोय."
गणेश जोर देऊन बोलू लागला तसे दुर्गेश पण तिथे आला.

"भाई, हा बोलतो ते बरोबर आहे. तू कशाला लोड घेतो. झालं गेलं गंगेला मिळालं. आता तू नको जास्त विचार करू."
दुर्गेश तर अगदी प्रॅक्टिकल बोलत होता ते ही सहज.

"तुम्हाला नाही समजणार, मला काय वाटतं असेल ते आणि मी सांगू पण शकत नाही; त्यामुळे तुम्ही दोघेही मला नका समजावत बसू. उगाच तुमचा वेळ वाया जाईल बाकी काही नाही."
मल्हार इतके बोलून त्यांच्या जवळून निघून गेला.


क्रमशः


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.